थोडा है थोडे की जरुरत है @ 20.06.23
मेट्रीक्स एम्पॉवरींग (३)
मागच्या शतकात येऊन गेलेल्या मेट्रीक्स नावाच्या सिनेमातील एका अद्भुत संकल्पनेबद्दल आपण सध्या चर्चा करतो आहे आणि त्यावेळी फॅन्टसी वाटणारी ती संकल्पना खरी होते की काय अश्या भितीच्या उंबरठ्यावर आपण पोहोचलो आहोत. आर्टीफीशीयल इंटेलीजन्सच्या एका नव्या मायाजाळात आपण अडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आपल्या शारीरिकच नव्हे तर मानसिक क्षमतांवर देखील आता यंत्र आरुढ होण्याची स्थिती निर्माण होते आहे. याचे एकच उदाहरण खालील प्रमाणे..
पाचव्या वर्गातल्या मुलाला इंग्रजीमधे मदर म्हणजेच आई या विषयावर मॅडम निबंध लिहायला सांगतात. त्या त्याला मॅडम निबंध कसा लिहायचा, त्याची सुरुवात कशी करायची, त्यामधे विषयाची मांडणी कशी करायची, सोबतच आई सारख्या विषयावर निबंध लिहीताना आईचे आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचे स्थान या सर्व बाबींबद्दल माहिती देतात. चांगल्या मॅडम असल्या तर त्या मुलांना सांगतात की आज घरी जायचे, घरी आपली आई आपल्या परीवाराकरीता आणि विशेषतः तुमच्याकरीता काय काय कष्ट घेते याचे निरीक्षण करायचे व त्यानंतर आपल्या अनुभवांच्या आधारे निबंध लिहायचा व तो दुसऱ्या दिवशी वर्गात घेऊन यायचा. यामुळे त्या चांगल्या मॅडम विद्यार्थ्यांना विचार करण्याची संधी देतात, त्यांना जिवनानुभव कसे घ्यायचे हे समजावतात व विद्यार्थी त्यांच्या सांगण्यानुसार वागून आई या विषयावर अत्यंत छान व संवेदनापूर्ण निबंध लिहीतात. साधारण या नव्या शतकाच्या सुरुवातीच्या पंधरा वर्षांमधे अश्याच पद्धतीने मुलांनी निबंध लिहीणे ही पद्धत सुरु होती. आता नव्या शतकाची दोन दशके उलटल्यावर जेव्हा आपल्या मोबाईलमधे आर्टीफीशीयल इंटेलीजन्सवर आधारीत चॅट जीपीटी नावाचे एक नवे तंत्र आले आहे तेव्हापासून निबंध मी वर्णन केल्याप्रमाणे लिहीणे बंद होणार आहे. आता पाचव्या वर्गातील शिक्षिका विद्यार्थ्यांना मदर म्हणजेच आई या विषयावर निबंध लिहायला लावतील व निबंध लिहीण्याची तिच प्रक्रीया समजावून सांगतील. परंतू आता विद्यार्थी मात्र त्यांची ती प्रक्रिया लक्षातच घेणार नाही. घरी गेल्यावर ते आपली स्कूल बॅग बाजूला ठेवतील. आपल्या बाबांचा मोबाईल फोन हातात घेतील. आपल्या पाचवीतल्या मुलाला आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने मोबाईल हाताळता येतो या कौतुकाच्या पोटी वडील आपला मोबाईल मुलाच्या हातात देतील. मुलगा लगेच प्ले स्टोअर वर जाऊन सध्या फ्री उपलब्ध असलेले चॅट जीपीटी डाऊनलोड करून घेईल व त्यावर एक मेसेज टाईप करेल. मला मदर या विषयावर इंग्रजी भाषेमधे २०० शब्दांचा निबंध हवाय. त्याचा मेसेज टाईप झाल्यावर केवळ दोन सेकंदात त्याला आई या विषयावरचे किमान ५० वेगवेगळ्या प्रकारचे निबंध पाठवले जातील. त्यातला त्याला जो हवा तो डाऊनलोड करेल व सरळ तो निबंध वहीवर उतरवून तो वर्गात घेऊन जाईल. या प्रक्रीयेमधे त्याला निबंध कसा लिहायचा, सुरुवात किंवा शेवट कसा करायचा, त्यामधे शब्द परीणामकारकतेने कसे वापरायचे याची काहीही माहिती असण्याची गरज नाही. इतकेच काय तर त्याला आई या व्यक्तीबद्दल व तिचा आपल्या जीवनातील सहभाग आणि समर्पणाबद्दल भावनिक दृष्टीने विचार करण्याची देखील गरज नाही. आई आपल्याला सांभाळण्याकरीता काय काय कष्ट घेते याचे त्याला निरीक्षण करण्याची गरज नाही. त्याला केवळ एक सॉफ्टवेअर डाऊनलोड कसे करायचे आणि ते कसे वापरायचे एवढे माहित असणे गरजेचे आहे. तो आईच काय, काही सेकंदात, बाबा, भाऊ, शाळा, देश, आवडता खेळ, आवडता प्राणी, मी मुख्याध्यापक झालो तर, माझा छंद यासारख्या अनेक विषयांवर केवळ काही सेकंदात निबंध लिहू शकतो कारण त्याला मोबाईल हाताळता येतो व पालकांना याचे भारी कौतुक आहे.
वर दिलेल्या उदाहरणामधील बाब ही अतिरंजीत वाटेल परंतू काही घरांमधे ती पोहोचली देखील आहे. आता आपल्यापैकी प्रत्येक जण कल्पनाही करु शकत नाही अश्या प्रकारे हे आर्टीफीशीयल इंटेलीजन्स आपल्या व आपल्या मुलांच्या विचारशक्तीवर देखील आरुढ होईल. याचा मुकाबला आपल्याला करावा लागेल. हा सर्व प्रकार काही प्रमाणात अत्यंत उपयोगी आहे. संशोधन, वैद्यकक्षेत्र यामधे याचा वापर क्रांती घडवू शकतो परंतू शेवटी या तंत्राला जर आपण आपल्या विचारक्षमतेवर आरुढ होऊ दिले तर मात्र मानव म्हणून आपले जगातील प्राबल्य संपुष्टात येण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपल्याला त्या मेट्रीक्स चित्रपटातील हीरोने जे केले तेच करायचे आहे. जेणेकरून आपण या नव्या आव्हानाचा सामना करु शकू. त्या तयारीची चर्चा आपण या विषयावरील अंतीम भागात पुढील आठवड्यात करुया.. (क्रमशः)
खुप छान
ReplyDelete