थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23
तेजस्विनी
ते तेजस्वी वाक्य बोलून ती माझी विद्यार्थिनी जेव्हा माझ्या कक्षातून बाहेर पडली तेव्हा मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहीलो. स्विकारण्याची तयारी असेल तर एखादी साधी व्यक्ती देखील आपल्याला जीवनाचे अमुल्य धडे देऊ शकते. बी.ए. द्वितीय वर्षाला शिकणारी ती एक सामान्य कुटुंबातील दिसणारी माझी विद्यार्थिनी मला त्या दिवशी जीवनातील एक मोठा धडा देऊन गेली, तो म्हणजे परिस्थिती कितीही वाईट असली तरी होता होईस्तोवर स्वाभिमान टिकविण्याचा प्रयत्न करावा व जमेल ते प्रामाणिक प्रयास करून आपली सच्ची सक्षमता सिद्ध करावी. हे फार कमी लोकांना जमते. मुळातच सहनशक्तीच्या मर्यादा एवढ्या आकुंचन पावताना दिसतात की लगेच एक तर परिस्थितीला शरण जाणे किंवा मग आक्रमकतेने सारे उडवून लावणे हे दोनच पर्याय निवडले जातात. परंतू अत्यंत संयमित पद्धतीने जीवनातील अडचणींचा सामना करणारी ती तेजस्विनी खरोखरीच पथदर्शकच ठरते.
मागील वर्षीची दोन हजार रुपये फी तिच्याकडे शिल्लक होती. आता येत्या सेमिस्टरचा फॉर्म भरताना तिच्याकडे त्या पैश्याची मागणी करण्यात आली. अश्या वेळी साधारणपणे ज्यांना पैसे भरायला अडचण असते त्या विद्यार्थिनींना अर्ज लिहायला लावून कर्मचारी माझ्याकडे पाठवतात. त्याच प्रक्रियेनुसार ती माझ्याकडे आली होती. स्वाभाविकपणे मी तिची चौकशी करु लागलो. तिला पैसे भरायला काही अवधी हवा होता. पुढे मी जे प्रश्न तिला विचारले त्यांची उत्तरे देताना ती अवघडत होती परंतू तिचे शेवटचे ते वाक्य मात्र तिने ठामपणे उच्चारले. तिला मी म्हणालो की जर तुला पैसे भरायला वेळ हवा तर वडीलांना भेटायला घेऊन ये. यानंतर माझ्या प्रत्येक प्रश्नाला तिने दिलेली उत्तरे म्हणजे त्या मुलीच्या आयुष्यातील समस्याच होत्या व एवढ्या समस्या एकीच्याच नशिबी याव्यात याची मी कल्पनाही केली नव्हती. ती म्हणाली, सर माझे आई बाबा वेगळे झाले आहेत व त्यांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे माझे बाबा येणार नाहीत. त्यांनी एका रात्री माझी आई व आम्हा चार भावंडांना घराबाहेर काढून दिले व तेव्हापासून ते आम्हाला एक पैसाही देत नाहीत. खटला सुरु आहे व गेल्या दोन वर्षापासून तो सुरुच आहे. मग मी म्हणालो, तुझ्या आईला मला भेटायला घेऊन ये. तर ती म्हणाली, सर या सर्व प्रकरणाचा माझ्या आईला एवढा भयानक मानसिक त्रास झाला की गेल्या वर्षी तिला पॅरालेसीसचा अटॅक आला. ती सध्या संपुर्णपणे अंथरुणाला खिळली आहे. ती येऊ शकणार नाही. सहाजिकच मी तिला विचारले, मग तुम्ही रहाताय कुठे? ती म्हणाली आम्ही आमच्या आजी कडे, म्हणजे आईच्या आईकडे. तिने तिचे घर आम्हाला रहायला दिले व ती तिच्या शेतावरच्या घरी रहायला गेलीय. मी पुढे विचारले, तुमचा खर्च कसा चालतो मग? ती म्हणाली, जेव्हा आम्हाला आमच्या बाबांनी घरातून हाकलून दिले तेव्हा आम्ही सर्व भावंडे शिकत होतो. पण आता माझा मोठा भाऊ व मोठी बहिण शिक्षण सोडून काम करतात. त्यांच्या मिळकतीवर घर चालते मी आणि माझी छोटी बहिण शिक्षण घेतो. पैसे भरायला मुदत मागणारा तिचा अर्ज माझ्या हातात होता. उण्यापुऱ्या १९ वर्षाच्या त्या मुलीच्या जीवनातल्या या सर्व समस्या ऐकून तिला मदत करावी हे माझे ठरलेच होते. तरी देखील तिला मी सहजच विचारले, तू या अर्जात पैसे दोन महिन्यांनंतर भरते म्हणालीस, ते कुठून भरणार? ती जे बोलली ते ऐकून तर मी सुन्न झालो. ती मला म्हणाली, सर मला नुकतेच एका शेतावरचे काम मिळले आहे. मी तेथे जाणार आहे व त्यामधून मी हे पैसे भरीन. हे बोलताना तिचा गळा दाटून आला होता. काहीही झाले तरी या मुलीला मदत करायलाच हवी हे माझे ठरले होते. पण मला खरा आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा तिने ते तेजस्वी वाक्य उच्चारले.
तिला मी सांगितले की महाविद्यालयात गरजू मुलींना एका निधीद्वारे मदत केली जाते. तेथून किंवा व्यक्तिशः मी तुला मदत करतो. काळजी करु नको. हे ऐकल्यावर ती मला म्हणाली, सर नको. माझ्यापेक्षा आणखी कुणी गरजू असेल तर तिला ती मदत द्या. मी काम करूनच हे पैसे भरीन, मला केवळ मुदत वाढवून द्या, विनंती करते. मुदतवाढीची परवानगी घेऊन ती निघून गेली… मला मात्र माझ्या आयुष्यातील एक मोलाचा पाठ देऊन गेली.
हौसला कम न होगा,
तेरा तूफ़ानों के सामने
मेहनत को इबादत में,
बदल कर तो देख,
ख़ुद ब ख़ुद हल होगी,
जिन्दगी की मुश्किलें
बस ख़ामोशी को सवालों में,
बदल कर तो देख।
मेहनत शेवटी बोलते .....देव त्यालाच मदत करते जो मेहनत करतो आज चे युग काय आहे हे तेजस्विनी लेखातून कळले
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteखूप छान लीहलेस मन विषण्ण करून गेले तुमचे अनुभव
ReplyDelete