थोडा है थोडे की जरुरत है @ 07.03.23

रंग

आपल्याला काहीतरी वेगळं होतेय हे स्वानंदीला जाणवत होते. यावर्षीच हा बदल तिला जाणवत होता. स्वानंदी आता पंधरा वर्षांची झाली होती. होळी धुलीवंदन जवळ येतेय म्हणल्यावर या वर्षी एक अनामिक हुरहुर मनात दाटू लागली होती. हवीहवीशी वाटणारी ही हुरहुर कुणालातरी सांगावी असही वाटत होते. एक दोनदा तिने आईला हे सांगण्याचा प्रयत्न केला परंतू ते सांगण्यासाठी मन धजावत नव्हते. भिती वाटत नव्हती पण लज्जा वाटत होती. हे काय आपल्याला होतंय भलतंच आणि हे आईला कसे सांगायचे असा प्रश्न मनात उभा रहात होता. नेहेमीप्रमाणे तिने आपल्या खोलीतल्या तिच्या आवडत्या बनी ला म्हणजे तिच्या लहानपणीच्या बाहुलीला सारे सांगितले.

बनी, तुला ठाऊक आहे? आज ना मला कसेतरी होतेय. मला ना त्या धुळवडीची भिती वाटतेय. पण त्या भितीसोबत मला कुणीतरी खूप रंग लावावा असे देखील वाटतेय. मला नामाझ्या शाळेतल्या मैत्रीणी काहीतरी कुजबुजताना जाणवतात. त्या शेजारच्या वर्गातल्या एका हॅन्डसम मुलाबद्दल बोलत असतात. मी सोबत असली की त्या नाही बोलत. पण त्या दिवशी मी त्यांचे बोलणे चोरून ऐकले. मी बाबांची वाट बघत बसली होती, शाळा संपल्यावर. त्या दोघी तिघी मी बसले होते त्या भागाच्या बाजूला मोठ्या खांबाच्या पलीकडे बसल्या होत्या. त्यांची ती कुजबुज मी ऐकली. तुला ठाऊक आहे बनी, त्या म्हणत होत्या की तो दुसऱ्या वर्गातला मुलगा यावेळी त्याच्या मित्रांना घेऊन या मुलींच्या घरी जाणार आहे रंग लावायला? मग या मुलींची देखील काहीतरी तयारी करण्याचे ठरत होते. त्या बोलल्या की त्या मुलांना त्यांच्या एरीयात आल्याबरोबर त्या रंगाच्या पाण्यांनी भरलेले फुगे फेकून मारणार आहेत. किती मज्जा ना? बनी, मला पण असे करावे असे वाटतेय. कुणाला सांगू नको. आईला तर नाहीच. ती रागावेल मला. मला या आधी कधीच असे वाटलेले नाही ना. आणि त्यानंतर त्या काय म्हणाल्या माहीती आहे? मला तर सांगायलाच लाज वाटते. पण तुझ्यापासून काय लपवू? तू तर माझी बनुडी आहे. तुला तर माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टी ठाऊक आहेत. ऐक, गंमतच आहे.

त्या मुलांना ते पाण्याचे फुगे मारल्यावर त्या म्हणाल्या की त्यांच्या कॉलनीमधे एक काका एक भला मोठा पाण्याचा आर्टीफीशीयल टॅन्क तयार करतात. होपाण्याचा टॅन्क आणि त्यामधे रंगाचे पाणी भरतात. मग सगळे काका, काकु सर्वच मिळून एकमेकांना रंग लावतात आणि मग.. बने, ऐक मी काय सांगतेय.. त्यानंतर एकेकाला चक्क उटलून त्या पाण्याच्या टॅन्कमधे टाकतात. होबने.. प्रत्येकाला चांगले बुचकळून काढतात. या मुलींनी काय धमाल प्लॅन केलाय माहीत आहे? त्यांनी असे ठरवलेय की ती मुले त्यांच्या कॉलनीत आली की थोडासा रंग लावून घ्यायचा आणि मग तेथे असलेल्या सर्वांना सांगून या सर्व मुलांना त्या पाण्याच्या टॅन्कमधे बुचकळून काढायचेहो बने.. त्या पाण्यामधे त्यांना चक्क लोळवायचे. बापरे! ते सारे ऐकून माझ्या अंगावर काटाच आला. किती बदमाशी ही.. पण बने, तुला खरे सांगू मला आवडला त्यांचा प्लॅन.. किती मज्जा येणार ना? आणि या बुचकाळण्याच्या कार्यक्रमानंतर तर आणखी धमाल.. बने किती मज्जाते सारे त्या टॅन्क मधे उभे राहतात मग ते काका जोरात साऊंडसिस्टीमवर गाणी लावतात ज्याच्या तालावर हे सारे जण धमाल नाचतात. मग कुणीतरी पाण्याचा पाईप घेऊन सर्वांना पन्हा पुन्हा भिजवून काढतं. किती मज्जा बने. यावर्षी मला पण हे सारे करावे वाटतेय. कुणीतरी माझ्याही गालाला रंग लावावा, मी देखील कुणाला तरी रंगाने माखून टाकावे..पाण्याने चिंब भिजावे.. मज्जा करावी. बनी, हे सारे मी यावर्षी करणारच आहे. आईकडे मी हट्ट धरून हे सारे करून घेणार आहे. माझी आई मला सपोर्ट करेल.. माझ्या मनातला हा हुरहुर लावणारा विचार ती समजून घेईलच. पण बनी.. एकच अडचण आहे. ती तू सोडवबने मला ना हे रंग कसे असतात तेच कळलेले नाही. म्हणजे हिरवा, निळा, लाल, पिवळा हे रंग कसे असतात गं? मला कोणताच रंग कळत नाहीतू मला मदत करशील?

असे म्हणत स्वानंदी रडवेली झालीतेवढ्यात स्वानंदीची आई आली ती म्हणाली, स्वानंदी हा तुझा चष्मा तू कुठेही टाकून देतेस, लाव बघू तो आणि जेवायला चल. काळ्या रंगाचा चष्मा लावून स्वानंदी आईचा पदर धरत हळू हळू काठी धरून स्वयंपाक घराच्या दिशेने चालू लागली.

रंगांच्या आजच्या सणाला, रंगांची उधळण करताना ज्यांना आयुष्यभर कोणताही रंग दिसणारच नाही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या, निदान त्यांच्याप्रती संवेदना जपण्याचा प्रयत्न करुयात. रंगपंचमीच्या शुभेच्छा!!





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18