थोडा है थोडे की जरुरत है @ 28.03.23
दोन कान व एक तोंड
असे म्हणतात की परमेश्वराने आपल्या शरीराची जी रचना केली आहे त्यामधे लपलेले संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजे. जसे प्रत्येकाला एक तोंड आणि दोन कान दिले आहेत ज्याचा संकेत असा आहे की आपण जेवढे बोलतो त्याच्या पेक्षा किमान दुप्पट ऐकले पाहिजे. ऐकणे हा एक अत्यंत प्रभावी गुण मानल्या जातो. यामधे शरीररचनेची आणखी एक गंमत सांगता येईल. आपले दोन्हीही कान जर एकत्र जोडले तर त्याचा आकार आपल्या ह्रदयासारखा बनतो. याचा अर्थ असा की आपण जे काही ऐकतो ते ह्रदयापर्यंत पोहोचले पाहीजे. यासोबतच आणखी एक मजेदार परंतू सत्य गोष्ट बघा. आपले शरीर बऱ्याच अंशी पाण्याने बनलेले असते म्हणजे शरीरात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. शरीराला इजा झाली तर त्यातून रक्त बाहेर येते. परंतू याउलट, ह्रदय हे संपुर्णपणे रक्ताने व्यापलेले असते पण ह्रदयाला वेदना झाल्या की पाणी बाहेर येते… अश्रुंच्या रुपाने!! असेच अश्रू त्याच्या डोळ्यातून ओघळले होते जेव्हा तो माझ्याशी बोलण्यास आला. एल आय सी कार्यालयात काम करणारा समीर…(काल्पनिक नाव) माझ्याकडे अपॉइंटमेंट घेऊन तो आला.
तो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याचे वय २८ वर्षे आहे हे त्याने सांगितल्यावरही पटत नव्हते. मला तर तो चांगला पन्नाशीचा वाटला. थकलेला नि खचलेला. २८ वर्षाच्या या तरुणाच्या आयुष्यात नेमके काय झाले असावे हा प्रश्न तर माझ्या मनात होताच परंतू त्याहीपेक्षा जास्त मला त्याची अवस्था पाहून दया येत होती. तो अतिशय भांबावलेला व अस्वस्थ होता. त्याची बॅग घट्ट छातीशी त्याने धरली होती. माझ्या नजरेत नजर मिळविणे तो सारखे टाळत होता. माझ्या केबीनमधे भिर भिर बघत होता. मधेच त्याने माझ्या टेबलवर असलेल्या पुस्तकांची नावे वाचण्याचा प्रयत्न केला. तो येईपर्यंत मला तो माझ्याकडे कौन्सेलिंगकरीता येतोय हे कळले नव्हते. कारण मला त्याने तसे काहीच सांगितले नाही. मला तुम्हाला भेटायचे आहे. दुपारी केव्हा येऊ असे तो बोलला होता. मी त्याला दुपारच्या वेळात जरा कामे कमी झाल्यानंतर ये असे म्हणालो होतो. तो माझ्यासमोर येऊन बसला परंतू मला तरीही त्याचा हेतू कळला नव्हता. त्याला मी पाणी प्यायला सांगितले. पण पाणी पिण्यासाठी दोन्हीही हातांनी गच्च धरून ठेवलेली बॅग बाजूला ठेवावी हे त्याला सुचत नव्हते. शेवटी मीच त्याला सुचविले की ती बॅग बाजूच्या खुर्चीवर ठेवता येईल. तो एकदम ओशाळला. सॉरी सर, म्हणून त्याने बॅग बाजूला ठेवली व गटागट पाणी प्यायला. एवढ्या घाईने तो पाणी प्यायला की अर्धे पाणी अंगावर सांडले. त्याला पुन्हा जरा अवघडल्यासारखे झाले. त्याला मी सर्वप्रथम शांत व्हायला सांगितले. काही अवांतर गप्पा त्याच्याशी केल्या एव्हाना माझ्या लक्षात आले होते की त्याची मला भेटण्याची जागा चुकली होती. मला माझ्या सेंटरमधे भेटण्याऐवजी तो कॉलेजमधे भेटायला आला. पण मी त्याला रीलॅक्स झाल्यावर त्याच्या भेटीचे कारण विचारले. त्यानंतर पुढील एक तास तो मला जे सांगत होता ते खरोखरीच वेदनादायी होते. एखाद्या मुलाच्या आयुष्यात त्याच्या बालपणातच असे काही प्रसंग घडावेत की ज्यामुळे त्याचे आयुष्य उध्वस्त होईल या स्थितीपर्यंत पोहोचावे ही खरोखरीच फार वाईट बाब होती. तो बोलत होता. मधेच रडत होता. मी शांतपणे त्याचे ऐकत होतो. तो कोसळत होता, पन्हा सावरत होता कधी विधात्याला दोष देत होता, कधी सभोवतालच्या लोकांवर चिडत होता तर कधी मीच कमनशीबी आहे म्हणून स्वतःलाच बोल लावत होता. त्याचे हे सारे बोलणे मी फक्त शांतपणे ऐकून घेतले. साधारण एका तासानंतर तो जरा शांत झाला. त्यानंतर तो जे बोलला त्यावरून मला एक तोंड व दोन कान या शारीरिक रचनेचा अर्थ लक्षात आला. तो म्हणाला, सर मला तुम्ही कोणताही उपाय सांगू नका. मला तो नकोय. मला आनंद फक्त एवढा आहे की माझे तुम्ही ऐकून घेतले. सर, माझे ऐकायलाही माझ्या आयुष्यात कुणीच नाही. कुणाला माझे रडगाणे ऐकण्यात रस नाही. मी प्रयत्न केला एक दोन वेळा मित्रांजवळ मन मोकळे करण्याचा, पण ते मलाच दोष देतात. सर तुम्ही पहिले व्यक्ती आहात ज्याने मला कोणताही दोष न देता किंवा कोणतीही प्रतिक्रीया न देता माझे ऐकून घेतले. मी येत जाईन तुमच्या सेंटरला… मधून मधून.. फक्त बोलायला. मला उपाय नकोय.
पूर्वग्रह न ठेवता फक्त ऐकून घेणे किती महत्वाचे आहे हे पटवून देणारा हा प्रसंग. आपणही एक तोंड व दोन कान या ईश्वराने केलेल्या रचनेचा अर्थ समजून घेऊन केवळ ऐकविण्यापेक्षा ऐकून घेऊयात.. न जाणो आपल्या सभोवताली कुणालातरी आपली यासाठी गरज असेल…. होय ना?
Yes yes yes sir
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच एक संवेदनशील विषय आहे... एक तोंड दोन कान याकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन मिळाला... खरोखर कधी कधी श्रोता म्हणून भूमिका खूप महत्त्वाची असते... बोलणाऱ्याचे मन हलकं होतं... ऐकणाऱ्याला समोरच्या व्यक्तीच्या वेदना कळतात...
ReplyDeleteउत्तम मांडणी.
अतिशय महत्त्वाचा विषय---
ReplyDeleteछान मांडला सर-
जीवनाचा आनंद घेण्यापेक्षा उपभोग घेणाऱ्या
खोट्या मुखवट्याच्या या गर्दीत कोणाला कोणाचे ऐकायला वेळ नाही.