थोडा है थोडे की जरुरत है @ 17.05.22 Last Article

तेरा तुझको सौंपता

नेहेमीप्रमाणे दै. हिंदुस्थानमधे तो लेख प्रकाशित झाला. अनेकांपर्यंत तो पोहोचला. सोबतच सोशल मीडीयावर माझ्या त्याच लेखाच्या ब्लॉगची लिंक देखील शेअर केल्यामुळे सध्याच्या वेगवान युगात तो अनेकांपर्यंत पोहोचला. नेहेमीप्रमाणे माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेक वाचकांनी प्रतिसाद दिला. परंतू तो दिवस मला एक अत्यंत विलक्षण अनुभव देणारा ठरणार आहे हे मला माहित नव्हते. गेली जवळपास सात वर्षे मी हे सदर लिहितोय दै. हिंदुस्थानचा प्रबंध संपादक, माझा सन्मित्र विलास मराठे यांस एकही शब्द बदलविता प्रकाशित करतोय, या प्रवासात अनेक वेळा मला वाचकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया प्राप्त झाल्या. कुणी सूचना केल्या, कुणी आमच्याच आयुष्यातील तुम्ही काहीतरी बोललात असे म्हणले, तर कधी तुम्ही जे लिहीलंत ते आदर्श म्हणून ठीक आहे परंतू व्यावहारिक नाही म्हणून बोलून दाखविले. काही वाचकांना मी जे लिहीले ते पटले नाही परंतू या लिखाणातून जो प्रेमबंध निर्माण झाला त्यामुळे त्यांनी मला ते मोकळेपणाने बोलून दाखविले. जगतानाचे जे विविध अनुभव मी माझ्या सदरामधून मांडले ते सर्वच माझ्या दृष्टीकोनातून सर्वांना पटावे असा आग्रह माझा कधीच नव्हता कारण ते शक्यच नसते. परंतू जास्तीत जास्त वेळा प्रतिक्रीया मात्र भरभरून आल्या. परंतू मधला एक दिवस, ज्या दिवशी तो फोन मला आला त्या दिवशी मला काय करावे ते सुचेना. आपण काही लिहीले त्याचा असा काहीतरी परीणाम व्हावा ही गोष्ट एखाद्या लेखकाकरिता फारच विलक्षण होती. हे लिखाण, लिखाणामागचा माझ्या आई वडीलांनी लहानपणापासून विकसित केलेला विचार, गुरुजनांनी त्या विचारांना दिलेली दिशा हे सारे काही जे आतापर्यंत प्रथमदर्शनी माझे वाटत होते ते मुळात या सदराच्या वाचकांचेच आहे ही जाणीव मला त्या फोन नंतर झाली. तो फोन संपल्यावर मी काही काळ स्तब्ध बसून राहीलो गेल्या सात वर्षांचा या सदराचा प्रवास मनासमोरून गेला.

थोडा है.. हे आपले सदर दर मंगळवारी प्रकाशित होत असल्याने सकाळी दहा ते बारा फोन येतातच. त्याच मनःस्थितीत मी होतो तो फोन आला. अत्यंत हळू आवाजात पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने मीच बोलतोय याची खात्री केली. त्या व्यक्तीच्या आवाजावरून ते वृद्ध होते असे माझ्या लक्षात आले. मी त्यांना विचारले, बोला काका, काय म्हणताय? मी असे म्हणायचा अवकाश आणि ते गृहस्थ एकदम रडायलाच लागले. त्यांना बोलता येईना. त्यांच्या रडण्याचा आवाज मला येत होता. फोन सुरु होता मला केवळ हुंदक्यांचे आवाज येत होते. मी फोन बंद केला नाही. मी  काही वेळ त्यांच्या शांत होण्याची वाट बघत होतो. साधारण दोन तीन मिनीटांनी ते काका, जरा शांत झाले. त्यांनी पुन्हा बोलून मी फोन बंद तर नाही केला याची खात्री केली. भरून आलेल्या आवाजात त्यांनी मला धन्यवाद म्हणले. मी त्यांना अजून काही वेळ शांत होऊ दिले मग विचारले, काका काय झाले? त्यानंतर ते काका जे बोलले ते मी माझ्या संपुर्ण आयुष्यात विसरु शकणार नाही. सात वर्षांपूर्वी मी विलास मराठे मिळून या सदराची योजना कदाचित आजचा दिवस आयुष्यात यावा यासाठीच केली असेल असे मला वाटून गेले. माझ्या लेखणीतून प्रकट झालेले विचार हे माझे नाहीच तर ते अश्या प्रकारे मनाने स्विकारणाऱ्या अनेक वाचकांचे आहेत असे मला वाटून गेले. काकांची वाक्ये जवळपास जशीच्या तशी लिहीणे क्रमप्राप्त वाटते. ते म्हणाले, अविनाश, मी एक निवृत्त अभियंता आहे. पंधरा वर्षांपूर्वी विद्युत पुरवठा विभागातून मी निवृत्त झालो. तुमच्या आजच्या लेखामधे आपल्याला सांभाळणाऱ्यांना सांभाळले पाहीजे असे तुम्ही लिहीले. मी गेली तीन वर्षे पॅरालेलीस मुळे अंथरुणावरच आहे. मला बेडवरून उठताही येत नाही. माझी स्वच्छता, जेवण, आंघोळ हे सारे काही कुणालातरी करावे लागते. गेली तीन वर्षे माझ्यासाठी नेमलेला एक मुलगा, किंवा माझा सख्खा मुलगा माझी सून हे सारे करत आहेत. माझे कुणाला तरी करावे लागते ही भावना गेल्या तीन वर्षात मला एवढी बोचतेय की मी सांगू शकत नाही. आता तर मला ती असहनीय होते आहे. दिवसभरातून किमान चार ते पाच वेळा स्वतःचे जीवन संपवून टाकावे असा विचार मनात येतो. हे बोलताना काकांचा गळा पुन्हा भरुन आला. रडत रडतच ते म्हणाले, अविनाश माझे दुर्दैव बघा, पंखा आहे माझ्या डोक्यावर, परंतू माझ्यात देवाने एवढेही त्राण ठेवलेले नाहीत की मी त्यास स्वतःला लटकवून घेऊ शकेन. जगणे तर सोडा परंतू मी मरु देखील शकत नाही एवढा मी लाचार आहे. माझ्या अंगावर सरर्कन काटा आला, त्यांचे ते वाक्य ऐकून. ते बोलत होते, गेल्या वर्षात मी अतिशय चिडचिडा झालोय माझे सारे काही करणाऱ्यांवरच मग मी तो राग काढतो. त्यांना वाटेल ते बोलतो, चिडतो, मला मारून टाका म्हणतो, तोंडात घास भरवतात तर थुंकून देतो, होय अविनाश, मी हे सारे केलेपण आज तुमचा लेख मला माझ्या नातवाने वाचून दाखवला आणि खरे सांगतो, मला माझ्या वाईट वागण्याची जाणीव झाली. मला सारखे रडू येते आहे म्हणून तुमच्याशी बोलायचे मी ठरवले. माझ्या सुनेनेच हा फोन लावून दिला ती बाजूलाच आहे. मला फोनही धरता येत नाही. अविनाश, आज मी तिला तुमच्यासमोरच सांगतो, असे म्हणून ते तिच्याशी बोलू लागले. मला तो प्रकार फारच अवघडल्यासारखा वाटत होता. काय बोलावे काहीच कळेना. मी फक्त ऐकत राहीलो. ते सुनेला म्हणाले, सुनबाई, सरांसमोर तुला सांगतो, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो. तुम्ही माझे सगळे काही करता, आणि मी तुमच्याशी राक्षसासारखा वागतो. मला माफ कर. यापुढे मी असे करणार नाही. माझ्या वागण्यामुळे तुम्हाला त्रास झाला. पण मी सरांसमोर आश्वासन देतो, मी आता अजिबात चिडता, तुम्हा कुणालाही दोष देता, हसत हसत मरेन. सुनबाई तू मुलीप्रमाणे माझे सर्व करतेस, तुझ्या या बापाला फक्त शेवटचे काही दिवस सांभाळ, आता तुला तो अजिबात त्रास देणार नाही, माझे चुकले, मला माफ करून देशील. असे म्हणून ते पुन्हा हमसून हमसून रडू लागले. त्यांना पुढे बोलविलेच नाही. फोन बाजूला पडला असावा. त्यांच्या सुनेचा आवाज ऐकू आला, ती देखील हुंदके देतच म्हणाली, सर फोन ठेवते. तिलाही कदाचित आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून भरून आले असावे. फोन बंद झाला. मी सून्न होऊन अंगणातल्या पाळण्यावर बसून राहीलो. मला नखशिखांत हादरविणारा तो सारा प्रकार होता.

मी जे लिहीले ते माझे आहे? अजिबात नाही. ते काकांनी मनापासून स्विकारलेल्या अनेक वाचकांचे आहे. माझ्याकडे शिल्लक आहे ती त्यांनी भरभरून स्विकारलेल्या प्रेमाने सांभाळलेल्या त्या सर्व विचारांच्या पुंजीबद्दलची कृतार्थता!! ती आयुष्यभर जतन करणार बाकी सारे ज्यांचे आहे त्या काकांना त्यांच्यासारख्या समस्त वाचकांना मी अर्पण करतोय.

मेरा मुझमे कुछ नही, जो कुछ है सो तोह

तेरा तुझको सौंपता, क्या लागे है मोह

प्रिय वाचक बंधु-भगिनी

दै. हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, तसेच विनोद मराठे, मनिषा मराठे समस्त हिंदुस्थान परीवाराप्रति गेली सात वर्षे हे सदर चालविल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आज या सदराचा हा शेवटचा भाग आहे. पुन्हा एका नव्या सदरासह, नव्या संकल्पनेसह लवकरच भेटुयात. तुम्हा वाचकांच्या ऋणातच राहू इच्छितो. लवकरच भेटुया!!

   - प्राचार्य डॉ. अविनाश भास्कर मोहरील 






Comments

  1. खरे आहे, मित्रा....तेरा तुझको....

    ReplyDelete
  2. Congratulations for a fruitful column and best wishes for the new one.

    ReplyDelete
  3. सर तुमचा प्रत्येक लेख म्हणजे वास्तविक जीवनातील प्रसंग असल्याने आम्हांला तो फार जिव्हाळ्याचा व आपुलकीचा वाटायचा त्यातून काहीतरी नवीन विचार आणि प्रेरणा देणारा... मंगळवार आला की काहीतरी छान प्रेरणादायी , सुचक वाचायला मिळेल याची ओढ असायची
    वाट बघतोय .....😊

    ReplyDelete
  4. वाचून डोळे डबडबले 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23