थोडा है थोडे की जरुरत है @ 03.05.22

गुंता सोडवण्याची पद्धत

आता ती आजी नेमका गुंता कसा सोडवायचा हे ऐकण्याकरीता उत्सुक होती. मी तिला सांगितल्याप्रमाणे गुंता सोडविण्याकरीता एक टोक तिने माझ्या हातात दिले असल्याने आपल्या एकंदर वागण्यामधे किंवा कृतींमधे बदल करण्याची तिच्या मनाची तयारी झाली होती. कारण गुंता सोडविण्याच्या प्राथमिक तयारीमधला तो भाग आहे. आपल्या विचारप्रक्रीयेपेक्षा वेगळा विचार असू शकतो किंवा आपल्यालाही कधीतरी सुधारण्याची गरज भासू शकते हे मान्य करणे ही या प्रक्रीयेमधील मधील पहिली पायरी आहे. कारण वयानुसार स्वतःबद्दलची तसेच इतरांबद्दलची मते पक्की झालेली असतात सोबतच मी जो विचार करतो तोच सर्वात बरोबर विचार आहे अशी एक धारणा अजाणतेपणी का होईना परंतू तयार होते. त्यामुळे नवे काहीतरी आपल्या मनाच्या विरोधातले ऐकण्याकरीता ते गुंत्याचे टोक दुसऱ्याच्या हातात द्यावे लागते. शेवटी लोक कौन्सेलरकडे कशाला जातात तर त्यांना त्यांच्या समस्या स्वतःहून सोडविता येत नसतात म्हणून ही बाह्य मदत घ्यावी लागते. हे तसेच होते. परंतू आजीच्या मनाची ती तयारी दिसली म्हणून मी त्यांना सांगण्याचे ठरविले

मी त्यांना सांगू लागलो, आजी तुम्ही ज्या पद्धतीचे आयुष्य जगलात त्यामधे आणि आताच्या आयुष्याच्या पद्धतीमधे फारच फरक आहे. खरे तर तुमची पिढी अशी आहे की तुम्ही सर्वात जास्त बदल बघितले. म्हणजे तुम्ही लहान असताना तुमच्या घरात कदाचित वीज नसेल, तेथपासून तर आता जी मोबाईल के व्हिडीयो पर्यंत तुम्ही पोहोचल्या आहात. त्यामुळे हा बदल तुमच्यासाठी फार मोठा होता. परंतू या सोबतच सामाजिक बदल देखील फारच मोठा आहे. तुम्हाला तुमच्या वडीलांनी कदाचित तुमचे लग्न ठरताना विचारलेही नसेल आणि आता समाज लिव्ह इन रीलेशनशीप पर्यंत पोहोचला. त्यामुळे या बदलत्या संकल्पनांना स्विकारणे हे तुमच्याकरीता जड असले तरी देखील मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्याचा मुलभूत हेतूच असा आहे की तुम्हाला उर्वरीत आयुष्य आनंदात घालवायचे आहे की नाही. जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर मी सांगतो तसाच हा गुंता सोडवा. तुम्ही खूप छान आयुष्य जगू शकाल

यातला पहीला भाग म्हणजे आजपासून कोणत्याही गोष्टीबाबत मत देताना किंवा व्यक्त होताना हे वाईट आहे, आमच्या काळात असे नव्हते, हे मला आवडत नाही, ही व्यक्ती वाईट आहे, याचे हे चुकले, त्याचे ४० वर्षांपूर्वी असे चुकले होते, ती माझ्याशी तीस वर्षांपूर्वी अश्या पद्धतीने चुकीचे वागली होती, माझे कुणी ऐकत नाही, तुमचे मला पटत नाही, त्याने असे करायला नको होते या सारखी वाक्ये अजिबात वापरायची नाही. आजीच्या चेहेऱ्यावरून मला जाणविले की ती सतत बोलत असलेलीच वाक्ये मी तिला सांगितली. काय झाले, कसे झाले, कुणी कसे वागले, कोण कसा आहे याबद्दल आपल्याला आता कॉमेंटच करायची नाही हे ठरवावे लागेल. अगदी रहावतच नसेल तर रामनामाचा जप करायचा. हे आपल्या समवयस्कांजवळही बोलायचे नाही. मग मी माझे मन मोकळे कुठे करू असा विचार येत असेल तर त्याक्षणी मनाला सांगायचे की गेली ६० ते ७० वर्षे मी मन मोकळे करत आली आता त्याची गरज नाही. कुणाबद्दलही भूतकाळातले असो किंवा वर्मानातले, वाईट बोलायचे नाही. अगदी वर्तमानपत्रात देखील नकारात्मक बातम्या आल्या तरी त्यातील सकारात्मक बातम्यांचीच चर्चा करायची. बाकी काही नाही. हे अतिशय कठीण आहे परंतू याने तुमचे जगणे सोपे होणार आहे.

दुसरे म्हणजे, यापुढे कधीही मागितल्या शिवाय सल्ला द्यायचा नाही. काहीही झाले तरी द्यायचा नाही. तुमच्या सभभोवतालची मंडळी आता बऱ्यापैकी मोठी समजुतदार झालेली आहेत. त्यांचा स्वतःचा त्यांच्या जीवनाबद्दलचा एक विचार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील चांगल्या वाईटाला आता ते स्वतः जबाबदार आहेत. परत तुम्हाला वाईट वाटेल परंतू तुमच्या आधीही व्यवस्था सुरु होत्या तुमच्यानंतरही त्या सुरु राहतीलच. परंतू आता तुमचे उर्वरीत आयुष्य सुखाचे करण्यासाठी हा मार्ग महत्वाचा आहे. मागितल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही. मागितल्यावर आपल्याला पटेल तोच प्रामाणिकपणे द्यायचा त्यापासून मनाने दूर व्हायचे. आपण दिलेला सल्ला राबविलाच जावा असा आग्रह देखील करायचा नाही. जर असे झाले तर त्याबद्दल रागही मानायचा नाही किंवा आता सल्ला देणारच नाही अशी भुमिका पण घ्यायची नाही. कारण शेवटी तो सल्ला आहे त्यामुळे तो स्विकारल्या जाईलच असे काही नाही. त्यामुळे सल्ला देऊन निस्पृहपणे दूर व्हायचे पुन्हा पुढचा सल्ला मागितला तर मनापासून द्यायचा. हे देखील फार कठीण आहे परंतू आपले उर्वरीत जीवन यशस्वी करण्यासाठी फार आवश्यक आहे

तिसरे म्हणजे आपल्या व्यवस्थेवरची आपली सत्ता गाजविण्याची वृत्ती पूर्णपणे सोडून द्यावी. आपल्या हयातीत जे माझे असे आपण म्हणतो ते आता आपल्या सर्वांचे शेवटी ते इतरांचे हा जीवन प्रवास असतो. सत्ता ही एक झिंग आणणारी गोष्ट आहे ज्यात माझ्यापेक्षा दुसरे कुणी यशस्वी होऊच शकत नाही किंवा हे माझ्याशिवाय कुणी करुच शकत नाही अश्या प्रकारचा दुराभिमान त्यात तयार होतो. मग ते घर असो किंवा सामाजिक व्यवस्था. यावरचा उत्तम मार्ग म्हणजे हळूहळू आपल्या हातात जे आहे त्यावर इतरांना हक्क देणे तो आनंदाने देणे. सोबतच ज्यावर हक्क दिला ती गोष्ट त्यांच्या मर्जीनुसार त्यांना करु देणे, अजिबात लुडबुड करता. सत्ता दिल्याचा सामाजिक आविर्भाव आणून सारे काही पुन्हा माझ्याच निर्देशाने व्हायला हवे ही गोष्ट आपला उर्वरीत सुखी जीवनाचा हेतू साध्य करणार नाही

चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कौतुक करण्याची एक फॅक्टरी आपल्या डोक्यात उघडायची. घरातल्या घरात काय कौतुक करावे लागते, तो मला नाटकीपणा वाटतो हा आपला विचार बाजूला ठेवायचा. आजी पुन्हा हसली कारण तिच्या मनातलेच ते वाक्य होते. जमेल तेव्हा प्रत्येक गोष्टीचे भरभरून कौतुक करायचे. पटले नाही तरी करायचे. सध्या तंत्रज्ञानाच्या काळात माणसे यंत्रासारखी वागू लागलीत, अकारण चढाओढ करतात, पैसा सर्वश्रेष्ठ झालाय त्यामुळे कौतुकाच्या काही शब्दांची कमतरता जाणवते. ती पूर्ण करण्याचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे घ्यायचा. एखादी गोष्ट अगदीच आवडली नाही तर चूप बसायचे परंतू वाईट म्हणायचे नाही. होता होईस्तोवर चांगलेच म्हणायचे. गाईचा जीव वाचविण्याकरीता खोटे बोलले तरी चालते असे म्हणतात ना, तसे सुरुवातीला प्रयत्नपूर्वक कौतुकाचे बोल काढावे लागतील परंतू नंतर ती सवय होईल मनापासून कौतुकाच्या पावत्या देता येतील

या चार महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर गुंता सुटणारच नाही तर त्याचा सरळ धागा तयार होऊन नात्याची मजबुत वीण त्याच्याच आधारे विणता येईल. आता पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. गुंता ठेवून त्यात गुंतून कटकट करतच उर्वरीत जीवन जगायचेय की गुंता सोडवून प्रेमाच्या नात्याने विणलेले उर्वरीत आयुष्य घालवायचे आहे. आजी तुम्हाला मी वारंवार उर्वरीत आयुष्य म्हणतोय त्याचा कदाचित राग आला असेल. परंतू तेच खरे आहे. तो एक क्षण असा येणार की ज्या क्षणी, माझे माझे करत दुराग्रहाने सांभाळलेले, गाजवलेले, त्यामुळे दुखावलेले असे सगळे संपणार. एका क्षणात. त्यानंतर काहीच नाही. म्हणूनच त्या क्षणापर्यंत त्याच्या पुढे आपल्या टोचून बोललेल्या शब्दांच्या, तिरस्काराच्या, कारण नसताना दिलेल्या सल्ल्यांच्या किंवा दुराग्रहाने थोपविलेल्या मतांच्या स्मृती राहता, प्रेममयी शब्दांच्या, मागितल्या नंतरच केलेल्या मार्गदर्शनाच्या, सकारात्मक विचारांच्या स्मृती राहील्या तर छान होईल ना? आपल्यानंतर आपल्या नसण्याची कमतरता जाणवायला हवी अशी आपल्या असण्याची किंमत असावी, एवढे सोप्पे आहे.

आजीने माझा हात घट्ट धरला. माझ्या हातावर तिच्या डोळ्यातील दोन आसवे पडली. मला तत्क्षणी जाणविले, तिचा गुंता सुटलाय, आता केवळ…. आनंद!!!





Comments

  1. नात्यात ला गुंता सोडविण्या चीअचूक व प्रभावी पध्दत वाटली

    ReplyDelete
  2. वा!मस्त!गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!! आवडलं खूप!👌👍 ;

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23