थोडा है थोडे की जरुरत है @ 10.05.22

माझ्या मुलीचा मातृदिवस

नुकताच आपण मदर्स डे साजरा केला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील एका ग्रुपमधे याबद्दल चर्चा सुरु होती. अमुक एका दिवशी मदर्स डे साजरा करायचा की नाही याबद्दल चर्चा रंगली होती. काही जण यास  पाश्चिमात्यांच्या विचारांचे हे आपल्यावरील आक्रमण आहे अश्या पद्धतीची आक्रमक भुमिका मांडत होते तर काही जण काय हरकत आहे असा दिवस छान साजरा करायला. पहिली बाजू मांडणारे सांगत होते की आईच्या प्रेमाची अशी एका दिवसाला दखल घेण्याएवढं ते प्रेम स्वस्त आहे का? अश्या एका दिवशी आईबद्दलच्या मोठमोठ्या गोष्टी सांगायच्या, लिहायच्या किंवा आता फॉरवर्ड करायच्या आणि मग आईला विसरून जायचे हे बरोबर नाही. असे एका दिवशी आईच्या प्रेमाचा उदो उदो करणे चूक आहे. आपल्या सांस्कृतिक जडण घडणीत हे बसत नाही. या बोलण्यावर दुसरा समुह पेटून उठला होता. त्यांनी देखील आपली बाजू रेटून धरली होती. काय हरकत आहे पण असा एक दिवस साजरा करायला. आपण रक्षाबंधन नाही का साजरे करत? त्या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून तिला पाठबळ मिळावे म्हणून वचन घेते तो देखील ते वचन देतो. परंतू कधीकधी तर बहिण देखील भावाला पाठबळ देत असते. परंतू दिवस मात्र साजरा केला जातो. तसाच आईच्या प्रेमाबद्दल अधिकृतपणे पावती देण्याकरीता जर एक दिवस असेल तो साजरा केला तर काय हरकत आहे. फारच पाश्चिमात्यांचे आक्रमण वाटत असेल तर त्याला मातृदिन म्हणा. भाषेसोबत कशाला वैर करायचे? आजच्या दिवशी छान आईला चांगले वाटेल असे काही करावे असा दिवस छान साजरा करावा. तर्क दोन्हीही बाजूचे खरे होते. दोन्हीही बाजू योग्यच वाटत होत्या. खरे तर दिवस साजरा करा किंवा नका करु, जगातल्या कोणत्याही आईच्या मनामधे तिच्या पिल्लांबद्दल कायम विचार सुरु असतो. आई आणि तिच्या लेकरांमधे एकमेकांवरील प्रेमाचे दर्शन घडविणारे प्रसंग घडले की तो मातृदिवस असतो. मग मुलाने हात धरून आईला दवाखान्यात नेले तिची काळजी घेतली तरी, किंवा आपला मुलगा प्रवासाला गेला तर त्याचा प्रवास पूर्ण होऊन तो सुखरुप पोहोचेस्तोवर आईच्या डोळ्याला डोळा लागणे, मुलाकरीता जेवणाचा डबा भरताना डब्यासोबत मुलाला आवडते म्हणून पटकन दाणेगुळाचा लाडू एका छोट्याश्या डबीत भरून देणे किंवा आपल्यापासून दूर असलेल्या लेकराला आनंद व्हावा म्हणून काहीतरी छोटेसे परंतू अफलातून करणे जेणेकरून खूप त्यास समाधान लाभेल हे सारे ज्या दिवशी होईल ते सारेच मातृदिवस असतात. आपल्या लेकराशी जिची नाळ बांधलेली असते अश्या आई मुलाच्या नात्यांमधे असे अनेक छोटे छोटे क्षण येतात जे त्या त्या क्षणी मातृदिवसच साजरे करीत असतात. म्हणूनच एका विशिष्ट दिवशी मदर्स डे साजरा करून आईचे अभिनंदन करणेही चांगले आई मुलीच्या नात्यातील वेगवेगळे सुंदर क्षण निर्माण होणे तो देखील त्या त्या वेळेचा मदर्स डेच असतो. असाच एक मातृदिवस माझ्या मुलीच्या जिवनात उगवला. गोष्ट छोटीशी होती परंतू माझी मुलगीच नाही तर तिच्या सोबतच्या अन्य काही मुलींकरीता देखील तो क्षण अत्यंत आनंदाचा राहीला. मातृप्रेमाची चौकट मोठी होऊन माझ्या मुलीच्या मैत्रीणींनाही त्या प्रेमाचा लाभ मिळाला

अक्षय तृतीयेचा दिवस. त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच घरांमधे एक चांगला मुहुर्त म्हणून या दिवसाकडे बघितले जाते. परंतू त्यासोबतच जेवणामधे देखील खूप छान छान पदार्थ बनविले जातात. या सीझनमधे आंबे असतात त्यामुळे आंब्याचा रस, पन्हे, चिंचोणी, त्यासोबत कुरडया, पापड्या असा सारा बेत असतो. या दिवसांमधे मिळणारा वाळा देखील त्यात चवीसाठी घातला जातो. असे सर्व साग्रसंगीत भोजन या दिवशी केले जाते. परंतू होस्टेलवर रहाणाऱ्या किंवा घरापासून दूर राहणाऱ्या मुला मुलींना मात्र हे काही मिळत नाही त्यामुळे अश्या मुलांच्या आया घरी आपल्या लेकरांची आठवण काढत तळमळत असतात. हे तळमळणे आईचेच जास्त असते कारण लेकराशी जुळलेली नाळ, जन्माच्या आधी नऊ महिने तिच्याच करवी मिळालेले भोजन, ते अतूट नाते यामुळेच आईच्या घशाखाली घासच उतरत नाही. माझ्या मुलीला मात्र तिच्या आईकडून एक गोड सरप्राईज मिळणार होते तिच्या सोबत तिच्या मैत्रीणींसह मातृदिवस साजरा होणार होता.

अक्षयतृतीयेच्या दिवसाच्या दोन दिवस आधीपासूनच आईचा जीव कासाविस होऊ लागला होता. आपण अक्षयतृतीयेच्या दिवशी हे सारे पदार्थ करणार परंतू ते खूप आवडत असणारी लेक मात्र सोबत नाही यामुळे आई अस्वस्थ होती. काय करावे हे तिला कळेना. मग मुलगी पुण्याला रहात असल्याने पुण्यातच ती कल्पना पूर्ण होऊ शकत असल्याने तिने प्रयत्न सुरु केले. पुण्यातल्या काही ओळखीच्या मंडळींकडून जेवणाचे डबे पोहोचविणाऱ्या मंडळींचे फोन नंबर मिळविले. त्यांना फोन करुन अक्षयतृतीयेच्या दिवशी बनविले जाणारे पदार्थ कोण देऊ शकते याची चौकशी सुरु झाली. मुलीला एक छान सरप्राईज द्यायचे होते त्यामुळे सगळी धावपळ सुरु होती. योगायोगाने एक मावशी सापडल्या ज्या हे सारे पदार्थ तयार करत होत्या. त्यांना आईने ऑर्डर दिली. आता ते सारे पदार्थ मुलीपर्यंत वेळेत पोहोचावेत यासाठी धावपळ सुरु झाली. मुलीला कळू देता तिच्या जेवणाच्या वेळा तपासण्यात आल्या. ती लायब्ररीत अभ्यासाला जाते तर दुपारच्या जेवणाला तिने घरी यावे यासाठी देखील प्लॅन बनविण्यात आला. त्या स्वयंपाक बनविणाऱ्या मावशीला देखील सारख्या सूचना सुरुच होत्या. मुलींचे डबे पोहोचले तरी अजून हे पदार्थ पोहोचले नव्हते त्यामुळे आई कासाविस झाली. मुलीला ते सारे मिळण्याआधी जेवायचे नाही हे तिने ठरविले होते. एकदाचे ते सारे पदार्थ घेऊन त्या मावशी रवाना झाल्या. अजूनही आईच्या जीवाला जीव नव्हता. आणि मग तो क्षण.. मातृदिवसाचा. तो असा स्थिर करून ठेवावा असा क्षण. आई जेवायला बसली परंतू अजूनही जेवण सुरु केले नव्हते आणि मुलीचा फोन आला. आपल्या आईने दिलेल्या सरप्राईजमुळे तिला एवढा आनंद झाला होता की तिच्या तोंडातून शब्द फुटेना. ती फक्त आई तू किती छान आहेस एवढे बोलत राहीली. फक्त तिच नाही तर तिच्या मैत्रीणींनाही सुखद धक्का होता. घरापासून दूर राहणाऱ्या त्या साऱ्याच अश्या सर्व पदार्थांना मुमकलेल्या होत्या बहुदा. सगळ्यांनी मिळून आईचे आभार मानले. माझ्या मुलीच्या तिच्या आईच्या डोळ्यात एकाच वेळी आलेले आनंदाश्रू बघून मला त्याक्षणी जाणविलेमातृदिन असा देखील साजरा होऊ शकतो.

मातृदिन एकाच दिवशी करावा की करु नये यापेक्षाही महत्वाचे आई-मुलांच्या नात्यामधे असे सुंदर क्षण किती मिळवता येतील हे बघणे जास्त महत्वाचे आहे. अश्या सुंदर क्षणांनीच जगातील हे सर्वात श्रेष्ठ नाते फारच आनंददायी ठरु शकते. होय ना?




Comments

  1. 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

    ReplyDelete
  2. Awesome! A small incident described beautifully and skillfully turning it into something important.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23