थोडा है थोडे की जरुरत है @ 10.01.22

मी काय करु? कारण

मन मोकळे करणे ही माणसाच्या जीवनातील एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. वेगवेगळ्या भावभावनांचा प्रवास प्रत्येकच माणसाचा कायम सुरु असतो त्यामधे वेगवेगळ्या संवेदना विचार त्याच्या मनात गोळा होत जातात. यामधे काही आनंदी, काही वेदनादायी, काही उत्साहित करणाऱ्या तर काही कोलमडून टाकणाऱ्या देखील असतात. या सर्व संवेदना मनात बरेचवेळा अजाणतेपणानेही साठविल्या जात असतात. परंतू या सर्व विचारांचा निचरा होणे अत्यंत गरजेचे असते. आणि अनेक लोकांसमोर तीच सर्वात मोठी समस्या असते. ग्रीक तत्त्ववेत्ता यास कॅथारसीस असे म्हणायचा. आपले मन मोकळे करणे जमत नाही त्यामधून मग अनेक समस्या देखील उद्भवतात. नाही म्हणायला सध्या तंत्रज्ञानाच्या या जगात सोशल मिडीयाच्या प्रचंड वापरामुळे मन मोकळे करायला एक संधी प्राप्त झाली आहे. परंतू काही विचार असे असतात की जे आपण सरसकट सर्वांसोबत शेअर करु शकत नाही. ते काही मोजक्या जवळच्या व्यक्तींकडेच मोकळे होऊ शकतात. याकरीता योग्य व्यक्ती मिळणे हा देखील नशीबाचाच भाग आहे. आपले शांतपणे ऐकून, आपल्याला वेड्यात काढता किंवा ताडकन प्रतिक्रीया देता समजून घेणारी त्यानंतर गरज भासल्यास आपल्याला समजावणारी अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणे ही खरोखरच उपलब्धी असते. अर्थात कधीकधी अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असण्याला किंवा नसण्याला आपला स्वभाव देखील कारणीभूत असतो. कारण आपल्यालाही कुणाच्यातरी आयुष्यात असे कार्य करावे लागत असते त्यामुळेच मग नाते कोणतेही असो, याकरीता मैत्रीचा सुंदर बंध निर्माण व्हायला लागतो. अगदी जवळच्या नात्यातील कुणी जरी हे काम करणार असेल तरी त्यासाठी नात्याच्या मर्यादा सोडून मैत्री करावी लागते तेव्हाच मन मोकळे केले जाऊ शकते किंवा तसा विश्वास परस्परांबाबत निर्माण होऊ शकतो. परंतू तसे नसेल तर मात्र असंख्य लोक आजुबाजूला असूनही बरेच वेळा एकटे पडलेले लोक आपल्याला दिसतात. यामधे वय वाढल्यानंतर मनातल्या मनात ठेवलेले विचार त्यापासून होणारा त्रास पचविण्याची सवय तरी होते. परंतू या गोष्टीचा सर्वात जास्त त्रास मुलांना होतो कारण त्यांना समजून घेणारे कुणी भेटले नाही किंवा त्यांच्या मनात डोकावता आले नाही तर त्यांना फार विचित्र समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः वय वाढणाऱ्या अवस्थेत म्हणजेच पौगंडावस्थेत मुलांशी बोलले जाणे, त्यांच्या समस्या समजून घेणे, त्यांना स्पेस देणे, त्यांना सारखे आपण म्हणतो त्याच दृष्टीने वागायला लावणे किंवा अकारण शिस्तीचा बडगा दाखविणे या सर्व बाबी नव्या काळात फारच घातक ठरतात. आपल्याला अंदाजही नसतो की अश्या मुलांच्या मनात काय सुरु असते त्यांचा तो एकटेपणा वाढत जाऊन किंवा त्यांच्या मनातल्या विविध अस्वस्थ करणाऱ्या विचारांना योग्य वळण लागल्यामुळे त्यांच्या मनावर प्रचंड ताण निर्माण होतो. बरेच वेळा अश्या मुलांचे पालक देखील त्यांच्याशी फार बोलत नाहीत, त्यांच्यासोबत वेळ घालवत नाहीत, त्या मुलांचे काय सुरु आहे हे ते बघत नाहीत. त्यांनी केवळ त्याला वेगवेगळ्या ट्युशन्स लावून दिलेल्या असतात त्यांच्या भरवश्यावर त्या मुलाला सोडून दिलेले असते. परंतू प्रत्यक्ष पालक म्हणून त्यांच्या त्याच्या मनोविश्वामधे काहीच सहभाग नसतो. आणि सहभाग द्यायचा प्रसंग आला तर ते त्याला वेगवेगळ्या सूचना देऊन, त्याला नको असलेले तत्वज्ञान सांगून किंवा आदर्श मुलगा बनण्याचा अनाकलनीय आग्रह धरून किंवा शेवटी रागावून मनातून खचवून टाकतात. त्यांच्या शिस्तीच्या बडग्यापुढे तो नमतो परंतू मनातून मात्र तो कोलमडलेला असतो. कुणाशी मैत्री करायची त्यामधून मनाला आधार शोधायचा एवढी विचारांची खोली त्याची नसते. त्याचे मित्रमंडळींसोबत भांडणे होतात, तो त्यामुळे आणखी सैरभैर होतो, काही मुले एकत्रीत येऊन त्याला त्रास देतात, त्याला नको नको ते बोलतात, त्याला त्यांना उत्तरे देता येत नाहीत, मग तो आणखीनच गोंधळतो मग सर्वांपासून तो तुटू लागतो. मित्र मैत्रीणी नाही, घरी आई वडील त्याच्यासोबत नाहीत, आणि त्याच्या मनात प्रचंड गोंधळ माजलेला. अश्या वेळी त्या चिमुकल्याने काय करावे? किती मोठा प्रश्न आहे हा? असा प्रश्न आपल्या देशातील कितीतरी लहान मुलांसमोर वासून उभा आहे. या कोरोना काळामधे तर या अश्या एकाकी राहणाऱ्या मुलांना हातात मोबाईल नावाचे एक यंत्र मिळाले आहे. आता त्यावरून त्यांना काय काय नि कसे कसे बघायला मिळते ते सांगताच येत नाही. परंतू त्यामुळेही या समस्येचे समाधान मिळत नाही. प्रत्यक्ष नि सहानुभूतीपूर्वक संवाद हाच यावरचा रामबाण उपाय आहे. परंतू तो साधायला मोठ्या लोकांकडे वेळच उरलेला नाही कारण ते त्यांच्याच वेगवेगळ्या समस्यांमुळे ग्रस्त आहेत. परंतू या समस्या किती विचित्र आणि गंभीर राहू शकतात याचा अंदाज अनेक पालकांना किंवा मोठ्या जाणकार लोकांनाही बरेच वेळा येत नाही. पण तो एकटा चिमुकला मात्र कुठेतरी आपले मन मोकळे करतो

असाच एक चिमुकला मला एका पहाटे भेटला. त्याने केलेली कृती मला क्षणार्धात धोक्याचा इशारा देऊन गेली. खरे तर पहिल्यांदा मला जेव्हा तो दिसला तेव्हा मी त्याच्या कडे दुर्लक्षच केले कारण मी देखील घाईतच होतो परंतू दुसऱ्यांदा जेव्हा तो तीच कृती करताना मला दिसला तेव्हा मात्र मला माझ्या मानसशास्त्राच्या अभ्यासातील काही गोष्टी पटकन आठवल्या मला ती समस्या लक्षात आली. लहान मुलांच्या वेगवेगळ्या समस्यांबाबत मला भरपूर अभ्यास करायला मिळाला होता त्यामुळे त्यांच्या काही विशिष्ट कृती या अश्या एकटेपणाचा ताणग्रस्त मनाचा इशारा देतात हे मला सुदैवाने ठाऊक होते. खरे तर या मुलांचे वागणे बारकाईने बघितले तर समस्या कुणाच्याही लक्षात येऊ शकते. परंतू त्या दृष्टीने विचार करायला वेळ नसेल किंवा त्याची प्राथमिकता नसेल तर मात्र समस्या आणखीनच गडद होत जातात. अनेक वेळा तर या अश्या प्रकारच्या काही समस्या आहेत हे देखील मानायला पालक तयार नाहीत. ते अजूनही आजच्या पिढीच्या मुलांची स्वतःच्या बालपणाशी तुलना करून सटकन वार करतात. मुलांचा हा सगळा फालतूपणा आहे, मन मोकळे करता येत नाही ही काय समस्या आहे का? आमच्या वेळी तर असे काही नव्हते, जास्त लाडावलेपणाची ही सारी लक्षणे आहेत अशी पल्लेदार वाक्ये टाकून हे पालक बिचाऱ्या समस्याग्रस्त चिमुकल्यांना आणखीनच कोलमडून टाकतात. असे झाले की तो मुलगा डीप्रेस होऊ लागतो, त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही, त्याच्या जीवनाचा आनंदच हरवून जातो तो एकटा कडाक्याच्या थंडीत ट्युशनला जाण्यासाठी घरातून बाहेर तर पडतो परंतू तेथे जाता रस्त्यावर धुके असताना, रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या कार्स उभ्या असताना ती कृती करतो, जी बघून मी दचकलो होतो. सतत दुसऱ्या दिवशी मला तो तेच करताना दिसला. त्याक्षणी मी माझी सायकल थांबविली आणि त्याला हाक दिली.. बेटा, काय करतोस? काय नाव तुझे? पुढे त्याने मला जे सांगितले ते मात्र खरोखरीच मला विचार करायला लावणारे होते…. त्याचे वाक्य होतेकाका, मी काय करु? कारण (क्रमशः)





Comments

  1. सध्या ही परिस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. स्पर्धेचे जग आहे. आणि या काळामध्ये पालकांना वाटते की, आपल्या मुलांना चांगल्या कोचिंग क्लासेसला ट्युशन लावली की, तो घडतो, पण असे होत नाही. त्याचीशी संवाद महत्त्वाचा आहे, त्याबाबतची आपण उत्तम प्रकारे आपल्या लेखांमधून मांडणी केली आहे. सर्व पालकांनी हा लेख वाचावा अशी माझी विनंती आहे.

    ReplyDelete
  2. Alarming,very true,awaiting for next.......

    ReplyDelete
  3. Sir saglyacha palkanna aasa sanwad jmelcha ase watat nahi tyamulech counseling ha marg sangta yeil

    ReplyDelete
    Replies
    1. Absolutely but some of the parents are not even ready to understand that their kids need counselling..

      Delete
  4. खूप छान लिहले दादा very nice

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23