थोडा है थोडे की जरुरत है @ 01.02.22

काचेवरचं दव

पहाटेच्या थंडीत सायकल चालवित जाताना मला तो पहिल्यांदा दिसला तेव्हा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतू दुसऱ्याही दिवशी त्याची तीच कृती मला जरा विचारात टाकून गेली. म्हणून मी थांबलो. थंडी बरीच होती आजकाल घरात पार्कींग नसल्याने कार्स रस्त्यावरच पार्क केलेल्या असतात. थंडीमुळे त्या कार्सच्या काचांवर दवं पडलं होतं. आधल्या दिवशीही मला जाणवले होते की तो मुलगा त्या कार्सच्या काचांवर काहीतरी लिहीतोय. पण एक सहजच घडणारी गोष्ट म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतू दुसऱ्याही दिवशी तो मला तेच करताना दिसला तेव्हा मात्र मी जरा थांबलो. रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या प्रत्येक कारच्या काचांवर तो काहीतरी लिहीत होता पुढे जात होता. मी थांबून बारकाईने बघितले त्याने लिहीलेले वाक्य वाचल्यावर मात्र मला त्याला भेटण्याची इच्छा झाली. तो पुढे पुढे जात होता मी त्याच्या नकळत माझी सायकल हातात धरून त्याच्या मागे जाऊ लागलो. माझ्या लक्षात आले की तो सारखी दोन वाक्ये लिहीतो आहे. एकदा एका गाडीवर एक दुसऱ्या गाडीवर दुसरे. पुन्हा पहिले वाक्य असे त्याचे सुरु होते. पहिले वाक्य होते, आय ॲम सॅड आणि दुसरे वाक्य होते आय ॲम अलोन. इंग्रजी माध्यमात शिकणारा तो मुलगा असावा हे मी ओळखले. साधारण काही वेळातच कार्स संपल्या तो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बंद दुकानाच्या पायऱ्यांवर जाऊन बसला. मी देखील त्याला सहजच वाटेल अश्या पद्धतीने त्याच्या थोड्या अंतरावर बसलो. सोबतचे पाणी पिऊ लागलो त्यामुळे मी मुद्दाम बसलोय असा संशय त्याला आला नाही. काही मिनीटांनी सहजच चौकशी करावी म्हणून मी त्याच्याशी बोलणे सुरु केले.

त्याने त्याचे नाव, कुठे राहतो, वडील काय करतात वगैरे सांगितले. पण नंतर मात्र तो खोटे बोलला. तो मला म्हणाला की त्याला ट्युशनला जायचे होते. परंतू उशीर झाला त्यामुळे ट्युशनच्या सरांनी वर्गात येऊ दिले नाही. आता घरी गेलो तर बाबा रागवतील म्हणून तो तेथे बसला आहे. आता मात्र त्याच्याशी थेट बोलायची वेळ आली होती म्हणून मी त्याला त्या कार्स वर लिहीलेल्या वाक्यांबद्दल विचारले. सुरुवातीला तो ओशाळला. त्याने ते लिहील्याचे नाकारले. पण मी ती वाक्ये सांगितल्यावर मात्र त्याने कबूल केले. त्याचे नाव मला कळले असल्याने त्याला नावाने हाक मारुन मी त्याला बेटा काय झाले तुला? मला सांग मी तुझ्या बाबांसारखाच आहे. साधारण संवाद सुरु करण्याच्या दृष्टीने जसे बोलावे तसे मी बोललो होतो. परंतू तो ताडकन उद्गारला, अजिबात नाही काका, तुम्ही माझ्या बाबांसारखे नाही, माझे बाबा माझ्याशी बोलत नाहीत, ते फक्त रागावतात. या त्याच्या प्रत्युत्तरामुळे मी चमकलो पण त्यामुळेच त्याच्या सोबतच्या संवादाचा मार्ग मोकळा झाला.

बरं, बेटा आता तू मला काका म्हणले आहेस तर काका म्हणून सांग. काय झालेय तुला? तू कशामुळे दुःखी आहेस आणि तुला एकटेपण का जाणवतेय? मला सांग. मला जमेल तशी मी तुला मदत करीन. माझ्या त्या आश्वासक वाक्यांमुळे कदाचित त्याला माझ्याबद्दल आपलेपणा वाटला असावा कारण त्यापुढील अर्धा तास तो मला त्याच्या जीवनात त्याला वाटणाऱ्या एकटेपणाची दुःखी असण्याची कारणे सांगत होता. तसे बघता त्याची समस्या ही अनेक मुलांना असते तशीच होती परंतू त्याच्या समस्येकडे कुणाचेही लक्ष नव्हते त्यामुळे त्याला प्रचंड एकटे वाटत होते. समस्या अगदी छोटीशी असली तरी त्याबद्दल मन मोकळे करायला जर कुणी मिळाले नाही किंवा कुणी सहानुभूतीने ती ऐकूनच घेतली नाही तर ती कशी मोठी होते याचे तो मुलगा खरे खुरे उदाहरण होता.

वडीलांच्या आग्रहामुळे याच्या जीवनाबद्दल ते बघत असलेल्या अवास्तव स्वप्नांमुळे त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देण्यात आला. त्याला जे विषय आवडत नाहीत तेच विषय त्याने अभ्यासावे त्याच्याच आधारे त्याने वडील म्हणतील त्या कोर्सला प्रवेश घ्यावा असा आग्रह त्याला करण्यात आला. परीणाम तोच झाला जो अश्या प्रकरणांमधे होतो. त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही. त्याला काहीच समजत नाही. मग मार्क्स कमी मिळाले म्हणून जास्तीत जास्त पालक करतात तोच उपाय त्याच्याही वडीलांनी केला. त्याला त्या सर्व विषयांच्या ट्युशन्स लावून दिल्या. परंतू ते विषयच त्याला आवडत नसल्याने एवढ्या लहान वयापासून त्याच्या खांद्यावर स्पर्धेचे पुढील आयुष्याच्या यशस्वीतेचे ओझे ठेवल्यामुळे तो चिमुकला पार खचून गेला. एकुलता एक मुलगा असल्याने वडीलांची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी त्याचीच असल्याने वडील सारखे त्याला प्रेशराईज करतात. ऑफीसमधून घरी आल्यावर त्यांचे पहिले वाक्य असते, अभ्यास केला का? हात पाय ही धूता ते त्याला सोबत बसवून काय काय अभ्यास केला याची झाडाझडती घेतात. त्याने जर त्यांच्या अपेक्षेनुसार अभ्यास केला नसेल तर ते त्याला रागवतात प्रसंगी थोबाडीतही मारतात. वडीलांनी घरात स्वतःची कडक प्रतिमा बनविलेली असल्याने त्याची आई देखील या सर्व प्रकारामधे काहीच बोलत नाही. तिने देखील त्याला सांगून दिलेय की तुझ्या बाबांना तू एक मोठा माणूस झालेला बघायचे आहे त्यासाठी ते म्हणतात तसे तू कर. मी या बाबत काहीच करु शकत नाही. त्यामुळे वडीलांच्या कचाट्यातून सुटण्याचा साधारणपणे आई हा एक मार्ग असतो जो याच्यासाठी बंद झालेला आहे. या सर्व गोष्टींचे त्याच्यावर फार मोठे टेन्शन आहे त्यामुळे तो आता सगळ्या गोष्टींपासून पलायन करतो आहे. तो मित्रांशी बोलत नाही कारण त्याचे वडील कुणाकडे त्याला वेळ उगाच जातो म्हणून जाऊ देत नाहीत. सर्वच मुले इन्स्टाग्राम वापरतात पण याला तसे काहीही वापरण्याची मनाई आहे. त्याला केवळ ऑनलाईन क्लास अटेंड करण्यापुरता मोबाईल दिला जातो. त्यामुळे बाकी मुले काय बोलतात, कशा बद्दल बोलतात ते त्याला कळत नाही. मग याला काहीच माहीत नसल्याने मुले याला वेड्यात काढतात. त्यामुळे तो त्यांच्यापासूनही तूटला आहे. म्हणूनच ट्युशनला जाता तो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार्सच्या काचेवर तो आय ॲम सॅड आणि आय ॲम अलोन असे लिहून आपले मन मोकळे करतो

खरे सांगतो, त्या पहाटेच्या वेळी थंडीमुळे नव्हे तर या चिमुकल्याची ती वेदना ऐकून माझ्या अंगावर काटा आला. आपण खरोखरीच आधुनिक काळात आलोय? हातात आलेल्या आधुनिक मोबाईल किंवा अद्ययावत गाड्यांवरून तर निश्चित जाणवते परंतू आधुनिक काळात लागणारी संवेदनशीलता मात्र बहुदा या वेगवान प्रवासात मागेच राहून गेलीय. आजही आपल्या स्वप्नांना पूरे करण्यासाठी मुलाला अश्या प्रकारे प्रेशराईज करणारे वडील असतील तर अजूनही बरेच काम शिल्लक आहे असे मला वाटू लागले. आणि चांगल्या सांपत्तिक स्थितीमधे असलेल्या एखाद्या अश्या चिमुकल्याला आपण दुःखी आहोत हे सांगण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या कार्सच्या काचांवर ते लिहावे लागत असेल तर ही स्थिती निश्चितच चांगली नाही. त्या चिमुकल्याच्या वडीलांना योग्य पद्धतीने साऱ्या गोष्टी सांगण्याचे काम मी त्यांच्या माझ्या एका समान मित्राच्या मदतीने केले. सुदैवाने त्यांना त्यांची चूक लक्षात आली. मला सांगणारे तुम्ही कोण असा भाव त्यांनी निर्माण केला नाही. बरेच वेळा तो देखील निर्माण झाल्यामुळे समस्या सुटत नाहीत. मी ती समस्या सोडवू शकलो याचे समाधान आहेच पण

थंडी अद्याप कमी झालेली नाही, काचेवर दवं पडतेच आहे. चला तर मग, अश्या कुठल्या काचेवर कुणी चिमुकला आय ॲम अलोन असे लिहीत तर नाही ना? याची काळजी घेऊयात




Comments

  1. हो नक्कीच. माझ्या विद्यार्थ्यां करिता असा प्रयत्न करण्याचा प्रसंग येतो.

    ReplyDelete
  2. Very sensitive & Thought provoking indeed ! Sir you are fabulous !

    ReplyDelete
  3. आजचे दव , हा लेख सर खरंच खूपच हेलावणारा आहे . अनेक समस्या पालकांना वेळीच कळतात , ते सुदैवी . तुमच्यासारखे भेटले हे नशिब .
    अनेक पालकांना वेळ निघून गेल्यावर
    समस्या कळते ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23