थोडा है थोडे की जरुरत है @ 04.01.22

मनाची उभारी..

मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे वर्षाच्या शेवटच्या रविवारी एका चहाच्या दुकानात त्या तरुणांच्या समुहाचा गोंधळ अनुभवल्यानंतर मन खिन्न झाले. ज्या क्षेत्राचे या सर्व बाबींकरीता सर्वात जास्त योगदान आहे त्या शिक्षण क्षेत्रात मनापासून काम करीत असूनही असे चित्र बघायला मिळावे ही वेदनादायी बाब होती. माझा मागचा लेख वाचल्यावर अनेकांनी प्रतिक्रीया देताना त्यांनाही अश्याच प्रकारचे अनुभव आल्याचे मला कळविले. याचा अर्थ अश्या बाबी वरचेवर घडत आहेत. याबाबत आणखी जास्त काम करणे गरजेचे आहे महाविद्यालयीन व्यवस्थांमधेच या तरुणांना योग्य मार्ग दाखविणे गरजेचे आहे असा विचार मनात डोकावला. परंतू त्या अनुभवाने खिन्न होऊन आम्ही अमरावतीच्या छत्रीतलावाकडे निघालो. तेथे पोहोचल्यावर मात्र मला तरुणाईचे एक नवे मनाला उभारी देणारे रुप दिसले. त्या चहाच्या दुकानातल्या एका प्रसंगाने मी खिन्न झालो होतो परंतू येथे मला तरुणांचे दोन समुह दिसले जे असे काही करत होते ज्यामुळे खरोखरीच मनाला दिलासा मिळाला.

छत्री तलावा नजीक गेल्यावर मला छान ढोल ताश्यांचा आवाज येऊ लागला. मला कळेना की सध्या कोणताही उत्सव नसताना हा कशाचा आवाज येतोय. मी जवळ गेल्यावर मला जे चित्र दिसले ते फारच सुंदर होते. त्या ठिकाणी साधारण वीस पंचेवीस तरुण तरुणी ढोल ताशाची प्रॅक्टीस करत होते. तरुणांसोबत काही तरुणी देखील खांद्यावरुन दोर बांधून मोठाले ढोल वाजवित होत्या. अतिशय शिस्तीमधे त्यांची ती प्रॅक्टीस सुरु होती. त्यांचा प्रशिक्षक त्यांना योग्य पद्धतीने ढोल वाजविण्याची तालीम देत होता. वेगवेगळे ताल वाजविणे त्यांचे सुरु होते. हळू हळू वाढत जाणारी त्यांच्या वादनाची लय तेथे उपस्थित प्रत्येकाचे पाय थिरकवित होती. मोठाले ढोल असुनही मोठ्या हिमतीने ताकदीने त्या मुली देखील वाजवित होत्या. त्यांच्या सोबत मुले देखील आपले कसब दाखवित होते. एकंदरीत सर्वांना सुखावणारा तो सारा प्रकार होता. मधे त्यांचा ब्रेक झाला तेव्हा मी त्या प्रशिक्षकास विचारले तर त्याने जी माहिती सांगितली ती खरोखरीच माझ्या मनावर चहाच्या दुकानात आलेली खिन्नता घालविणारी होती. तो मला म्हणाला की या समुहामधे वेगवेगळ्या महाविद्यालयांमधील विद्यार्थी आहेत. काही नोकरी करणाऱ्या मुली मुले आहेत. हे सारे प्रत्येक शनिवार रविवारी छत्री तलावाच्या त्या गेट जवळ जमतात ढोल ताशाची प्रॅक्टीस करतात. त्यांचे ते ढोलपथक त्यांनी बऱ्याच दिवसांपासून तयार केले आहे. गणपती किंवा दुर्गा देवीच्या किंवा इतरही मिरवणूकांमधे ते सहभागी होतात. त्याचे त्यांना मानधन मिळते. मग त्या मानधनाचा काही भाग त्यांचे ढोल ताशे नीट करण्यासाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी वापरला जातो त्यानंतर सदस्यांना देखील ते मानधन देतात. परंतू मानधन हा त्यांचा मूळ हेतू नाही. तरुण मुला मुलींना एका अत्यंत आकर्षक क्रियाशील उपक्रमामधे सहभागी करून घेणे हा त्यांचा हेतू आहे. तो प्रशिक्षक मला म्हणाला की हे सहभागी होणे सोपे नाही किंवा तो ढोल कंबरेला बांधून वाजविणे यासाठी प्रचंड एनर्जी लागते. परंतू तेथे ती मुले मुली ताकदीने ते करत होते. चहाच्या दुकानात मला दिसलेल्या सिगरेटी पिऊन छातीचा खोका करून घेणाऱ्या तरुणांपेक्षा हे फारच वेगळे होते. येथे मजा, मस्ती, धमाल, धुंदी हे सारे काही होते परंतू त्याला एक शिस्त होती त्या शिस्तीमुळे ते चित्र प्रचंड रोमांचकारी, बघणाऱ्यालाही धुंद करणारे परंतू सुखावह आणि मनाला उभारी देणारे होते

मनाला छान वाटल्यावर आम्ही छत्री तलावाच्या निर्माणाधीन भागाकडे फिरायला गेलो. तेथे आणखी एक नवा अनुभव मिळाला माझ्या मनाला दिलासा देणारे ते चित्र बघितल्यावर नव्या वर्षाच्या शेवटच्या रविवारी मी सकारात्मक उर्जा घेऊन घरी आलो.

दूरवरुन आम्हाला गाण्याचा आवाज येऊ लागला. छान छान नवी जुनी गाणी समुहामधे गायल्या जात होती. हळू हळू त्या गाण्यांच्या दिशेने गेल्यावर तेथे काही मुलांचा आणखी एक समुह दिसला. ते सर्वजण मिळून गाण्यांचा सराव करीत होते. त्यात तीन चार गिटार वाजवत होते, दोघा जणांनी बॉक्स रीदम सांभाळला होता, आणि त्या सुंदर ठेक्यावर एकाहून एक सुंदर गाणी ते सारे जण म्हणत होते. सूर्य अस्ताला जात असताना त्याच्या विविध रंगांचे सुरेल प्रतिबिंब त्या तलावाच्या पाण्यावर पसरलेले होते. आकाशामधे त्या शांत पाण्यामधे जणू चित्रकाराचा कुंचला एकाच वेळी फिरला असावा असे सुरेख चित्र डोळ्यासमोर असताना त्याला या सुरेल गीतांची जोड मनाला फार सुखावत होती. लताबाईंच्या अजिब दास्ताँ है ये पासून ते किशोर कुमारच्या पल पल दिल के पास पर्यंत, पॅपॉनच्या मोह मोहके धागे पासून ते अरीजित सिंह च्या क्यू की तुम ही हो, मेरी आशिकी अब तुम ही हो पर्यंत बढीया गाणी ऐकायला मिळत होते. त्या सर्व गाण्यांचा गलका नव्हता तर मनाला छान वाटेल एवढ्याच आवाजात ती मुले ही सारी गाणी म्हणत होती. एका गाण्यातून दुसऱ्या गाण्यात शिरण्याचे त्यांचे कसब फार छान होते. काही वेळ तो सुंदर सुर्यास्त या तरुण मलांच्या गाण्यांसोबत अनुभवल्यावर आम्ही परत निघालो तेव्हा ती मुले देखील निघाली. त्यांच्यापैकी एकाला मी या प्रकाराबद्दल विचारले. तो म्हणाला की ती सारी मुले एका गिटार क्लास चे विद्यार्थी आहेत प्रत्येक शनिवार रविवारी ते छत्री तलावाच्या त्या ठिकाणी येतात अश्याच प्रकारे मस्त सराव करतात. त्यांचा तो ग्रुप आहे जो वेगवेगळ्या इव्हेंटला कार्यक्रम सादर करतात किंवा त्यातील काही मुले ओपन माईक इव्हेंटमधेही भाग घेतात. महाविद्यालयांमधे शिकणारी ती सारी मुले आहेत परंतू इतका छान उपक्रम चालवितात आणि अश्या प्रकारे संगीताचा सराव करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या शनिवार रविवारी छत्री तलावावर फेर फटका मारायला येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या या उपक्रमामुळे फार आनंद मिळतो

तरुणाईची दोन वेगवेगळी रुपे मला एकाच दिवशी बघायला मिळाली एका नकारात्मक चित्रामुळे मनावर आलेली निराशा पुसणारी दोन अत्यंत दिलासादायत चित्रे अनुभवायला मिळाली. आपण या सकारात्मक चित्रांचाच जास्त विचार करणार आहोत. कारण तरुणाईची ही सकारात्मक उर्जाच आपल्याला ते नकारात्मक चित्र सुधरविण्यास मदत करणार आहे. हा बदल निश्चित होऊ शकतो. आपण सर्वांनी हे असले नवनविन आधुनिक पर्याय मुला मुलींना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. चांगुलपणाचे फक्त डोज देऊन चालणार नाही. त्यांना सकारात्मकतेने क्रियाशील बनविण्याकरीता हे असले चांगले पर्याय त्यांना द्यावे लागतील त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी उभे रहावे लागेल. या दोन्हीही समुहामधे केसांची स्पाईक स्टाईल केलेली काही मुले होती. पण त्यांच्या त्या गोष्टींकडे जरा दुर्लक्ष करून त्यांच्यामधील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली उर्जा योग्य दिशेने वळविण्याकरीता आपण पूर्ण प्रयत्न करायला हवा. त्या सकारात्मक मनाला उभारी देणाऱ्या अनुभवांनंतर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचे हेच रीझोल्यूशन मी मनाशी ठरविले. आपल्या सर्वांना हे ठरवावे लागेल. तसे झाल्यास ही तरुणाई कमालीची सकारात्मक होऊन अनेक बाबतीत आपल्याला समाधानी करु शकते हा दृढ विश्वास मनाशी बाळून मी त्या मुलांनी म्हणलेलेच जिंदगी….कैसी ये पहेली हाये, कभी तो हँसाये, कभी ये रुलाये….हे गाणे गुणगुणत घराकडे निघालो.





Comments

  1. अतिशय सुंदर. आजच्या तरुण, तरुणाईला योग्य मार्गदर्शन करणारे यांची गरज आहे. ऑनलाईन किव्हा गुगल सर्च वरून पिढी त बदल होणार नाही. भारतीय संस्कृती नुसार योग्य दिशादर्शक गुरूंची आवश्यकता आहे, असे मला वाटते.

    ReplyDelete
  2. खूप छान ...
    एक सकारात्मक ऊर्जा कशी आणि कुठून मिळवावी..गे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे sir...
    ओसाड बागेत खूप कचरा असताना..त्यातील फक्त चाफा वेचून त्याचा सुंगंध मनाला कसा आनंद देईल..तसा अनुभव तुमच्या लेखातून येतो..
    खूप खूप धन्यवाद🌷🌷🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23