थोडा है थोडे की जरुरत है @ 24.08.21

आठवण

आठवण येतेच गं, पण अडकून गेलोय जरा कामात. यावर्षी ठरवले होते पक्के की काहीही झाले तरी तुझ्याकडे यायचे. मी तर आधीपासून सांगून ठेवले होते माझ्या बॉसला की या वेळी ऑगस्ट महिन्यात मला तीन दिवस सलग सुट्या हव्यात. किती वर्षे झाली ना? पण या वर्षीचे मात्र पक्के ठरले होते. पण काय करु व्हायची ती गडबड झालीच. नेमकी कंपनीमधे आमच्या मूळ कंपनीच्या लोकांची व्हीजीट ठरली. मल्टीनॅशनल कंपनी आहे ना आमची. सगळी मॅनेजमेंट तिकडची परदेशातली. त्यांना काय महत्व आपल्या सणांचे. त्यांची व्हीजीट ठरली आणि मी इथला सेक्शन हेड असल्याने बॉसने मला सांगितले की या व्हीजीटचे फार महत्व आहे. यामुळे एक नवीन डीव्हीजन सुरु होणार आहे कंपनीमधे आणि म्हणून या व्हीजीटच्या वेळी माझे हजर राहणे गरजेचेच आहे. निर्णय मात्र त्याने माझ्यावर सोडला. मला पण सुचेना की काय करायचे. मग शेवटी विचार केला की यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी मला तुझ्याकडे येता येईल परंतू ही व्हीजीट पुन्हा होणार नाही. मी नसताना काही गडबड झाली तर उगाच मलाच बोल लावतील लोक. म्हणून मग शेवटी माझे तुझ्याकडे येणे रहीत केले. पुढच्या वर्षी नक्की जायचे असे ठरविले तेव्हा मनाला जरा दिलासा मिळाला. काय करु? कामाचे प्रेशर एवढे जास्त आहे की सध्या माझे स्वतःचे असे आयुष्यच उरलेले नाही. जरा म्हणून उसंत मिळत नाही. परफॉर्म करा किंवा बाजूला व्हा अशीच स्थिती झालीय. कोरोना काळात कंपनीला झालेले नुकसान आता दुप्पट कामे करून भरून काढा असे आदेश आहेत. जे लोक परफॉर्म करत नाही त्यांना सरळ कामावरून कमीच करत आहेत. अश्या वेळी फार प्रेशर वाढतेय मनावर. त्यामुळे ही कंपनीत होणारी व्हीजीट फारच महत्वाची आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की मी तुझ्याकडे येऊ नये. किंवा असे पण वाटून घेऊ नको की मला तुझ्याकडे येण्यापेक्षा कंपनीची व्हीजीट महत्वाची वाटतेय. पण मी येत नाहीये याचा अर्थ मला जमतच नाहीये असाच आहे हे तूला ठाऊक आहे ना? आज खरे तर कंपनीत जाताना हे सारे विचार मनात येत आहेत म्हणूनच तुला मेसेज करायचा ठरविले. बोलत मुद्दाम नाही कारण मला ते जमणार नाही. आज यावेळी मी तुझ्याकडे असायला हवे होते. तू नेहेमीप्रमाणे खूप सारी तयारी केली असणार. मला माहित आहे तू किती तयारी करते. सारे काही माझ्या आवडीचे बनविले असणार, माझ्यासाठी काहीतरी निवडून निवडून घेतले असणार. मला आवडतात म्हणून खूप मेहनतीने चिरोटे आणि ते देखील खास खरपूस तळलेले बनविले असणारच. मला सारे ठाऊक आहे. म्हणूनच आज तुझ्याशी बोलण्याची हिंमतच होत नाहीये. अपराधी वाटू लागलेय. कंपनीच्या कामाच्या नादात मी माझ्या आयुष्यातील महत्वाचे क्षण गमावतोय असे पण वाटतेय. परंतू काम केले नाही तर कंपनीने बाहेरचा रस्ता दाखविलेले माझे सहकारी आठवले की मी माझ्या मनातल्या हे क्षण गमावण्याच्या सर्व भावना गुंडाळून ठेवतो आणि शंभर टक्के व्यावहारिक विचार करायला लागतो. एरवी मी त्याबद्दल विचारही करत नाही पण आजची गोष्ट वेगळी आहे. आज खरोखरीच वाईट वाटतेय. मला तू समजून घे असे म्हणणे देखील जड जातेय परंतू तूझ्या स्वभावावरून तू ते नक्की करशील हे मला माहित आहे. आज मी येऊ शकलो नाही याचे मला जेवढे वाईट वाटतेय तेवढेच तुला पण वाटत असणार. तुझ्यापेक्षा वयाने मोठा असलो तरी मी तुझी माफी मागतो. मला समजून घेशील याची खात्री आहे. घेशील ना? भेटूयात नक्की. पुढच्या वर्षी!!

काय हे बोलणे? तूझे जमणार नाही म्हणल्यावर मी नाराज झालेली आणि त्यात हा मेसेज. पार रडवलेस तू मला. तू म्हणालास त्याप्रमाणे यावर्षी तू नक्की येणार असे वाटले होतेच. त्यानुसार माझी भव्य तयारी सुरु पण झाली होती. माझ्या तयारीला भव्य हे विशेषण घरातील सर्वांनीच दिले. कारण माझे सुरुच तसे होते. काय करु नि काय नाही असे होऊन गेले होते बघ. एक तर किती वर्षांनी तू येणार, शिवाय अश्या चांगल्या दिवशी. मग मी तयारी करणारच ना? गेला आठवडाभर माझा आजच्या दिवसाची वाट बघण्यात आणि तयारी करण्यात गेला. पण हे सारे मी तुला तुझ्या मनातील अपराधीपणाची भावना वाढावी म्हणून सांगत नाहीये बरं. तुझा मेसेज वाचून तू मला किती छान ओळखतोस हे सांगतेय. अपराधी कशाला वाटून घेतोस. आयुष्य पुढे पुढे सरकायला लागले की असे व्हायचेच. भेट झाली असती किंवा क्षण जगता आले असते तर फार आनंद झाला असता याबाबत शंकाच नाही परंतू ते क्षण जगता आले नाही याचे वाईट वाटण्या इतपत आपल्या संवेदना अजूनही टिकून आहेत ही मोठी बाब आहे. काळ खरच बदलला आहे आणि तू जे काम करतो तेथे डोक्यावर टांगती तलवार असते हे देखील मी जाणते. आता तू एका परीवाराचा प्रमुख आहेस आणि त्यामुळे त्या सर्वांचे भविष्य आणि सुस्थिती टिकवून ठेवणे ही देखील तुझीच जबाबदारी आहे. किती वर्षांपासून तू हे करतोय. किती प्रचंड मेहनत घेतलीस आणि स्वतःला सक्षम बनविलेस. कामाच्या बाबतीत तू किती समर्पित आहेस हे मला चांगलेच ठाऊक आहे त्यामुळे त्या अनुषंगाने तुझ्यावर जबाबदाऱ्याही वाढतच राहतात. मला तुझ्या त्या सचोटीने काम करण्याच्या स्वभावाचा नेहेमीच अभिमान वाटत आलाय. भान हरपून काम करणे जर समजून घ्यायचे असेल तर केवळ तुला बघावे असे मी सर्वांनाच सांगत असते. पण खरे सांगू, आज तू माझ्यासोबत असायला हवा होतास. रात्री तुझा मेसेज आला नि खूप वाईट वाटले. माझ्या गंगा जमुना वाहून गेल्या. तूच दिलेली उपमा आहे ती माझ्या अश्रूंना. पण त्यांना थांबवू शकले नाही. पण आज तुझा मेसेज वाचल्यावर मन शांत झाले. आतापर्यंत तू घरासाठी, परीवारासाठी केलेले कष्ट आठवले त्यामुळे तुला जेव्हा नाईलाज होतो तेव्हाच तू असे करतो हे देखील मला ठाऊक आहे. पण हल्ली तुझा नाईलाज होण्याचे प्रमाण वाढतेय. एका प्रचंड स्पर्धेच्या आणि ताणाच्या अवस्थेमधे तुला काम करावे लागतेय याची मला जाणीव होतेय. एक सांगू? तुझे या प्रसंगी माझ्याकडे येणे तुझ्यासाठी खूप मोठे रीलॅक्सेशन राहील असेही मला वाटले होते. दोन दिवस तुला जरा निवांत राहता येईल, तुझ्या रोजच्या कामातून मनाने तुला मोकळे होता येईल म्हणून मी तुझ्या दोन दिवसाच्या मुक्कामाच्या प्रत्येक मिनीटाची योजना बनविली होती. मेनू पासून तर भटकायला कुठे जायचे हे देखील ठरले होते. आपल्या आवडत्या टेकडीवर तर भल्या पहाटे फक्त तुलाच घेऊन जायचे असे पण ठरविले होते. पणहरकत नाही. तूझ्या कामाचे स्वरुप मला माहित आहे त्यामुळे मी समजू शकते आणि हो तू म्हणल्याप्रमाणे मीच समजू शकते. अपराधी वगैरे वाटू देऊ नकोस रे. आता तू माझ्या सोबत नसल्यामुळे मला जे वाटतेय, अगदी तस्सेच तुला पण वाटतेय, तेवढ्याच तीव्रतेनेयातच सारे आले. मला अजून काय हवंय? भेटूयात नक्की.. पुढल्या वर्षी!!

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी भावा बहिणींमधे हा असला संवाद कित्येक घरांमधे झाला असणार. असला संवाद घडण्याइतपत संवेदना टिकली तरी अत्यंत व्यावहारिक आधुनिक काळात आपण खूप काही टिकविले असे म्हणावे लागेल. होय ना?





Comments

  1. सत्य परिस्थितीचं वर्णन अगदी नेमक्या शब्दात केलं आहे. खूप सुंदर 👌🏼

    ReplyDelete
  2. खरच आहे हे सगळ. खूप छान.

    ReplyDelete
  3. Excellent article depicting benevolent affection between brothers and sisters. Thanks a lot Sir for awakening our fond memories

    ReplyDelete
  4. शब्द वेगळे असू शकतात पण भावना मात्र वेगळ्या नाहीत, आजची वस्तुस्थिती अचूक मांडली आहे. ही संवेदना भाषे पुरती असू नये म्हणजे झालं

    ReplyDelete
    Replies
    1. आपण प्रयत्न केला तर ती तशी राहणार नाही..

      Delete
  5. "माझा pen तु का वापरला?"
    "माझी racket का लपवून ठेवली?"
    " 5 star.. खाऊन घे पटकन, अर्ध ठेवलय तुझ्या साठी fridge मधे!"

    "तो मुलगा जरा जास्तच येतो आपल्या घरी हल्ली, सारख काय काम असत ग त्याच तुझ्या कडे?"
    "माझी मैत्रिण विचारत होती.. तुझा दादा कुठे असतो Godrej की MSEB?"

    "ह्यावेळी नाही जमणार रे माझ, सासरची मंडळी येणार आहेत."
    " साळ्याच्या लग्नात 20 दिवसांची सुट्टी झाली, आता लगेच सुट्टी मिळण अवघडच आहे. "

    " admission च्या वेळी किती guide केल मामानी म्हणुन पाहिल्या salary मधुन त्याला मस्त mobile पाठवलाय. "
    " आत्या, तू सांगितल तीच idea use केली आणि guess what.. काय भन्नाट झाला pizza. "

    "तू काळजी करू नको. मी हिला पाठवतो तुझ्याकडे. तुला तेवढीच मदत. "
    " दादा तु बाहेरच बघ. मी राहते आईसोबत हॉस्पिटलमध्ये. "

    Nothing is constant but change..
    सगळीच सृष्टी स्थित्यंतरातून जात असते,
    वृक्ष उन्हा-पावसातही तग धरून उभा राहतो. पानगळ होते.. निसर्गाचा नियमच तो.. पण पुन्हा कालांतराने,
    कोवळी पालवी आणि रंगीबेरंगी फुलांनी
    वृक्ष फुलत असतो.. कारण मुळं घट्ट खोलवर रुजलेली असतात.
    भावा-बहिणीच्या नात्याचेही तसेच.. काळाच्या ओघात priorities बदलतात. पण मनात आपलेपणा झिरपत असतो.
    प्रत्येक वर्षी रक्षाबंधन प्रत्यक्ष राखी बांधून celebrate करता येईलच अस नाही.
    छोट्या छोट्या गोष्टीतून आयुष्यभर हे नात दृढ होत जातं आणि त्यातुन जे समाधान लाभत, त्याला कसलीच तोड नाही.

    ReplyDelete
  6. Khup chhan ...asech nat ast bhavabahiniche ..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23