थोडा है थोडे की जरुरत है @ 03.08.21

प्रतिक्षा

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. आपल्या देशाचे महामहीम राष्ट्रपती एका दौऱ्यांतर्गत त्यांच्या बालपणीच्या गावी गेले होते. उत्तरप्रदेशातील एका छोट्याश्या गावी त्यांचे सुरुवातीचे जिवन व्यतीत झाले. त्याच गावाला भेट देण्यासाठी राष्ट्रपती महोदय गेले होते. त्या छोट्याश्या गावासाठी तो दिवस एखाद्या मोठ्या सणापेक्षा कमी नव्हता. कोरोनाचा काळ असल्याने कार्यक्रमाला फार गर्दी नव्हती परंतू राष्ट्रपती महोदयांच्या बालपणीचे काही सोबती, त्यावेळचे काही लोक आणि सध्याचे काही लोक लहान मुले असा मोजका समुह कार्यक्रमाला उपस्थित होता. एरवी राष्ट्रपती महोदयांचे भाषण आखीव, रेखीव आणि अनेक लोकांच्या अभ्यासपूर्ण परीश्रमातून तयार झालेले असते. कारण बरेच वेळा जेव्हा त्यांना संसदेला संबोधित करावयाचे असते तेव्ही त्यांचे भाषण हे खास करून तयार केले जाते ज्यात धोरणे योजनांचा उल्लेख असतो. त्यांचे भाषण म्हणजे सरकारच्या योजनांची भूमिका मांडणारे ठराविक साचामधील भाषण असते. परंतू त्या दिवशी त्यांच्या त्या छोट्याश्या गावी त्यांनी केलेले भाषण कोणत्याही प्रकारच्या औपचारीकतेला बाजूला सारून केलेले होते. उत्तर प्रदेशातील एका छोट्याश्या गावी बालपण घालविलेला, वयाच्या केवळ पाचव्या वर्षी घराला लागलेल्या आगीमधे आईला गमावलेला, कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गांकरीता गावापासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या महाविद्यालयात रोज पायी जाणे येणे करणारा, एका सामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा त्या दिवशी १३० कोटी जनसंख्या असलेल्या, ३२. लक्ष चौरस किलोमिटर परीक्षेत्र असलेल्या, दक्षिण मध्य एशीयामधील एका अत्यंत प्रभावी देशाचा प्रथम नागरीक महामहीम राष्ट्रपती म्हणून त्या गावात परत आला होता. त्या गावासाठी ती गोष्ट फारच महत्वाची होती परंतू राष्ट्रपती महोदयांकरीता देखील ती फार जास्त महत्वाची होती. अत्यंत प्रामाणिकपणे जनसेवेचा वसा बाळगून त्यांनी त्यांच्या जीवनात प्राप्त केलेले ते सर्वोच्च स्थान ही एक अभूतपूर्व गोष्ट त्यांच्या गावासाठी होती. त्या दिवशीचे त्यांचे भाषण मी फार काळजीपूर्वक ऐकत होतो. त्यांच्या बोलण्यातून आपल्या मूळ गावी परतण्याचा आनंद शब्दागणिक जाणवित होता. परंतू बोलता बोलता त्यांनी अश्या एका गोष्टीचा उल्लेख केला की काही क्षण तेथील सर्व मी ते भाषण टीव्हीवर ऐकताना देखील स्तब्ध झालो. गोष्ट छोटीशी होती जी राष्ट्रपती महोदय सहजच बोलून गेले परंतू त्यानंतर दोनच क्षण त्यांना थांबावे लागले कारण ती जूनी आठवण त्यांना हेलावून गेली. या जगातील प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील गत आठवणींमुळे विशेषतः आपल्या बालपणीच्या आठवणींमुळे गहिवरल्यासारखे होतेच. त्या दिवशीच्या भाषणात ती गोष्ट सांगत असताना त्यांना तसे वाटले कारण ती गोष्ट त्या काळातील होती ज्यावेळी त्यांची कोणतीही ओळख निर्माण झाली नव्हती

बालपणीचा काळ आणि बालपणीचा गाव प्रत्येकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करतो. याचे कारण तो काळ कोणत्याही मीपणाच्या कक्षेपलीकडला असतो. त्या काळात आपण कुणीच नसल्यामुळे वावरण्याची, मैत्री करण्याची, कसलीही बंधने नसतात. खरे तर अनेकांना आजच्या तुलनेत तो काळ खडतर वाटत असतो परंतू तरी देखील त्यात आनंद असायचा असेच सारे बोलतात. अनेक बाबींच्या उपलब्धतेमुळे तो आनंद आता हरवलाय असेही अनेक जण बोलताना दिसतात. पंचेवीस पैश्याची बोरकुटाची पुडी खाण्यात जो आनंद होता तो आता शंभर रुपयांचे कॅडबरी चॉकलेट खाण्यात नाही असे लोक बोलतात. खरे तर हा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे. ज्यांनी लहानपणापासून शंभर रुपयाची कॅडबरी चॉकलेट खाल्ले आहे त्यांना त्याच्यात देखील आनंद वाटत असणार. मुद्दा काय तर सध्या मोठ्या झालेल्या पिढीला आपल्या मूळ गावाचे आकर्षण असतेच कारण तो काळ त्या सर्वांच्याच आयुष्यातील निर्भेळ असा काळ असतो. त्या आकर्षणामुळेच कदाचित आपले राष्ट्रपती महोदय त्यांच्या मूळ गावी भेट देण्याकरीता गेले असणार मग सहाजिक समोर काही आपले बालपणीचे मित्र किंवा जुने परीचित लोक बसलेले बघितल्यावर त्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी ती गोष्ट सांगितली

दिल्लीहून खास राष्ट्रपती महोदयांकरीता असलेल्या विमानाने सर्वप्रथम लखनौ, त्यानंतर विशेष हेलीकॉप्टरने कानपूर तेथून त्यांच्या विशेष लिमोझीन या अत्यंत आरामदायी आधुनिक गाडीने त्यांच्या गावी पोहोचले होते. त्यांच्या सोबत साधारण पन्नास लोकांचा त्यांचा ताफा देखील होता. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे सुरक्षारक्षक तैनात होते. ते त्या गावात येणार म्हणून किमान दहावेळा तरी तेथे सुरक्षा तपासणी झाली होती. गाड्यांचा ताफा कसा येईल, तो कसा वळेल, महामहीम गाडीतून कुठे उतरतील, ते चालत स्टेजवर येऊन कुठे बसतील, त्यांच्या खुर्चीची उंची किती राहील, स्टेजवर कोण कोण असेल, त्यापैकी कोण बोलणार, किती वेळ बोलणार, काय बोलणार, त्या स्टेजला लागून सुरक्षा रक्षकांचे कवच कसे असणार, त्या मूळ कवचापलीकडे स्थानिक पोलीस प्रशासनाचे कवच कसे राहणार, त्या स्टेजपासून श्रोतृवृंद किती दूर बसणार, स्टेजवर महामहीमकरीता काय ठेवले जाईल, पाणी कुठले किंवा काय ठेवायचे, कार्यक्रमानंतर त्यांना कोण लोक भेटणार, त्यांचे आय कार्ड्स झाले की नाही या  सारख्या अनेक बारीक सारीक गोष्टींची शहानिशा झाल्यानंतर राष्ट्रपती महोदय तेथे पोहोचले होते. या साऱ्या गोष्टींमुळे आपल्या गावाचा एक छोटासा मुलगा किती मोठा झाला याचा सार्थ अभिमान तेथील प्रत्येकालाच वाटत असणार. परंतू त्या मोठ्या पदावर गेल्यानंतर देखील ते जुने दिवस त्या दिवसांमधील जगलेले जिवन राष्ट्रपती महोदय विसरले नव्हते हे त्यांनी सांगितलेल्या त्या गोष्टीवरून कळले. बरेच वेळा माणूस जसजसा मोठा होतो तसे तसे तो आपले जुने कदाचित कष्टाचे दिवस विसरण्याचाच प्रयत्न करतो. त्या जुन्या काळात जे जे मिळाले नाही ते आता मिळविले पाहीजे असेही त्याला वाटत राहते. परंतू हा सर्व जिवनाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करताना जुने दिवस जर विसरल्या गेले तर मग अश्या व्यक्तिच्या वागणूकीत आपल्याला फार फरक पडलेला दिसतो. त्याची इतरांशी वागणूक ही सौजन्यपूर्ण राहत नाही. म्हणूनच आकाशाला कितीही गवसणी घातली तरी आपले पाय घट्टपणे जमिनीवर असावे असे म्हणतात. भारतासारख्या महान देशाचे राष्ट्रपती असून देखील श्रीमान रामनाथजी कोवींद यांचे पाय किती घट्ट जमिनीला जोडलेले आहेत हे त्या छोट्याश्या बोलण्यावरून कळले.

झाले असे की लखनौवरून त्यांच्या हेलीकॉप्टरला काही तांत्रिक कारणांमुळे कानपूरला पोहोचायला वेळ लागला त्यामुळे त्यांना गावातील कार्यक्रमाला पोहोचायला देखील वेळच लागला. लोक बराच वेळ त्यांची वाट बघत बसले होते. म्हणून आपल्या भाषणादरम्यान राष्ट्रपती महोदय म्हणाले, आज आपल्याला माझी बराच वेळ प्रतिक्षा करावी लागली त्याबद्दल मी आपला क्षमाप्रार्थी आहे. प्रतिक्षा करणे हा एक कठीण काळ असतो याची मला पूर्णपणे जाणीव आहे. खरे तर ती एक वेदनाच असते जी मी समजू शकतो. कारण योगायोगच म्हणावा की, याच कार्यक्रम मंडपाच्या मागे जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनवर मी लहान असताना मोठ्या गावाला जाण्यासाठी रेल्वेची तासन् तास प्रतिक्षा करीत बसलेला असायचो. त्यावेळेची ती प्रतिक्षा करण्याची वेदना मला ठाऊक आहे. त्यामुळे आज तुम्हाला माझी प्रतिक्षा करावी लागली याबद्दल मला क्षमा करावी. यापुढे दोन क्षण त्यांना बोलविले नाही. सारेच स्तब्ध होते.

आयुष्यात कितीही मोठे झालो तरी गत आयुष्यातील वेदनांची पुरचुंडी कायम आपल्या सोबत असावी कारण त्यामुळे आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांच्या वेदना समजून घेण्याची संवेदना मनात जागृत राहते. शेवटी माणूसपण यालाच तर म्हणतात ना





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23