थोडा है थोडे की जरुरत है @ 17.08.21

काळजाचा ठोका

कधी कधी आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या मनावर असा काही परीणाम होतो की त्या गोष्टींच्या प्रभावामुळे आपल्या विचारांची दिशा बदलते. ज्या प्रमाणे या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने घडतात आपल्याला कळतात त्या प्रमाणे आपल्याही मनोभूमिका बदलत राहतात. परंतू कधी कधी मनात असलेले विचार प्रत्यक्ष घडणारी घटना या दोन बाबी जर एकत्र झाल्या तर मात्र काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने असा काळजाचा ठोका चुकण्याचा अनुभव घेतला असणार. अशी घटना वर्णन करणे सोपे असते परंतू त्याक्षणी मात्र त्याचे काय झाले असते हे त्याचे त्यालाच ठाऊक असते. असाच काळजाचा ठोका चुकविणारा प्रसंग मी अनुभवला. त्या चार मिनिटात मी आतापर्यंत कधीच चालविली नाही एवढ्या वेगात गाडी चालविली. तो प्रसंग आटोपल्यावर जेव्हा तटस्थपणे विचार केला तेव्हा खरे तर मला एवढे अस्वस्थ होण्याची गरज नव्हती पण का कोण जाणे त्यावेळी मी ज्या भुमिकेत होतो त्या भुमिकेमुळे माझ्या काळजाचा ठोका चुकला होता

वर्तमानपत्रात बरेच वेळा मनाला वेदना देणाऱ्या घटना आपण वाचतो. गेल्या काही दिवसांपूर्वी मी एका वीस वर्षाच्या मुलीच्या बाबतीत घडलेल्या एका ह्रदयद्रावक प्रसंगाची बातमी वाचली. अश्या घटना खरोखरीच फार बेचैन करतात. घरातून रागावून निघून गेलेली मुलगी तिच्यासोबत काही निर्दयी ऑटोरीक्षा वाल्यांकडून घडलेला प्रकार मला फारच हेलावून गेला. अश्या घटना विशेषतः ज्यांना मुली आहेत त्यांना जास्त दुखावणाऱ्या असतात. कारण कुठेतरी त्याबाबतची चिंता स्वाभाविकपणे त्यांच्या डोकावत असते. ती घटना वाचल्यावर मी एक दोन दिवस जरा अस्वस्थच होतो. मुलींचे वागणे आवडत नाही म्हणून आई वडीलांना क्वचित रागवावे लागतेच. त्यांना त्या वागण्यातून निर्माण होणारे धोके, जीवनाचा जरा जास्त अनुभव असल्याने ठाऊक असतात. परंतू मुला मुलींनी हे सांगणे आवडत नाही. परंतू त्याचा परीणाम म्हणजे असे घरातून निघून जाणे असू नये. कारण त्यामुळे त्या मुलीवर आलेले संकट किती मोठे होते. मुला मुलींच्या वागण्यातील चुका आवडल्या नाहीत तर त्या त्यांना सांगणे हे आई वडीलांचे कर्तव्य आहे. परंतू हे कर्तव्य बजावताना त्यांना त्या सांगण्याचा रागही येऊ नये ही काळजी घेणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. याच कसरतीमधे कदाचित ते आई वडील कमी पडले होते त्याचा परीणाम म्हणजे मनाला वेदना देणारी ती भयंकर घटना घडली. दोन दिवस मी त्या बातमीमुळे अस्वस्थच होतो. तशातच माझ्या मुलीचा पुण्याहून परत येण्यासंबंधी फोन आला. मुलगी पुण्याला गेली तीन वर्षांपासून राहत असल्याने तिचे अमरावतीला येणे नेहेमीचीच बाब होती. तिचे मी बुकींग करुन दिले. सायंकाळी सात वाजताची गाडी जी सकाळी साडेसात पर्यंत पोहोचणार होती. दिवसाउजेडी गाडी पोहोचणार असल्याने मी पूर्णपणे निश्चिंत होतो. परंतू निघण्याच्या दिवशी मुलीचा फोन आला की सात वाजताची गाडी रहीत झालीय आणि तिला चार वाजताच्या गाडीत जागा मिळतेय. गाडी सकाळी चार वाजता अमरावतीला पोहोचणार होती. मी तिला नेहेमीच घ्यायला जात असल्याने मला समस्या नव्हती. मी तिला बुकींग करून टाक असे म्हणालो. परंतू मी सहजपणे दिलेला होकार माझ्या काळजाचा ठोका चुकविणारा ठरणार याची मला कल्पना नव्हती

गाडी वेळेवर निघाली आणि मग साधारण दहा वाजता जेवणाच्या स्टॉपवर थांबल्यावर मी माझ्या मुलीला गाडीची अमरावतीला पोहोचण्याची वेळ ड्रायव्हरला विचारायला सांगितली. तिने चौकशी करुन मला पाच वाजताची वेळ सांगितली. त्यानुसार मी सकाळी सव्वाचारचा अलार्म लावून झोपलो. त्यात पुन्हा एक अडचण अशी निर्माण झाली की माझ्या मुलीची गाडी ऐन वेळेवर बदलल्यामुळे मला तिच्या सुरुवातीला मिळालेल्या लिंक वरून तिची गाडी ट्रॅक करता येत नव्हती. सध्या तंत्रज्ञानामुळे ते सहज शक्य होते परंतू हिची गाडी वेळेवर बदलल्यामुळे ते जमत नव्हते. परंतू गाडी पाच नंतरच पोहोचणार असे तिने सांगितले असल्याने मी साधारण पावणेपाच पर्यंत पोहोचलो तरी जमणार होते. त्याच निश्चिंत मनःस्थितीत मी झोपी गेलो. परंतू लवकरच मला प्रचंड धाव धाव करावी लागणार होती याची जाणीव नव्हती.

कसे कोण जाणे, परंतू मला अलार्म वाजायच्या दहा मिनीटे आधीच जाग आली. कारण कळले नाही परंतू डोक्यात कुठेतरी काही दिवसांपूर्वी वाचलेली ती घटना होती त्यामुळे मी दाखविले नसले तरी देखील मुलीच्या काळजीपोटीच मला जाग आली असणार. घड्याळात चार वाजले होते. अजून तिला अमरावतीला पोहोचायला तब्बल एक तास होता. पण सहजच विचारावे म्हणून मी मुलीला फोन लावला. ती पण गाढ झोपेत होती. मी तिला विचारले, ताई कुठवर पोहोचलीस? तिने बाहेर बघितले तर तिच्या लक्षात आले नाही. बायपास दिसतो आहे असे ती म्हणाली. माझ्या लक्षात आले की अकोल्याचा बायपास असणार. तरीही मी तिला म्हणालो की जरा ड्रायव्हर काकांना विचार की किती वेळ लागणार म्हणजे मी तसा निघतो. तिने जरा नाखुशीनेच उठून विचारले त्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकताच मी ताडकन् उठून उभा झालो. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तिला ड्रायव्हर ने सांगितले की गाडी दोनच मिनीटात अमरावतीला पोहोचते आहे. तिने असे सांगितल्याबरोबर मी तोंडावर पाणी मारले कार घराबाहेर काढली. त्या क्षणी माझ्या मनात असंख्य विचार आले. नको नको ते. मी मुलीला सांगितले की गाडीतून उतरल्यावर जर कुणी काकू किंवा एकादी अन्य मुलगी उतरणार असेल तर तिला जरावेळ तुझ्यासोबत थांबायला सांग. मी अक्षरशः सुसाट वेगात गाडी चालवत निघालो. सकाळची चारची वेळ असल्याने रस्त्यांवर बऱ्यापैकी सामसुम होती. फक्त ठोक बाजारात भाजी घ्यायला जाणारे भाजीवाले तेवढे रस्त्याने होते. मला केवळ एकटी गाडीतून उतरलेली माझी मुलगी आणि तिच्याशिवाय तेथे कुणीच नाही एवढेच दिसत होते. ऑटोरीक्षावाले असणार, ते तिला ऑटोत बसायचा आग्रह करणार, गाडी तिला उतरवून निघून गेली असणार, काय होईल हे सारे विचार मनात येत असताना मी सुसाट गाडी चालवत निघालो होतो. अमरावतीचा प्रायव्हेट बस स्टॉप माझ्या घरापासून जवळपास सहा किलोमीटर अंतरावर आहे. मी त्या दिवशी एवढ्या जास्त वेगात गेलो की केवळ चवथ्या मिनीटाला मी त्या बस स्टॉपवर पोहोचलो होतो. रस्त्यात येणारे सारे स्पीड ब्रेकर्स, सारी वळणे या कशाचीही चिंता करता मला केवळ माझ्या मुलीजवळ पोहोचायचे होते कारण ती तेथे एकटी सकाळी वाजता बसमधून उतरली होती. खरे सांगतो, त्या चार मिनीटात असंख्य वाईट विचार मनात येऊन गेले. कदाचित काही दिवसांपूर्वी वाचलेल्या त्या बातमीचा प्रभाव असेल. पण आले खरे. मी तेथे पोहोचलो तेथे मात्र मला सुखावणारे चित्र होते. माझी मुलगी सुखरुप माझी वाट बघत होती. ती एकटी आहे गाडी अपेक्षेपेक्षा लवकर आलीय म्हणून गाडी तेथेच थांबली होती. तो क्लिनर देखील माझ्या मुलीजवळ तिच्यासोबत माझी वाट बघत उभा होता. तेवढ्या वेळात तिला एका ऑटोरीक्षावाल्या काकांनी विचारले बाबा येत आहेत असे सांगितल्यावर ते पण तिच्या सोबतच जरा अंतरावर उभे होते. मी पोहोचल्यावर गाडीच्या क्लिनरने खात्री करून घेतली नंतरच गाडी पुढे नागपूरच्या प्रवासाला गेली. मुलीला गाडीत बसलेले बघितल्यावर माझा टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला. आपण विचार करतो तसे काही घडेलच असे नाही उलट काळजी करणारे लोक अजूनही जगात आहेत त्यांच्या चांगुलपणावरच हे जग सुरळीत सुरु आहे याची खात्री पटली. पण खरे सांगतो, त्या क्षणी मात्र काळजाचा ठोका चुकला होताच. आपले आत्यंतिक प्रेम असणाऱ्या व्यक्तिच्या काळजीपोटी असा काळजाचा ठोका चुकतोच, कारण ती व्यक्ती आपल्या काळजाचा तुकडाच असते, होय ना?




Comments

  1. मुलीचे पाल्य च ही काळजी जास्त समजू शकतात...त्या वेळी एका वडलाची काय आवस्था झाली असेल ते......मी पण एका मुलीची आई आहे..माझ्या बाबतीत पण असा नाही पण यासारखा वेगळा प्रसंग घडलेला आहे.....
    खूप छान मांडणी केलीत अर्थात तो एक जिवंत अनुभव च होता. म्हणून जास्त प्रखर भावना उमटल्या....👍🙏

    ReplyDelete
  2. खरंच काळीज आणि काळजी या दोन शब्दांमध्ये एक वेलांटी फक्त जागा बदलते पण बदलवताना मात्र काळजाचा ठोका चुकवते...
    अजूनही चांगले लोक जगात आहेत याची ग्वाही मिळते.
    ह्रदयस्पर्शी अनुभव... बापाचं कळीजच ते शेवटी... हृदयाची घालमेल समजून शकतो...
    👍👍👍

    ReplyDelete
  3. फार भावपूर्ण लिखाण.असा अनुभव प्रत्येक मुलीच्या आईवडिलांना कधीना कधी येतोच.

    ReplyDelete
  4. मुलींनी स्वतः असे अनुभव बरेचदा घेतले असतात कधी वाईट कधी चांगले.खूप छान मंडल्यात भावना.

    ReplyDelete
  5. छान लेख लिहिला आहे मुलीच्या आई वडिलांना अश्या अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागते

    ReplyDelete
  6. Excellent narration of the various tides of emotions a parent goes through, effectively captured in your writeup. Keep penning these beautiful gems Bhai.👌🏻👍🏻👏🏻

    ReplyDelete
  7. अवि सर , छान लेख.

    ReplyDelete
  8. आजुबाजूला काही गोष्टी अशा घडून गेल्या असतात की, आई वडिलांना काळजी वाटन साहजिक च आहे.

    ReplyDelete
  9. 'काळजाचा ठोका' वाचतांना जी चित्तथरारक घालमेल अनुभवली ती express करायला माझ्याकडे शब्द नाहीत.

    हे आपल्या काळजाच्या तुकडे आणि त्यांच्याभोवती बागडणारी आपल्या भावभावनांची आवरणं, हे equation अजब असत.
    हे कधी काळजीनं आपल्या काळजाचा ठोका चुकवतात तर कधी आनंद देऊन काळजाचा ठाव घेतात.
    कुठलही logic, assumption वापरून..ते explain करता येण कठीणच!

    ReplyDelete
  10. असा अनुभव अनेकदा आईवडिलांना येत असतो. गावाहून परत येत असलेला आपल्या काळजाचा तुकडा एकट्याने आपली वाट पाहत अंधारात उभा आहे किंवा शाळा सुटलीय अन आपण कुठेतरी अडकलाय आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे हा विचारच भयंकर आहे. काळजाचा ठोका चुकणार. पण अनेकदा चांगली माणसं आहेत असाही अनुभव येतो.
    घरापासून ते बस स्टॉप पर्यंत पोहोचत असताना झालेली जीवाची घालमेल खूप छान मांडलीत सर. अन् शेवट वाचून हुश्श ही झाले. छान लेख.

    ReplyDelete
  11. अप्रतिम लेख सर

    ReplyDelete
  12. थरारक! असा अनुभव कुणालाही न येवो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23