थोडा है थोडे की जरुरत है @ 23.03.21

तू मुलगी आहेस म्हणून नाही तर...

एकविसाव्या शतकातल्या एकविसाव्या वर्षी तुझ्या एकविसाव्या वाढदिवसानिमीत्त तुला शुभेच्छा देताना विसाव्या शतकात मोठा झालेला तुझा बाप म्हणून मला तुझ्याजवळ माझे मन मोकळे करता येतेय हीच मला एक मोठी उपलब्धी वाटतेय. विसाव्या शतकात मोठा झालेला माझ्यासारखा प्रत्येक बाप आपल्या मुलीशी हे सारे बोलू शकतोय याबद्दल खरे तर तुझे तुझ्या पिढीच्या प्रत्येक मुलीचेच कौतुक आहे. बापाला बाप समजता मित्र मानण्याची हिंमत तुम्ही केली. प्रसंगी त्या पद्धतीच्या मैत्रीसाठी भांडलीस, वाद केला, चिडलीस परंतू हळू हळू आपल्यात मैत्री होऊ शकली. तुझ्या या बाबतीतल्या हटखोरपणामुळे का होईना परंतू मला माझ्या बापाच्या भूमिकेमधून बाहेर निघून तुझ्यासोबत मैत्रीच्या भूमिकेत शिरता आले. परंतू हे तुझ्यासाठी सोपे होते कारण तू एकविसाव्या शतकातल्या नव्या मानसिकतेला बघत आणि अनुभवत मोठी झाली आहेस. माझ्यासाठी मात्र ते खरोखरीच कठीण होते आणि मला ते पूर्णपणे जमले देखील नाहीये. अजूनही मला तुझे स्वतंत्र अस्तित्व, तुझा स्वतंत्र विचार, तुझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या संकल्पना आणि फक्त तुला वाटते म्हणून एखादी गोष्ट करू देणे हे पचनी पडत नाही. तुला उंच आकाशात भरारी मारण्याची संधी उपलब्ध करुन देताना अजूनही मी घाबरलेला असतो. घरी येण्याची तू सांगितलेली वेळ उलटून गेली की मनात अजूनही कालवाकालव सुरु होते, खूप जास्त फोन हातात दिसला तर मनात उगाचच धाकधूक होऊ लागते, किंवा तुझ्या फोनला तू लॉक करुन ठेवलेय हे मला अजूनही पटलेले नाही. होय, कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल परंतू हे अगदी खरे आहे. दुसऱ्या गावाला तुला शिकायला पाठविताना घरच्या प्रत्येकापेक्षा मीच जास्त कणखरपणे तो निर्णय घेतला राबविला देखील. परंतू अजूनही तू गाडीत बसून गेल्या नंतर सकाळी तू सूखरुप पोहोचल्यावर तुझा फोन येईपर्यंत त्या रात्री झोप आलेली नसते. तुझी गाडी रस्त्यात धाब्यावर थांबली की त्यानंतर तू तेथेच राहून गेली आणि गाडी निघून गेली अशी स्वप्ने पडतात आणि दचकून जागा होतो. दिवसभरात तुझा फोन आला नाही आणि तुझा फोन लागत नसेल तर कसेही करुन तुझा आवाज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. तू एकविस वर्षांची झालीस, तू आता संपुर्णपणे स्वतःला सांभाळू शकतेस हे माझ्या बुद्धीला पटलंय, नव्हे खूप आधीच पटले होते म्हणूनच तुला घरापासून दूर शिक्षणाकरीता पाठविण्याचा निर्णय केला परंतू हीच गोष्ट अजूनही माझ्या मनाला पटत नाही. परंतू हे सारे तू मुलगी आहेस म्हणून नाही...

बरेच वेळा आमच्या पिढीच्या लोकांशी चर्चा करताना तुमच्या पिढीच्या मुली सहजच बोलून जाता की मी मुलगी आहे म्हणून मला हे सारे तुम्ही सांगताय, दादाला मात्र असले काहीच सांगत नाही. तुम्हाला तसे वाटणे स्वाभाविक देखील आहे. परंतू बेटा तुला आज मी जे सांगतोय ना ते जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर. हा जो विचार आहे ना की मुलाला काही बाबतीत सूट आणि मुलीला नाही हा विचार पूर्वापार आपल्या समाजात चालत आलाय. तो विचार तुम्हा मुलींनीच मोठ्या परीश्रमाने बदलविण्याचा प्रयत्न केलात. फार कष्ट लागले तुम्हाला तो विचार बदलविण्याकरीता परंतू तुम्ही ते करुन दाखविले. या बदलाचे खरे खुरे साक्षीदार आम्हीच आहोत त्यामुळे तू मुलगी आहेस म्हणून हे सारे सांगितले जाते किंवा अतिरीक्त काळजी घेतली जाते असे नाही. त्याचे एक वेगळे कारण असे आहे की आपण आपल्या घरात तीन पिढ्यांचे लोक एकत्र राहतो. संपुर्णपणे स्वतःला स्वतंत्र समजणारी स्वतःचे निर्णय सक्षमपणे घेणारी तुझी पिढी, मुलगा आणि मुलगी यांच्यामधे भेदाभेद करता त्यांना समान पद्धतीने संधी देण्यासाठी स्वतःला बदलविणारी आमची पिढी आणि मुला-मुलींमधे तुलना होत नसते, मुलीच्या जातीने योग्य पद्धतीनेच राहीले पाहीजे, मुलाची गोष्ट वेगळी असते असे समजणारी एक आधीची पिढी. या तिन पिढ्यांमधे समन्वय साधण्याचे काम मधल्या पिढीला करावे लागते. हे काम फार जिकरीचे असते. कारण या तिन्ही पिढ्यांमधला समतोल साधणे हेच मुळात सुखी कुटुंबाचे लक्षण असते. अर्थात प्रत्येकच पिढीला या असल्या मधल्या समन्वयाची भूमिका करावी लागतेच. परंतू माझ्या पिढीला ती जास्त तीव्रतेने यासाठी करावी लागत आहे कारण तुझ्यासारख्या मुलींच्या जगण्याच्या संकल्पना आंतर्बाह्य बदलत असल्याने या बदलाला सामोरे जाणे आम्हाला जरा कठीण होतेय. एका बाजूने तुमच्या पिढीला हवी असेलेली प्रायव्हसी आम्हाला पटतेय, ती देण्याचा प्रयत्न आम्ही करतो, परंतू त्याचवेळी या प्रायव्हसीमधून काही अडचण निर्माण झाली तर असा विचार आधीची पिढी आमच्या मनात टाकते आम्हाला ते देखील पटायला लागते. विचारांची ही ओढताण फार अडचणीची ठरते. तुझ्या वयाच्या काही मुला मुलींना हातात बियर आणि सिगरेट घेऊन एखाद्या हॉटेलच्या बाहेर बसलेले बघितल्यावर मनात धस्स होते. कपड्याचे भान नसणाऱ्या आणि कशाचीही तमा बाळगता बॉयफ्रेंडला मिठी मारुन त्याच्या गाडीवर बसून जाणाऱ्या मुलीला बघितले की ती ओळखीची नसली तरी घरी व्यवस्थित जाईल ना अशी काळजी वाटू लागते. मुलांशी मोकळेपणाने वागता आले पाहिजे असे मला समजाविणारा मित्र जेव्हा त्याच्या मुलासोबत वाईनचा ग्लास शेअर करुन चियर्स म्हणतो तेव्हा माझ्या मनात अजूनही कालवाकालव होते हे आपल्याला कधीच जमू शकणार नाही किंबहुना ते जमवायचेही नाही या बाबत मी ठाम असतो. ही मनातली धाकधूक फक्त तुझ्याबाबत नाही तर मला तुझ्या भावाबद्दल देखील वाटते. मुलगा आणि मुलगी यांना समान पद्धीतीच्या संधी देण्याइतपत विचार कृती माझ्या पिढीच्या प्रत्येकच बापाला जमतेय परंतू तुला अपेक्षित असलेली मैत्री मात्र करता येत नाही. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे माझ्या आधीची जी पिढी आपल्या घरात आहे त्यांनी आमच्यावर ज्या पद्धतीचे संस्कार केले ते मनात घट्ट आहेत. त्यांनी ते सारे आम्हाला सांगण्याचे कारणही तेच होते जे आमचे आहे. आपल्या मुलाबाळांबद्दल खूप प्रेम त्या प्रेमामधून निर्माण होणारी अत्यंत स्वाभाविक काळजी. म्हणूनच बेटा, तुला अपेक्षित असलेली मैत्री मी तुझ्याशी करु शकत नाही, तू मुलगी आहेस म्हणून नाही तर मी आधीच्या शतकात मोठा झालेला बाप आहे म्हणून.

नव्या जगात वावरत असताना वागण्याचे स्वातंत्र्य, प्रायव्हसी, वैचारिक स्वातंत्र्य या सर्व बाबी तुमच्या पिढीसाठी सर्वात महत्वाच्या बनल्या त्यानुसार तुम्ही मोठे होत आहात. त्या सर्व गोष्टींचे महत्व आम्हाला देखील समजलेय परंतू आमचा पवित्रा थोडासा सावध यासाठी आहे की जीवनाचा अनुभव जरासा जास्त असल्याने स्वातंत्र्याचा स्वैराचार होताना अनेक वेळा दिसत असल्याने काळजी वाटते. सांगणे एवढेच आहे या काळजीला योग्य पद्धतीने समजून घ्या. ही काळजी तुमच्यावरील निस्सिम प्रेमापोटीच आहे त्यामुळेच तुमच्याशी मैत्री करावी वाटत असतानाही मन धजावत नाही, बापच रहावे वाटते जेणेकरुन आपल्यातील त्या अंतराचा उपयोग काही गोष्टी ठामपणे सांगण्यासाठी उपयोग होईल असे वाटत राहते. ही सारी सावधता तू मुलगी आहेस म्हणून नाही तर जीवनाचा फार अनुभव नसलेली नव्या आसमंतात झेपावण्यासाठी तयार होत असलेली एक व्यक्ती म्हणूनच... आणि त्या व्यक्तीवर खूप खूप प्रेम आहे म्हणून देखील..






Comments

  1. खूपच सुंदर अप्रतिम 👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  2. छान ...
    मुलांना त्यांची स्पेस देणे योग्य...सोबत प्रेम आणि विश्वास

    ReplyDelete
  3. सुंदर लिहिलंय सर. अनन्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद.🎉
    खरंच दोन पिढ्यांमधील अंतर काय असतं त्यातही शतक बदलल्यानंतर हे अंतर कसं कमी करावे हे फार जिकरीचे काम आहे प्रत्येक माय बापासाठी. त्यातूनही वैचारिक स्वातंत्र्य आणि मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आजच्या पिढीला आहे, हे कुठेतरी अति आहे असे वाटत राहते.
    मुलीच्या संरक्षणासाठी आई-वडिलांचं काळीज फार पूर्वीपासूनच हळव आहे. पण आजकालची पिढी फारच बिनधास्त असल्यामुळे काळजीची तीव्रता वाढलेली दिसते आहे. असो . घरात घडत असणाऱ्या अनेक गोष्टींचे निरीक्षण आजची पिढी उत्तम करते. सुसंस्कृत वातावरणात वाढलेले मुलं किंवा मुली चांगल्या वाईट गोष्टींचा यथायोग्य विचार करतात. फक्त त्याची व्यक्त होण्याची पद्धत आधुनिक आहे.

    ReplyDelete
  4. Excellent sir, khup sunder shabdaat bhaavna wyakt kelyaat aapan.

    ReplyDelete
  5. सर्व सुजाण पालकांच्या भावना आपण सुंदर शब्दांमध्ये व्यक्त केल्यात .खूपच छान.
    सर आपल्याला कसे जमते हो हे!
    प्रा. संजय पाटील
    सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, वाशीम.

    ReplyDelete
  6. एकूण एक शब्द वास्तवतेला धरून 🙂👌👌👌🙏🏻

    ReplyDelete
  7. आमच्या समोर ही आव्हानं अवसून उभी आहेत. शक्य तेवढे चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. चांगल्या वाईट गोष्टींची ओळख करून देत आहोत. सोशल मीडिया आम्हाला कितपत यशस्वी होऊ देईल हा खूप मोठा प्रश्न आहे. आमच्या पिढीचे पाल्य अजून लहान आहेत. पण तरीही मनात असे पुढचे विचार येतात. वर्तमान नि भविष्यकाळ यांचे नाते फार जवळचे आहे.😊

    ReplyDelete
  8. जबरदस्त लिहीलंस अवि..तुझा हा लेख मी माझ्या लेकीला जिला नेहमी असं वाटतं की मी मुलगी आहे म्हणून बाबा मला सिटीत बुलेट चालवू देत नाहीत, तिला आणि अगदी तुझ्यासारख्या विचारांच्या तिच्या बाबांना फॉरवर्ड केला आहे. दोघांनाही एकमेकांच्या भूमिका कळाव्यात म्हणून.
    आणि हो, आठवणीने तुझ्या लाडक्या लेकीला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा सांग...

    ReplyDelete
  9. Khoopch aprteem aaai ani wadillancha manatil mulanbaddal honari ghalmel tyytun yakt hote pan n bolta hrudayytil dabedana yalkt hotat garvh sundr lekh Avi bhau tumche manadsvi abhinandan davedanashil ani chintanshil lekhak mhnun

    ReplyDelete
  10. सर, लोकशिक्षणाचा प्रभावी धडा दिला आपण.खूप छान..! 👍👍

    ReplyDelete
  11. अनन्या ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानिमित्त या पिढीतील मुलींना दिलेली भेट ही अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  12. प्रत्येक आई वडीलांच्या मनातले बाेललास ़ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अनन्या ़

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. खूप सुंदर! अगदी खरं आहे सर..
    मला तर स्वैराचारापेक्षाही मुलीच्या सुरक्षिततेचीच सतत काळजी वाटत राहते..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23