थोडा है थोडे की जरुरत है @ 09.03.21

कुणीतरी संवेदनशील हवं!

आज मला फार आनंद झालाय. आज कित्येक दिवसांनंतर मला फार मोकळे वाटतेय. किती प्रतिक्षा, किती ताण सहन केलाय गेले काही दिवस. तुला हे सारे ठाऊक आहे. पण आज खरोखरीच माझ्या साऱ्या परीश्रमाचे फलीत झाल्यासारखे वाटतेय. हा सारा काळ कसा गेला काय सांगू? खरे तर ही गोष्ट मला करता येत नव्हती म्हणून एक प्रकारचा न्यूनगंडच निर्माण झाला होता माझ्या मनात. आपल्याला हे का जमू नये जे इतर साऱ्यांना जमतेय. जसे जसे अपयश यायला लागले तसे तसे माझा आत्मविश्वास देखील डळमळायला लागला. पण शेवटी निर्धार केलाच की प्रयत्न सोडायचे नाही. कुणी काहीही म्हणोत मी हे केल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी तर सारख्या अपयशाने असे वाटायचे की जाऊ द्या सोडून द्यावे, प्रत्येकाला सारेच जमले पाहीजे असे थोडीच आहे? पण परत मनातला तो सूप्त विचार उफाळून यायचा की का नाही जमणार, जमायलाच हवे. एक दोनदा कुणाला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतू मला उत्तर मिळाले, काय मॅडपणा चालवलास? या असल्या छोट्या छोट्या गोष्टीचे कुठे टेन्शन घ्यायचे असते का? एवढ्याश्या गोष्टीबद्दल कसला विचार करतेस? यापेक्षा खूप मोठी मोठी कामे आम्हाला करायची असतात, तसे काही असले तर मग ठीक आहे. या इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी अस्वस्थ होणे हे इम्मॅच्युरीटीचे लक्षण आहे. कसला आत्मविश्वास नि कसले काय? ही एवढी साधी गोष्ट करुन आत्मविश्वास वगैरे नसतो निर्माण होत. त्यासाठी काहीतरी मोठे आणि महत्वाचे करावे लागत असते. मॅडपणा बंद कर आणि नाद सोडून दे. मी उत्तर काहीच दिले नाही. पण मनात विचार आला, हा माझा मॅडपणा आहे का? नक्कीच नाही. मनापासून मला एक गोष्ट करुन बघायचीय आणि ती मला जमत नाही म्हणून मी अस्वस्थ आहे. ती जमावी म्हणून माझी धडपड सुरु आहे. ती गोष्ट इतरांकरीता कमी महत्वाची किंवा अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास फालतू देखील असेल परंतू माझ्यासाठी मात्र ही गोष्ट फार महत्वाची होती. कारण ही गोष्ट जर मला जमली तर माझा आत्मविश्वास मला परत मिळणार होता. आणि आज तो क्षण आला. आज माझे एवढ्या दिवसांचे प्रयत्न सफल झाले. आज मी खूप खूश आहे आणि हा माझा आनंद फक्त तुला सांगावा वाटला कारण तू समजू शकतोस की मला काय नि कसे वाटत आहे. कारण या संपुर्ण प्रवासात तू माझ्या सोबत होतास. तू माझे अपयश, माझे फ्रस्ट्रेशन, माझे दुःख सारे सारे बघितलेस कारण मी तुला हे सारे सांगितले. आज मात्र मी खूश आहे. आज मी माझे असे काहीतरी करुन दाखविले. इतर कुणासाठीही नाही तर फक्त माझ्यासाठी. येस, आय डीड इट. आज माझ्या करंज्या मला हव्या तश्या जमल्या!! 

त्यावर तो म्हणाला, किती छान!! मला ठाऊक आहे या करंज्या नीट होणे तुझ्यासाठी किती महत्वाचे होते. इतरांच्या लेखी ही गोष्ट फारच क्षुल्लक असली तरी देखील तुला या गोष्टीचे काय महत्व आहे हे मला चांगलेच माहित आहे. मागच्या पाचही वेळांना जेव्हा तुझ्या करंज्या बिघडल्या तेव्हा तुझा निराश स्वर मला जाणवला. त्या बिघडत्या करंज्यांसोबत तुझ्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू मी दूर असूनही मला दिसले. त्यामुळे आजचा तुझा हा आनंद मी तुझ्याएवढाच अनुभवू शकतो आहे. इतरांना वाटते तशी ही गोष्ट छोटी नाही तर खूपच मोठी आहे. त्यामुळे मस्त सेलीब्रेट कर, सर्वांना त्या करंज्या दे आणि त्या मनापासून खाताना सर्वांच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघ. तुला खूप छान वाटेल. तू पण मनापासून चव घे आणि.. तो थांबला. तिला ठाऊक होते तो काय म्हणणार आहे ते.. त्याच्या आधी तीच म्हणाली तुझ्या नावाची एक करंजी मी जास्त खायची ना? त्या वाक्याने दोघही हसले..पण या क्षणी दोघांचेही आपसुकच पाणावलेले डोळे मात्र एकमेकांना त्यांनी कळू नाही दिले.

आज त्याचा आवाज पहिले पासूनच वेगळा वाटत होता. बोलताना प्रत्येक शब्दागणिक ताण जाणवित होता. परंतू आपलं मन मोकळं करणे ही त्याची प्रवृत्तीच नव्हती. सारं काही मनात ठेवायचं. जी गोष्ट मनाला बोचत होती ती सांगता अवती भवतीच्या साऱ्या गोष्टी बोलून झाल्या. सारं काही ठिक आहे असं त्यानं तिने विचारता देखील तीन वेळा सांगितलं. आधीच हिच्या डोक्याला खूप ताण असतो. त्यात माझ्या डोक्यामागचा ताण हिला कशाला सांगायचा? त्यापेक्षा एकला चलो रे ही त्याची भूमिका. त्यामुळे सारे ठिक आहे याच्या पुढे तो काही बोलेना. हे बघून मग तिनेच बोलणे सुरु केले. काय झालंय? काहीतरी तर नक्कीच झालंय. आज स्वर नेहेमीसारखा नाहीये. नेहेमी कसा षड्ज लागतो बोलताना, आज पंचम पर्यंतच पोहोचलाय. त्याला तिच्या त्या बोलण्याचे हसू आले आणि एवढा वेळ रोखलेले मनातील विचार वाहते झाले. काय सांगू तुला? किती किती काम करायचं, किती कष्ट घ्यायचे परंतू त्या कामाचे मोलच वाटत नाही लोकांना? आता मी देखील माणूस आहे, कधीतरी एवढ्या कामाच्या रगाड्यात काहीतरी चूक होऊन जाते. ती काही मुद्दाम केलेली नसते. होऊन जाते परंतू तेवढीच चूक पकडून दोषारोपण करायचे परंतू त्या आधी केलेली हजारो चांगली कामे मात्र विसरुन जायची याला काय अर्थ आहे? तावातावाने त्याने मग मन मोकळे केलेत्याला शांतपणे मोकळे होऊ दिल्यानंतर अत्यंत स्नेहाने ती बोलू लागली.

तूझे अगदी बरोबर आहे. एवढे काम केल्यावर त्याची किंमत व्हायलाच हवी, आणि तू किती मनापासून सारे काही करतोस, मला माहित आहे. पण कसंय रे, तू खूप चांगले काम करतोस ना त्यामुळे तुझ्याकडून खूप अपेक्षा असतात. जे लोक कामामधे आपले मन ओतत नाहीत त्यांच्याकडून अपेक्षा नसते किंवा ज्यांना कामे करण्याचा आत्मविश्वास नसतो त्यांच्याकडून फार अपेक्षा केल्या जात नाही. माझ्याकडून करतात का करंज्यांची अपेक्षा? तो हसला. ती पुढे बोलू लागली. हे बघ, तू आपले काम प्रामाणिकपणे करतोय ना, बस झाले. तुझ्याकडून खूप चांगल्या कामाची अपेक्षा असल्याने तुझी छोटीशी चूक देखील लोकांना पचनी पडत नाही. अरे वेड्या, हे तुझे यश आहे. त्यामुळे नाराज नको होऊ आणि ज्यांनी कुणी तुला रागावले त्यांचापण राग नको धरुस. ते रागावणे म्हणजे तुझ्या नेहेमीच्या चांगल्या कामांची आठवण आणि पावती आहे असे समज आणि शांत हो. तिचे हे समजूतदारीचे आणि स्नेहाने भरलेले शब्द ऐकून त्याला अचानक बरे वाटू लागले तो हसू लागला, तिच्यासोबत.

मनात आनंद असो की दुःख, स्वभाव मोकळे बोलण्याचा असो किंवा मनात ठेवणारा, स्री असो अथवा पुरुष प्रत्येकाला आपल्या जीवनात कुणीतरी संवेदनशील हवं असतं, मन मोकळं करायला, आपल्याला समजून घ्यायला, आपल्याला धीर द्यायला किंवा फक्त मी तुझ्या सोबत आहे एवढेच सांगायला... कुणीतरी हवं असतं, स्वतःला सोपवून द्यायला... असे कुणीतरी आयुष्यात असणे म्हणजे सुख, होय ना?





Comments

  1. हा write-up वाचतांना..
    समोर दोन प्रचंड ताकदीचे actors perform करतायेत आणि आपण त्यांच्या सोबतीने त्यांच्या भावना जगतोय, अशी भावना निर्माण होत होती.
    समोर लिहिलेले शब्द जेव्हा आपण अक्षरशः visualize करतो तेव्हा लेखकानी त्याचे काम चोख केलेले असते.

    लेखकाने तो आणि ती
    ह्या दोन व्यक्तिरेखा उभारून केवळ शब्दांद्वारे नेमक्या भावना वाचकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. वाचक म्हणून आपण त्यांची भावनिक गुंफण, त्याचं आरोह /अवरोहात एकमेकांना समजून घेण आणि जोडीला crisp असा sense of humour वापरून एकमेकांना ताणातून बाहेर काढण.. हे सार तन्मयतेने अनुभवत असतो.

    लेखकानी शेवटी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणुन Alan Walker ह्यांच्या 'Alone pt 2' ह्या गाण्याची आपसूकच आठवण झाली.
    'We all need a soul to rely on
    A shoulder to cry on
    A friend through
    the highs and the lows... '

    ReplyDelete
  2. "Unconditional support" या दोन शब्दांना
    इतक्या सुंदर प्रकारे तुमच्यापेक्षा चांगलं दुसरं कोणीही मांडू शकत नाही. आपल्या failure मध्ये, success मध्ये किंवा या प्रयत्न करण्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये complete support करणारा व्यक्ती आपल्या सोबत असला की किती आनंद मिळतो हे पुन्हा एकदा तुमच्या कडून शिकायला मिळाले.

    ReplyDelete
  3. Sir, खुपचं छान. करांज्यांवरून मला माझे उकडीचे मोदक आठवले. कधीच त्याची परी जमत नाही. पण सारण उत्तम होते. तरीही सगळे आनंदाने खातात. नि माझे मन तृप्त होते. एकमेकांना समजून घेणारी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत, ही आपली खरी कमाई असते. एकमेकांच्या उणिवा प्रत्येक वेळी काढत बसण्यापेक्षा प्रोत्साहन देणे अधिक माणुसकीचे ठरते. त्यातच संवेदनांचे मूळ आहे.
    नेहमीप्रमाणे खूप सुरेख लिहिले आहे व लिखाणाची शैली देखील निराळी आहे. वाचतांना गुढ शेवटपर्यंत टिकून राहते.

    ReplyDelete
  4. काय लिहू सर
    एकदम मस्त

    ReplyDelete
  5. "कुणी तरी संवेदनशील हव..."


    हे म्हणण्यासाठी किंवा तशी अपेक्षा व्यक्त करण्यासाठीचि संवेदनाशील लुप्त होत आहे...
    पण संवेदनशील असणे आवश्यक आहे...कारण त्या शिवाय आपण हे जग enjoy करू शकणार नाही.
    ...थोडे की जरूरत ...संवेदनशील असल्या शिवाय कळणार नाही...



    संवेदनशील कुणीतरी आपल्याला सतत भेटावे ही थोडीशी आशा.....

    ReplyDelete
  6. खुप छान.. मित्रा प्रत्येकाची अपेक्षा असतेच कि व्यक्त व्हायला कुणीतरी आपलेजवळ संवेदनशील असावं अगदी या कथेतील दोघांसारखं..

    ReplyDelete
  7. खूपच तरलपणे जबरदस्त लिहीलंस अवि..खूप खूप आवडलं..अशी संवेदनशील व्यक्ती की जी नुसत्या आवाजावरुन आपला मूड ओळखते, न सांगताही तिला आपल्या सगळ्या भावना कळतात...आपल्याला नेमकं काय म्हणायचं त वरुन ताकभात ती ओळखते अशी व्यक्ती ज्यांना लाभते, ते खरेच भाग्यवान असतात...

    ReplyDelete
  8. खरे आहे. नुसत्या आवाजावरून मनाची अस्वस्थता किंवा आनंद ओळखणारे कुणी तुमच्या आयुष्यात असेल तर त्यासारखे भाग्य नाही. अनेक वेळा शब्दांत सांगूनही समजून न घेणारी नाती आपण सांभाळत असतो. सहसंवेदना असणारे असे कुणी असेल तर ते खरे सुख. खूप भावपूर्ण लेखन..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23