थोडा है थोडे की जरुरत है @ 16.03.21

प्रेमस्वरुप आई, आई स्वरुप बाबा

आपल्या परीवारासोबत आपण बाहेर जात असतो. शहरातल्या एखाद्या गर्दीच्या चौकामधे आपली गाडी थांबते. गर्दीचा चौक असल्यामुळे बराचवेळ त्या ठिकाणी थांबावे लागते. गाड्यांच्या धुरांपासून किंवा कर्कश हॉर्नस् पासून वाचण्यासाठी आपण गाडीतील एअर कंडीशनर सुरु केलेला असतो आणि मुलांच्या आवडीचे एखादे गाणे त्यावर सुरु असते. अश्यावेळी गाडीच्या बाहेर काचावर एक दहा-अकरा वर्षांची मुलगी टकटक करुन आवाज करते. आपण सर्वचजण तिच्याकडे बघतो. दहा वर्षांची ती मुलगी आपल्याला एक-दोन रुपये मागत असते. वेळ असल्याने आपण तिचे निरीक्षण करतो. तिच्या अंगावरचा फ्रॉक जागोजागी फाटलेला असतो. तो फ्रॉक फाटलेला आहे याची तिला पण जाणीव असते म्हणून फाटलेल्या त्या कपड्यातून आपले अंग दिसू नये म्हणून ती पण प्रयत्न करीत असते. परंतू तिचे प्रयत्न तुटपुंजे असतात कारण तिचे कपडे फारच जास्त फाटलेले असतात. त्या चिमुकलीचे बारकाईने निरीक्षण केल्यावर आपल्या असेही लक्षात येते की ती बिचारी सामान्यपणे व्यवहार करत नाहीये. तिचे हावभाव, तिचा चेहेरा, तिचे अंगविक्षेप तिच्या दिव्यांग किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याची ग्वाही देत असतात. परंतू तरी देखील त्याही अवस्थेत आपल्या फाटलेल्या फ्रॉकला सावरत सावरत ती आपल्या बंद कारच्या काचेवर हात मारुन काहीतरी मागत असते. अश्यावेळी आपल्याला स्वाभाविकच तिची दया येते. आपण पटकन आपल्या खिशात हात घालून काही चिल्लर पैसे तिच्या हातावर ठेवतो किंवा गाडीत असलेला एखादा बिस्किटचा पुडा आपल्या मुलांकरवी तिच्या हातात ठेवतो. आपल्या मुलांच्या मनात अश्या गरीब बिचाऱ्या मुलीबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी हा आपला हेतू असतो. अश्या पद्धतीची किती मुले रस्त्यावर राहतात, त्यांना कश्या प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो, आपल्या परीवारात मुलगी असेल तर तिला त्या रस्त्यावरच्या मुलीच्या संवेदना समजून घे असे देखील सांगतो. आपल्या हातातले पैसे किंवा बिस्कीटचा पुडा घेऊन आपल्या फ्रॉकमधे कुठेतरी दडवून ती पुढच्या गाडीकडे निघून जाते. अश्या मुला मुलींकडे जरा बघा म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा किती सुखात आहोत याचा अंदाज येईल अश्या पद्धतीचे एखादे ठेवणीतले वाक्यही आपण बोलून पालकधर्माचे किती काटेकोर पालन करीत आहोत हे तेवढ्या वेळात दर्शवून देखील देतो. सिग्नलवर वाट बघण्याचा वेळ संपतो. हल्ली या सिग्नलवर फारच वेळ लागतोय असे म्हणून आपण एअर कंडीशन ने गार गार झालेली गाडी पुढे काढतो. येताना आपण फ्लाय ओव्हर वरुनच येऊ म्हणजे थांबण्याची गरजच पडणार नाही असे म्हणून काहीच क्षणापूर्वी आपल्याला दिसलेली ती मुलगी, तिच्याबद्दल मनात निर्माण झालेली कणव, सहानुभूती सारे काही विसरुन आपण आपल्या कामाला लागतो. घरी परत येताना फ्लाय ओव्हर वरुनच गेल्यामुळे सिग्नल लागतच नाही आणि त्यामुळे त्या अकरा वर्षांच्या, जागोजागी कपडे फाटलेल्या आणि रात्रीच्या जेवणासाठी एक रुपया मागणाऱ्या त्या चिमुकलीची आपली भेटही होत नाही आणि ती अलगद विस्मरणात जाते. आपल्यापैकी बहुतेकांच्या बाबत कमी अधिक प्रमाणात असेच काहीसे घडते. अश्या मुलीला ना बाप असतो ना आई असते. कुठेतरी रस्त्याच्या कडेलाच तिच्या आईने तिला जन्मतःच सोडून दिलेले असते. तिचा जन्म हा सामाजिक दृष्टीने तिच्या आईला अडचणीत आणणारा असतो म्हणूनच त्याच समाजाच्या हवाले ती त्या मुलीला सोपवून निघून गेलेली असते. ही मुलगी त्याच रस्त्यावर मोठी होते. कुणीतरी कशीतरी मदत करते, किंवा एखादी टोळी तिला आधार देते, भिक मागणे शिकविते जगायला लावते. पण अश्या मुलीला आईचे नि बापाचे प्रेम देणारा, तिचा सांभाळ करणारा, तिला छत देणारा, तिला आपल्या सोबत ठेवणारा, तिला शिकविणारा, तिची वेणी घालून देणारा, तिच्या सगळ्या मानसिक अवस्था सांभाळणारा, तिला सुरक्षितता देणारा, तिला गाणे शिकविणारा, तिचे गाणे कौतुकाने सर्वांना ऐकविणारा, तिच्या मानसिक दुर्बलतेचा तिच्या वागण्या बोलण्यात लवलेशही जाणविणार नाही इतपत तिला खंबीर करणारा, तिच्या हातात पाण्याची झारी देऊन झाडांना पाणी घालायला लावणारा, ती जशी जगतेय तसे इतरांनाही जगवावे असे संस्कार देणारा, तिच्या आधार कार्डवर स्वतःचे नाव देऊन खरेखुरे पालकत्व स्विकारणारा, ती मोठी झाली की महाविद्यालयामधे पाठविणारा, परंतू अठरा वर्षांची झाली त्यानंतर त्याच मुलीला रिमांडहोम मधे जावे लागले तर तिचे काय होईल या विचारांनी व्यथीत होणारा, या मुलांना सांभाळण्याच्या कायद्यामधे काहीतरी बदल केला पाहीजे या साठी धडपडणारा, ही मुलगी अठराच्या वर वयाची झाल्यावर तिच्यासाठी तिच्याच प्रमाणे दिव्यांग असलेला एखादा मुलगा बघणारा, सामाजिक सहभागाने त्या मुलीचे धुमधडाक्यात लग्न लावून देणारा, पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढविलेल्या मुलीच्या कन्यदानाचा हक्क देखील इतर कुणाला तरी देणारा आणि आपल्या दिव्यांग मुलीच्या पाठवणीच्या वेळी डोळ्यात येणारे अश्रू कुणालाही दिसणार नाही याची काळजी घेत नि चेहेऱ्यावर गडगडाटी हास्य आणून एखादा शेर ऐकविणारा महात्मा भेटला तर...

अश्या एका दिव्यांग मुलीला नाही तर देशाच्या वेगवेगळ्या भागात कधी कचऱ्याच्या कुंडीत, कधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर, तर कधी एखाद्या सिग्नलवर टाकून दिलेल्या १२३ दिव्यांग मुला मुलींना सन्मानाचे छत मिळवून देणारा एक बाबा आहे. त्या दिलदार बापाचे नाव आहे शंकरबाबा पापळकर. तीस वर्षांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील वझ्झर या छोट्याश्या गावात एका टेकडीच्या लगत मिळालेली संपुर्ण उजाड जमीन आज पंधरा हजारावर झाडांनी हिरवीगार झालीय आणि या वृक्षराजींमधे वसलेला आहे ७८ वर्षांच्या बाबांचा आश्रम, स्व. अंबादासपंत मुक, बधीर बेवारस मुलांचे अनाथालय.. १२३ दिव्यांग मुला मुलींचे हक्काचे घर, त्यांचा आधार, त्यांचा आसरा, त्यांचा विश्वास, त्यांचा निवारा. या अमरावती जिल्ह्याच्या परीसरात काही दशकांपूर्वी गाडगे बाबा नावाच्या विभूतीने एक सामाजिक चमत्कार घडविला. गावागावाला भानावर आणून माणुसकी जपण्याचा मंत्र दिला. गाडगे बाबांचे विचार अनेकांना भावले, त्यांचे अनेक अनुयायी तयार झाले, गाडगे बाबांनी समाजिक उत्थानाची एक मोठी चळवळ या परीसरात उभी केली त्यामधूनच जन जागराचे कार्य आयुष्यभर केले. गाडगे बाबा आपल्या सर्वांना सोडून गेले परंतू त्यांच्या विचारांचे पाईक होण्याची संधी वेगवेगळ्या प्रकारे मिळत राहते. हीच गाडगेबाबांच्या विभुतीमत्वाची थोरवी होती. गाडगे बाबांचा वसा त्यांना अपेक्षित होता तसाच चालविण्यासाठी आणखी एक बाबा आपल्या आयुष्याला समर्पित करण्यासाठी पुढे सरसावला मोठ्या परीश्रमाने १२३ दिव्यांग मुला मुलींचा पालनकर्ता बनला आणि त्या मुला-मुलींना फाटक्या कपड्यानीशी रस्त्यावर भीक मागत असहाय बनण्यापासून वाचवून अक्षरशः आभाळाएवढा झाला. अश्या आभाळाएवढ्या शंकरबाबाला प्रेमानं बाबा म्हणून हाक मारता येते, त्यांना नमस्कार करता येतो, भेटता येते, दर्शन करता येते ही केवढी पुण्याई म्हणायची. सिग्नलवर थांबून काही क्षण फाटक्या कपड्यातल्या त्या मुलीकडे बघून कनवळा दाखविणारे आपण, बाबांचे कार्य बघितल्यावर हात जोडून एकच बोलू शकतो, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती.

गाडगे बाबांच्या नावाने अस्तित्वात असलेल्या आपल्या परीसरातील विद्यापीठाद्वारे गाडगेबाबांचा खराखुरा वारसा चालविणाऱ्या शंकरबाबांना येत्या ३७ व्या दिक्षांत समारंभात मानद डी.लीट. उपाधीने गौरविण्यात येणार आहे. गाडगे बाबांच्या कर्तृत्वावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकासाठी तो प्रत्यक्ष क्षण अनुभवणे ही आयुष्यातील समाधानी उपलब्धीच असेल. होय ना?






Comments

  1. Awesome, Very touchy story Sir, Salute to you.Prof.S.D.Sindkhedkar, Shahada.

    ReplyDelete
  2. योग्या व्यक्तिचा सन्मान

    ReplyDelete
  3. Avinhau very beautiful life sketch of Shanksrbaba papadksr

    ReplyDelete
  4. बाबाचा सन्मान म्हणजेच कलियुगात भगवंताची पुजा होय

    ReplyDelete
  5. नतमस्तक अश्या योगी पुरुषा समोर.

    ReplyDelete
  6. बाबांच्या अनमोल कार्याला सलाम

    ReplyDelete
  7. खरे आहे, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती.🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23