थोडा है थोडे की जरुरत है@२६.०९.१७

तिला उडू देताना

सोनुली, बाबा बोलतोयआज तुला एका नव्या विश्वात सोडून मी जेव्हा परत फिरलो तेव्हा नकळत डोळ्यात दोन अश्रू गोळा झाले. गाडी वळे पर्यंत आरश्यात तुला बघत राहीलो आणि तूझा टाटा करणारा हात मला दिसत राहीलापण मग गाडी वळलीमला ती वळवावीच लागली आणि कारण मला तुला सोडून ६२० किलोमीटर अंतरावरील आपल्या मूळ ठिकाणी जायचे होते. गाडी आपल्या गतीने चालत आपल्या घरापर्यंतचे अंतर कमी करत होती आणि तुझ्या माझ्यातले भौतिक अंतर वाढू लागले होते. गाडीत तुझी आई, तुझा भाऊ आणि मी बसलो होतो. गाडी सुरु होती पण नेहमीसारखे आम्ही कुणीही बोलत नव्हतो. कारण प्रत्येकाला तूच दिसत होतीस..आम्हाला टाटा करणारी आमची मोठी झालेली छकुली.

१७ वर्षांपूर्वी भोपाळला दवाखान्यामधे जेव्हा त्या नर्सने मला सर्वात पहिल्यांदा तुला माझ्या हातात दिले तेव्हा तुझ्या मृदू शरीराच्या स्पर्शाने माझ्या मनावर उठलेला रोमांच अद्याप मी विसरु शकलो नाही. माझा अंश असलेली तू माझ्या हातात एका स्वतंत्र अस्तिवाने जेव्हा आलीस तेव्हा मला माझ्या असण्याचा सर्वात मोठा सर्वात आनंददायी पुरावा मिळाला. त्या क्षणी आनंदाने वाढलेली माझ्या ह्रदयाची धडधड माझी मुलगी हा मनात अभिमान दुणावणारा विचार मला कायम जाणवित राहतो. तुझ्या येण्याचे घरातील प्रत्येकाने मनापासून स्वागत केले कारण तुझ्या आजोबांच्या मते तर त्यांची आईच तुझ्या रुपाने आपल्या घरात परत आली होती. अश्या आनंदी आणि प्रेमाच्या सावलीत तू मोठी होऊ लागलीस आणि इतकी लवकर मोठी झालीस की माझ्या हातावर मला जाणविलेले तुझे स्वतंत्र अस्तित्व आता स्वतंत्र व्यक्तिमत्वामधे कधी परावर्तीत झाले ते कळलेच नाही. आणि अचानक आपल्या परीवाराच्या सुरक्षित पंखाखाली वावरत असताना परवा असा दिवस आला की आता तुला तुझ्या व्यक्तीमत्वाला सक्षम स्त्रीत्वामधे  परावर्तीत करण्याच्या पहिल्या पायरीवर तुला उभे करुन तुला तुझे पंख उघडावे लागणार आहेत. कारण आता तुझ्यासमोर विस्तिर्ण पसरलेले आभाळ असले, ते सुरुवातीला पोटात धडकी भरविणारे असले तरीदेखील त्याच आकाशामधे आता तुला उडायचे आहे

माझे चिमणे, तुला तुझे पंख पसरुन उडण्यासाठी तयार करताना आम्ही धास्तावलेले असलो तरी तू मात्र इतकी छान पोरगी आहेस की तू लगेच तुझ्या स्वत्वाची चुणुक दाखवून दिलीस. प्रसंग छोटा होता परंतू माझ्या लक्षात राहीला. एरवी घरी तुझ्या व्यक्तीगत सामानाची, वस्तुंची कपाटात जमवाजमव व्यवस्थितपणे करणे ही तुझ्या माऊलीची जबाबदारी असायची. वसतीगृहाच्या त्या तुझ्या खोलीमधेही ती व्यवस्था करुन देण्याची तिची तयारी असताना त्या वसतीगृहाच्या अधिकाऱ्यांनी तिला तुझ्या खोलीत प्रवेश करु दिला नाही आणि मग सुरु झाली तुझी ती छोट्याश्या उड्डाणाची धडपड. त्या मोठ्या बॅगमधून सामान काढून ते तुझ्या कपाटात नीट लावणे हे तुझे काम तुलाच करावे लागले आणि खाली बसून तुझ्या आईला  अस्वस्थपणे तुझी वाट बघत बसावे लागले. परंतू तिच्या अस्वस्थ चेहेऱ्यावर हसु फुलले जेव्हा तू तुझे सारे सामान नीट लावून खाली आलीस. त्या तुझ्या छोट्याश्या उड्डाणामुळे मी मात्र अचानक निश्चिंत झालो. पिल्लू, माझ्या एका मित्राने अगदी त्याचवेळी माझी मनःस्थिती ओळखून मला एक सुंदर संदेश पाठविला होता….

एका विज्ञानाच्या वर्गात झालेला किस्साविज्ञानाच्या सरांनी आपल्या सोबत काहीतरी प्रयोगाचं सामान आणलं होतं. मुलं कुतुहलानी सरांनी आणलेली झाडाची फांदी आणि त्यावर असलेला फुलपाखराचा कोष बघायला लागले. सरांनी विषय शिकवायला घेतला -फुलपाखराचे जीवन चक्र. शिक्षकांचं शिकवणं सुरु झालं होतं, पण मुलांचं सगळं लक्ष त्या कोषाकडे होतं. त्यातलं फुलपाखरु नुकतच त्या कोषातुन बाहेर पडायच्या मार्गावर होतं. ते फुलपाखरु त्या बंद कोषातुन बाहेर पडायला झटत होतंत्याची ती धडपड ,वेदना सगळी मुलं अगदी बारकाईनं बघत होते. तितक्यात वर्गात परिचराने येऊन सांगितलं, सर, तुम्हाला प्रिंन्सीपल सरांनी ताबडतोब बोलावलंय ऑफीसात .. शिकवणं थांबवुन सर वर्गाकडे उद्देशुन म्हणाले, मुलांनो, मी जरा भेटुन येतो सरांना. जसा सरांचा पाय वर्गाबाहेर पडला तशी सगळी मुलं पटापट येऊन त्या टेबला भोवती जमा झाले. आणि त्याची ती लांबुन दिसणारी धडपड जवळुन पाहु लागले. आता त्यांच्यात चर्चा मोठ्यानं सुरु झाली होती. ये बघ ना त्याला कीती त्रास होतोय, अरे त्याच्या कोषाला थोडासा बाजुला कर ना. अशातच एका मुलाने पटकन हात समोर केला, आणि कोष बाजुला केला ..मुलांच्या अपेक्षेप्रमाणे फुलपाखराने पटापट पंख पसरुन उडुन जायला हवे होते ..पण ते तसे होता भलतेच झाले ...फुलपाखराने पंख पसरवले पण ते नीट उघडले गेले नाही ,आणि त्यामुळे त्या फुलपाखराला नीट उडताही आले नाही...दुसर्‍याच क्षणी ते कोलमडुन पडले ..मुलं घाबरली आता आपल्याला रागावणार सर. शांतपणे ती जागेवर जाऊन बसली..सर परत आले ...वर्गात आपल्या गैरहजेरीत वर्ग इतका शांत बघुन त्यांना शंका आलीच की काहीतरी गडबड आहे . उत्तर समोरच दिसलं ..फुलपाखरु अर्धमेलं होऊन पडलेलं होतं ...शिक्षकांनी त्यात जास्त विचारपुस करता एका वेगळ्याच रितीने मुलांना धडा दिला ..ते म्हणाले ...मुलांनो,जर तुम्ही फुलपाखराला त्याच्या स्वत:च्या  बळावर पंख पसरवु दिले असते तर आज ते उडायला सक्षम झाले असते, कारण ते कष्ट, त्या यातना त्याला ती सशक्षता देऊन जातात ज्यामुळे त्याला पुढंच जीवन जगायचं बळ मिळत जात असतं. जर त्याला ते आयतं मिळत गेलं तर त्याला स्वत:हुन जीवनातल्या बारिकसारीक गोष्टीही करता येत नाहीत ज्या की जगायला अत्यावश्यक असतात. आयुष्यात सगळंच एकसारखं, सोप्पं, सुंदर, मनाजोगं मिळेलच असं नाही, ते मिळालं नाही म्हणुनची निराशा मनात बाळगुन उदास होण्या पेक्षा त्यातुन मार्ग काढणं शिकायला हवं. जीवनातले कष्ट हे सुद्धा एकप्रकारचे जीवनामृतच आहे. म्हणूनच माझे लेकी, माझ्या मनातले केवळ तुझ्यासाठी..

पिल्लू, आज तुला सोडून आम्ही परत निघालो आहोत. वाईट वाटतंय का? हो! वाटणारच. आम्हाला आणि तुला पण.. परंतू वाईट वाटण्यापेक्षा मला आनंद जास्त होतो आहे. म्हणजे प्रमाणाचा विचार केल्यास 20 % वाईट आणि 80 % आनंद. आनंद यासाठी की आता तुला उडण्यासाठी एक नवे आकाश मिळाले आहे. या नव्या आकाशात तुझ्यासाठी अनेक आव्हाने आहेत. त्यातील काही सोप्पी जी तू चुटकीसरशी सोडवशील आणि काही तुला थकविणारी असतील. पण या सर्व आव्हानांचा सामना तू करशील याचा १००% विश्वास आम्हाला आहे. तुझ्यात ज्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्यामुळे तू हे अगदी सहज करू शकतेस. या उंच भरारी नंतर तुला जे प्राप्त होणार आहे ना पिल्लू ते केवळ तुझे असणार आहे. आम्ही कायम तुझ्या सोबत राहू परंतु तुला जे स्वतःचे म्हणून प्राप्त होईल ना सोन्या, ते तुला खूप जास्त आनंद देईल. असे स्वतंत्र बनणे ही प्रत्येकाच्याच आयुष्याची आवड असते आणि तुला ती पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे तू सोने करशील याबद्दल देखील आम्हाला विश्वास वाटतो. लोकांसोबत जास्तीत जास्त चांगले वागून, त्यांना आपलेसे करून आपले एक स्थान तू येणाऱ्या काळात निश्चित निर्माण करावे. यासोबतच तू आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावाही पाच वर्षे तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ ठरणार आहेत आणि तो तू खूप एन्जॉय करावा कारण हा काळ कितीही पैसे दिले तरी परतणार नाही. त्यामुळे माझ्या सोनूली ने अजिबात पडलेल्या चेहेऱ्याने राहू नये, अजिबात रडू बिडू नये, तसेच छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरू पण नये.. धैर्यवान व्हावे...मस्त नव्या ओळखी कराव्या..नवनवीन गोष्टी बघाव्या आणि जीवन धमाल करत जगावे... जगशील ना? तू हे सारे करशील आणि एक दिवस आम्हाला तुझ्याबद्दल आता वाटणाऱ्या अभिमानाचा द्विगुणित करणारा अभिमान दुणावशील याबद्दल 200% खात्री आहे...सो...आगे बढो.. बिनधास्त होकर...आम्ही तुझ्या सोबत आहोत...तू उड मस्त..घे भरारी.. तुझेच बाबा.



    

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23