थोडा है थोडे की जरूरत है@19.09.17

ढणट् टटर टटर

गणपतीच्या दिवसांमधे हा ढणट् टटर टटर असा आवाज आपल्या बरेच वेळा कानावर पडत असतो. हा आवाज स्थापनेच्या किंवा विसर्जनाच्या मिरवणूकींमधे वाजणाऱ्या ढोल ताश्याचा असतो. सध्या तर वेगवेगळ्या गावात अशी ढोल ताश्याची वेगवेगळी पथके तयार व्हायला लागली आहेत. सोबतच यामधला महिलांचा सहभाग देखील लक्षणीय स्वागतार्ह आहे. मोठा ढोल गळ्यात बांधून वाजविणे हे तसे मेहनतीचे काम आहे परंतू मुली महिला देखील यामधे सहभागी होतात एकंदरीत या ताश्याच्या आवाजाने या गणपतीच्या दहा दिवसात वातावरण एकदम चैतन्यमयी होऊन जाते. हा आवाजच इतका तालबद्ध असतो की प्रत्येकाचे पाय जागच्या जागी थिरकायला लागतात. या ढोल ताश्याच्या तालावर नाचणे हा देखील एक वेगळ्या आनंदाचा अनुभव देतो. अर्थात अनेकांना तो घेताच येतो असे नाही. परंतू काही लोक मात्र फारच वेगळे असतात. जीवन आनंदातच जगायचे जीवनातील छोट्या छोट्या क्षणांना देखील .पु.काळे म्हणतात त्याप्रमाणे महोत्सवामधे परावर्तीत करायचे असे त्यांनी ठरविले असते.

या वर्षी गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मला नागपूरला जावे लागले होते. सायंकाळची वेळ होती. मी एका रस्त्याने जाताना मला समोरुन गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक येताना दिसली. मिरवणूकीसोबत अतिशय सुंदर ढोल ताशाचे पथक होते. त्यांचे ताशाचे वादन इतके सुरेल तालबद्ध होते की मला माझी गाडी थोडावेळ थांबवून ते सादरीकरण ऐकावे वाटले. परंतू त्या वादनासोबत मला एक अप्रतिम गोष्ट बघायला मिळाली. मी उभा होतो त्या जागेपाशीच साधारण पंचावन्न ते साठ या वयोगटातील दोन काकुंनी त्यांची गाडी थांबविली. त्या दोघीदेखील त्या ढोल ताशाचे वादन ऐकू लागल्या. त्यांचे बोलणे मला स्पष्ट ऐकू येत होते. त्यातल्या एक काकू दुसरीला सांगत होत्या, अगं या ढोल ताश्यासोबत नाचायला इतकी मजा येते की काय सांगू? माझ्या भाच्याच्या लग्नामधे असाच एक ग्रुप बोलावला होता. काय धमाल केली आम्ही सर्वांनी..सर्वांना नाचविले आम्ही.. खूप खूप नाचलो..इतका आनंद मिळाला की अजूनही ते सारे विसरु शकलो नाही आम्ही सर्वजणयाबाबतच त्यांच्या गप्पा सुरु असतानाच अचानक त्या काकुंनी जे केले ते बघून मला फारच जास्त आश्चर्य वाटले. त्या दोघींपैकी ज्या काकू नाचाबद्दल सांगत होत्या त्यांनी कदाचित सोबतच्या त्यांच्या मैत्रीणीला काहीतरी विचारले. त्यांनी नकार दिल्यावर त्या काकू अचानक रस्ता ओलांडून त्या मिरवणूकीत पोहोचल्या. आता त्या पुढे काय करतात याबद्दल मला कुतुहल वाटू लागले म्हणून मी जरावेळ आणखी थांबण्याचा विचार केला. बघतो तर काय, त्या काकू त्या मिरवणूकीत धमाल नाचू लागल्या. त्यांचे नाचणे खरोखरीच इतके सुंदर आणि लयबद्ध होते की त्या मिरवणूकीतील जवळपास सर्वांनी आपापले नाचणे सोडून त्या काकुंना चिअर करणे सुरु केले. सर्वांनी त्यांच्या भोवती रिंगण केले टाळ्या वाजवून प्रोत्साहन देऊ लागले. साधारण पाच मिनीटे काकू मज्जेत नाचत होत्या. त्यांच्या चेहेऱ्यावर त्यांना मनापासून आनंद होतोय असे स्पष्ट जाणवत होते. पाच मिनीटांनंतर त्या रिंगणातून बाहेर पडल्या. त्या बाहेर पडताना त्या मिरवणूकीतील पोरांनी काकुंच्या नावाने जोरात थ्री चिअर्स केले आणि बाप्पाचा जयघोष केला. त्या सर्वांना बाय करुन काकू पुन्हा माझ्या बाजूने येऊन उभ्या राहील्या आणि मैत्रीणीला म्हणाल्या, बघ तू आली नाहीकित्ती मज्जा आली. त्या सोबतच्या काकू त्यांना म्हणाल्या, काय तू? तुझा कमालच आहे. कुणी पाहिलं तर काय म्हणतील? या उद्गारावर त्या धमाल नाचून आलेल्या काकूंनी जे उत्तर दिले ना ते मला अजूनही जसेच्या तसे लक्षात आहे. जीवन जगण्याचा एक वेगळा दृष्टीकोन त्यांच्या त्या उत्तरात मला सापडला. ते प्रत्येकाला पटायलाच हवा असे नाही किंवा त्याबद्दल विरोध देखील केल्या जाऊ शकतो. परंतू त्या दृष्टीकोनाद्वारे काकू त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात यशस्वी झाल्या होत्या हे मात्र निश्चित होते

त्या काकू म्हणाल्या, अगं कुणी पाहीलं तर काय होईल? असे मी काय केले ज्यामुळे कुणाला मी मोठा गुन्हा केल्यासारखे वाटेल? हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत आणि वागण्याच्या अश्याच घट्ट चौकटी आपण बांधून ठेवलेल्या आहेत ज्यात आपल्या विचारांनी नाही तर इतरांच्या विचारांनी आपण स्वतःला करकचून बांधून टाकले असते. या वैचारिक बंधनांच्या दोऱ्या वयोमानानुसार आपण जास्त आवळायला लागतो आणि मग त्या आपल्या जीवनाचा भागच बनून जातात. मी असे काय केलेय की इतरांना माझ्याबद्दल वाईट वाटेल. माझ्या शरीराला हानी पोहोचविणारे हे काही दारुचे किंवा सिगरेटचे व्यसन नाही किंवा माझे पैसे घालविणारा हा काही पत्त्याचा खेळ नाही. अश्या या नाचण्यातून मला खूप आनंद मिळाला, तुला म्हणायचे असेल तर व्यायाम झाला म्हण.. पण हा क्षण मी आनंदाने जगला हे सर्वात महत्वाचे. हे जर मी केले नसते तर मनापासून करायचे होते पण केले नाही अशी हळहळ वाटत राहीली असती. कदाचित माझ्या आयुष्यात हा क्षण येईल की नाही ते देखील माहित नाही. सध्या माझे गुडघे दुखू लागलेत. डॉक्टर मुलगा म्हणाला की बहुदा सहा महिन्यात माझी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया करावी लागणार. त्यानंतर तर मला अश्या प्रकारे धमाल नाचता येणार नाही. विचार कर, ही गणपतीबाप्पाची मिरवणूक ज्यामधे मला नाचता आले ही अश्या प्रकारची माझ्या आयुष्यातील शेवटची आहे. पुढच्या वेळी मला हा आनंद घेता येणार नाही म्हणून नाचून घेतले आणि खूप आनंद मिळाला. चल आता..घरी जाऊयात. त्या दोघी गाडीवर बसून निघून गेल्या. मी पण माझ्या कामासाठी रवाना झालो पण मनात मात्र त्या काकुंनी बोलून दाखविलेला तो जीवन जगण्याचा विचार कायमस्वरुपी बसला

खरोखरीच लोक काय म्हणतील या भयापोटी बरेचवेळा अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आपल्या आयुष्यातकाहीवेळा सामाजिक दृष्टीकोनातून आपल्याला काही बाबतीत स्वतःच्या इच्छांना मुरड घालावी लागते परंतू फार जास्त परंपरागत चौकटींमधे स्वतःला बसवून आपण अनेक छोट्या छोट्या आनंदांना मुकलेलो असतो मुकत राहतो. आपल्या नशिबात हे नाहीच असा विचार करुन आपण कायम तडजोडी करीत राहतो. परंतू ते करताना हा मानवी जन्म मला देखील एकदाच मिळालाय आणि ही बाब जी कुणालाही आणि मला देखील अजिबात हानी पोहोचविणारी नाही ही स्वतःला खात्री पटल्यानंतर ती करायलाच हवी असा विचार त्या काकुंनी मांडला होता. काही मंडळी या विचारांना उत्श्रुंखल वागणे असे म्हणू शकतात परंतू आनंदाची परीमाणेही प्रत्येकाची वेगवेगळी असल्याने व्यक्तीपरत्वे हा विचार बदलू शकतो. मला मात्र पाच मिनीटे नाचून आलेल्या त्या काकुंचा आनंदाने फुलून आलेला चेहेरा आठवतो जो मनापासून जीवनावर प्रेम करणाऱ्या आणि .पुं.च्या शब्दात सांगायचे झाल्यास जीवनातील छोट्या छोट्या क्षणांना महोत्सवामधे परावर्तीत करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीचा चेहेरा होता याची पक्की खात्री होती

आपल्यालाही आपल्या चौकटींमधील आपल्या भोवती आवळलेल्या दोऱ्या जराश्या मोकळ्या करता येतील? आपल्यालाही नव्या जगाच्या काही गोष्टी गंमत म्हणून का होईना स्विकारता येतील? आपल्यालाही काही वेळ लोक किंवा कुटुंबातील लोक काय म्हणतात यापेक्षा मला काय आवडते याला प्राधान्य देता येईल? काही वेळ मला माझ्या मानाप्रमाणे जगायचे आहे अशी भूमिका स्विकारुन इतरांना पटवून देता येईल? माझा जन्म हा अनेक कर्तव्य आणि इच्छापूर्तींसाठी असला त्यात मला आनंद असला तरीदेखील मला स्वतंत्रपणे काही काळ माझ्यासाठी जगण्याची इच्छा आहे ती मला मिळावी कारण त्यासाठी मला वेगळा जन्म मिळणार नाही हे मला सर्वात पहिल्यांदा पटेल का त्यानंतर मी ते इतरांना पटवून देऊ शकेन का? एका वाक्यात सांगायचे झाल्यास मला त्या काकुंप्रमाणे काही काळ मला हवा तसा मोकळा श्वास घेता येईल का? प्रत्येकाने आपापले उत्तर शोधावे आनंद मिळवावा.



Comments

  1. खरं आहे. उत्सवप्रियता आपल्या संस्कृतीतच आहे. पण त्याच गोष्टी आपल्याला नव्याने का सांगाव्या लागत आहेत? ही झापड कधी, कशी आली ? की सततच्या विविध आक्रमणाने ती तिच्या भोवती सुरक्षा कवच उभारत गेली जी काळानंतर तिचेच रूप होऊन गेली ?

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या जाळ्यात आपण अडकत जातोय...

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23