थोडा है थोडे की जरूरत है!!

डॉल्फीन बनुया!!

त्या दिवशी राकेश असा कसा वागला? काय झाले त्याला? कसला ताण आहे का त्याच्या मनावर? त्या ताणापोटी त्याने चक्क आपल्या हाताची नस कापून घ्यावी? आपल्या संस्कारामधे काय कमतरता राहीली म्हणून राकेश असा वागतोय? या आणि असल्या अनेक वाक्यांचा संवाद राकेशच्या आई वडीलांमधे त्या रात्री सुरु होता. चांगल्या संस्कारीत घरातला आपला मुलगा असे चुकीचे वागू शकतो यावर राकेशच्या आई वडीलांचा विश्वासच बसत नव्हता. या संवादानंतर मग आपण आपल्या मुलासाठी किती करतो, आपल्या मुलासाठी दोघेही नोकरी करुन किती कष्ट करतो, त्यामुळेच त्याला सगळ्या सुखसोयी आपण दिलेल्या आहे, परंतू या सर्व त्यागाचे राकेशला काहीच वाटत नाही, तो संवेदनाहीन झालाय वगैरे पद्धतीचे दोषारोपण स्वतःच्या त्यागाचा पाढा वाचून झाला. त्यानंतर आपल्या संस्कारांच्या कमकुवतपणाबद्दल अश्रु ढाळणाऱ्या राकेशच्या आईला त्याच्या बाबांनी शांत केले नेहमीप्रमाणे काही काळजी करु नको, मी सर्व सांभाळून घेतो, पोरगा जास्त लाडावला आहे, त्याची मस्ती उतरवावी लागेल, विसरुन जा, काहीच होत नाहीमै हुँ ना! अश्या पद्धतीचे हिंदी सिनेमाच्या हिरोला शोभतील असे संवाद फेकले राकेशचे आई बाबा झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून दोघांचीही कामाची गडबड सुरु झाली आणि राकेशही आपल्या कामात लागला हे बघून काल काय झाले होते ते ती दोघे विसरुनही गेली….त्यांना हे ठाऊकच नव्हते की राकेशभोवती गुंफल्या जाणाऱ्या एका जीवघेण्या सापळ्याचा तो विसावा दिवस होता

या दिवसापासून बरोबर तिसाव्या दिवशी राकेशच्या आईच्या आणि बाबांच्या कार्यालयातील फोन पाच मिनीटाच्या फरकाने घणघणलाआणि दोघेही अक्षरशः धावत आपापल्या कार्यालयातून फोनवर सांगितलेल्या पत्त्याकडे निघाले. त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांना मिळालेल्या निरोपामुळे दोघांचाही जीवच जायचा शिल्लक राहीला होता. बातमी भयानक आणि अविश्वसनीय होती. आईचे तर काय झाले ते शब्दात मांडणे कठीण आहे. लोकलच्या त्या अर्धा तासाच्या प्रवासात तिचे किमान शंभर नवस बोलून झाले होते ते देखील विदीर्ण मनानेआई बाबा दोघेही जवळपास एकाच वेळी त्या ठिकाणी पोहोचले. लोकांची प्रचंड गर्दी त्या ठिकाणी जमली होती. पोलीसांच्या गाड्या होत्या. गर्दीला पार करत करत घाबरलेल्या मनाने ते आई-बाबा त्या घोळक्याच्या मध्यभागी पोहोचले…. आणि तेथे गेल्याबरोबर त्यांना जे दृश्य दिसले ते जगातील कोणत्याही आई-बाबांना नखशिखांत हादरवणारे दुर्दैवी ठरविणारे होते…. तेथे उपस्थित प्रत्येकाचे ह्रदय चिरुन टाकणारा हंबरडा जेव्हा त्या आईने फोडला तेव्हा त्या दृश्याची दाहकता प्रत्येकाला कळलीआई-बाबांसमोर रक्ताच्या थारोळ्यात राकेशचा मृतदेह पडला होतापोलीस आई-बाबांना सांगत होते की राकेशने त्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केलीयआत्महत्या? राकेशला काय कमतरता होती की त्याने असे काही भयंकर करावे? सर्वांनाच संभ्रमात टाकणारा तो प्रकार होताकुणाला काहीच कळत नव्हते.. पोलीसदेखील वेगवेगळे तर्क करत होते…. राकेशच्या मृतदेहाजवळ तुकडे तुकडे झालेला मोबाईल फोन त्यांनी जमा करुन घेतलाया प्रकाराबद्दल हजारो लोकांच्या चर्चा सुरु असताना झालेल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त करत असताना एक व्यक्ती मात्र दुरवर उभा राहून त्याच्या गर्द निळ्याशार सैतानी डोळ्यांनी हसत होताराकेशच्या रुपाने त्याला भारत या त्याच्यासाठी नव्या असलेल्या देशात पहिला बळी मिळाला होता. दात विचकून त्याने परत एकदा राकेशच्या रक्ताळलेल्या मृतदेहाकडे बघून विकृत हास्य केले आणि कुणालाही कळू देता तो त्याच्या पुढच्या सावजाच्या शोधात निघालात्याचे नाव होतेब्ल्यु व्हेल.

रशियातील मानसशास्त्राचा विद्यार्थी फिलीप बुडेकीन याने आणखी एका १७ वर्षीय मुलीच्या डोक्यातून उपजलेला हा मोबाईल खेळब्ल्यु व्हेल. या खेळाने सध्या जगभरात धुमाकुळ माजविला आहे. एकुण पन्नास दिवसांचा हा खेळ असून हा खेळ डाऊनलोड केला जात नाही. या खेळाचे संचालक ऑनलाईन वेगवेगळ्या लोकांना या खेळाचे निमंत्रण पाठवितात नंतर सुरु होतो या मृत्यूच्या सापळ्याचा प्रवास. खेळात सम्मीलीत झालेल्या खेळाडूला रोज एक नवे कार्य करायला सांगितल्या जाते. यामधे काही कार्य सोपे तर काही विचित्र असतात. उदा. कागदावर व्हेल माश्याचे चित्र काढणे किंवा वर वर्णन केलेल्या प्रसंगातील राकेशने विसाव्या दिवशी हाताची कापलेली नस. या खेळामधे उंच कठड्यावर टोकावर उभे राहणे, हातावर व्हेल माश्याचे चित्र ब्लेडने कापून चितारणे किंवा रात्रभर भयावह चित्रपट एकट्याने बघणे यासारखे कार्य दिले जातात. परंतू या खेळाचा शेवट मात्र स्वतःचा जीव घेण्यासंबंधीचे कार्य देऊनच होतो. राकेशने याच खेळाच्या पन्नासाव्या दिवशी त्याला दिलेले कार्य पूर्ण केले होते. त्याला दिलेले कार्य होतेकुणालाही सांगता एका बारा मजली इमारतीवर चढायचेत्याच्या कठड्यावर उभे रहायचेआणि तेथून खाली स्वतःला झोकून द्यायचेखाली पडताना डोके जमिनीवर आपटेल अश्या पद्धतीनेच पडायचेराकेशने तेच केलेया खेळासाठी सावज निवडण्याची पद्धत देखील विलक्षण आहे. सोशल मिडीयावर आपण पोस्ट करीत असलेल्या विचारांवरुन आपले मानसिक विश्व अभ्यासले जाते त्या आधारे भावनिकदृष्ट्या कमकुवत असलेले तरुण तरुणी हा खेळ खेळण्यासाठी निवडले जातात त्यांना ऑनलाईन निमंत्रण पाठवून यात बरोबर अडकविले जाते. या खेळात सर्व कसोट्या पूर्ण करण्यासाठी धमक्या दिल्या जातात, घरच्यांना हानी पोहोचविली जाईल असे सांगितले जाते त्यामुळे मुळातच मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेली, व्यवहारज्ञान नसलेली किंवा फार मित्र मैत्रीणी नसलेली या खेळामधे अडकलेली राकेशसारखी मुले मुलीपन्नासावी लेव्हल पार करीत स्वतःचा जीव देतातअसा हा विकृत ब्ल्यु व्हेल आपल्या आसपास आपल्या मुला-मुलींच्या विश्वात पोहोचला असताना आपण याचा सामना कसा करायचा?

या ब्ल्यु व्हेलचा सामना करण्यासाठी आपण सर्व पालकांना डॉल्फीन बनावे लागेल. असे म्हणतात की एखादे जहाज बुडले त्यामधील प्रवासी जर सागरात गटांगळ्या खाऊन मृत्यूला सामोरे जात असतील तर अश्या बुडणाऱ्या लोकांना डॉल्फीन मासे वाचवून किनाऱ्यावर आणतात. आपल्या तरुण मुला-मुलींना आपण स्मार्ट मोबाईल फोन घेऊन दिलेत त्यांना या इंटरनेटच्या वर्तुळात प्रवेशित केले. या महाकाय प्रदेशात अनेक ब्ल्यु व्हेल त्यांना सावज बनविण्याकरीता सज्ज झालेले आहेत. अश्यावेळी आपली कामे, आपली व्यस्तता, आपले अर्थार्जन, आपल्या पार्ट्या, आपली गुंतणूक, मुलांना सुखसोयी पुरविण्यासाठी करीत असलेला त्याग वगैरे सारख्या गोष्टीमुळे या ब्ल्यु व्हेलचे आपल्या मुलाबाळांवर झालेले आक्रमण आपल्या लक्षातही येत नाही. त्याच्या स्वतंत्र खोलीत तो या खेळाच्या कितव्या लेव्हलवर आहे किंवा त्याने हाताची नस का कापली? तो घरातून अचानक कुठे गेला? तो मित्र मैत्रीणींमधे राहता एकलकोंडा का झालाय यासारखे प्रश्न आपल्याला पडणारच नाहीत किंवा कामाचा व्याप ही सबब सांगून आपण त्याकडे दुर्लक्ष करणार असू तर आपल्यालाही एखाद्या दुपारी कार्यालयात एखादा दुर्दैवी फोन येऊ शकतोमुलांच्या जगात प्रत्यक्ष सहभाग, त्यांच्यासोबत घालविला जाणारा वेळ त्यामधून घडणारा संवाद हा आपल्याला डॉल्फीनची भुमिका निभावायला मदत करेल. डॉल्फीन प्रमाणे सतर्क राहून ब्ल्यु व्हेलच्या तावडीत सापडलेल्या किंवा सापडू शकणाऱ्या आपल्या पोटजनांना वाचविणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. बदलत्या काळात केवळ पारीवारिक संस्कारांच्या संचितावर जगून चालणार नाही तर त्याला सुसंवादाची सहभागाची जोड द्यावी लागेल जेणेकरुन भविष्यातील कोणत्याही ब्ल्यू व्हेलच्या क्रूर विकृत आक्रमणापासून आपल्याला आपल्या चिमुकल्यांना वाचविता येईल

आपण आपल्या मुलाबाळांसाठी जीवापाड मेहनत करुन त्यांना जीवनातील सर्व सुखे प्रदान करण्याची धडपड करीत असतोपरंतू आता त्यांच्यासाठी डॉल्फीन बनून त्यांना सुरक्षित आत्मविश्वासाचे जीवन प्रदान करणे हे देखील आपलेच कर्तव्य आहे. याचाच अर्थ थोडा है, थोडे की जरुरत है



Comments

  1. Sometimes its quite confusing . We are spreading awareness about the danger or spreading the danger itself.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23