My last article published under my column थोडा है थोडे की जरूरत है

माझा हात सोडू नको!!
त्या एका सायंकाळी महाविद्यालयातून थकून मी घरी पोहोचलो व जरा बसत नाही तर एक फोन आला...साधारण बऱ्यापैकी वय असलेल्या एका महिलेचा आवाज मला ऐकू आला... अविनाश मोहरील बोलता का? ...हो बोलतोय....मोहरील साहेब, आपले वय कळू शकेल? असे अचानक वय विचारुन बोलणाऱ्या त्या वयस्कर महिलेच्या पवित्र्याने मी जरा दचकलो...मी ४५ वर्षांचा आहे... म्हणजे मला मुलगा नसला तरी तुम्ही जवळपास माझ्या मुलाच्याच वयाचे आहात... असो. मी आज तुमचा दै. हिंदुस्थानमधे सुटका नावाचा लेख वाचला. त्यामधे एका पक्षाचा पाय कापून तुम्ही जगाच्या लेखी क्रूर वाटणारी कृती केलीत, पण त्याशिवाय त्या बिचाऱ्याची सुटका होऊ शकत नव्हती... त्या छोट्याश्या घटनेचा संबंध तुम्ही फार छान प्रकारे मानवी जीवनाशी जोडलात...पण प्रत्येकवेळी पाय कापून सुटका करायला तुमच्यासारखे लोक भेटत नाहीत... माझा पाय मीच कापून घेतेय...असे शेवटचे काहीतरी भयंकर बोलून त्यानंतर पुढचे पंधरा मिनीटे ती बाई फोन हातात घेऊन केवळ रडत राहीली...मी फोन कानाला धरुन तिचे हुंदके ऐकत बसलो. काही सुचत नव्हते.. साधारण पंधरा मिनीटांनंतर तिचा तो दुःखावेग ओसरल्यानंतर जवळपास रडत रडत त्या माऊलीने मला तिच्या आयुष्याची विदारक व सुन्न करुन टाकणारी कहाणी सांगितली... ते सारे ऐकल्यावर - थोडा है...हे सदर मी सुरु केल्याची सार्थकता झाल्याच्या भावेनेसोबत मला या लेखमालेने किती समृद्ध केले या बद्दलची धन्यता देखील माझ्या मनात दाटून आली. माझ्या आई-वडीलांची व गुरुजनांची ही थोर पुण्याई की मी हे लेखन कार्य करु शकलो व दै. हिंदुस्थानच्या परीवाराचे पाठबळ की ज्यामुळे ही कार्यसिद्धी होऊ शकली.... मला आठवला तो दिवस ३ सप्टेंबर २०१३ ज्या दिवशी - शुभारंभ : सकारात्मक विचारांचा - या शिर्षकासह या माझ्या 'थोडा है, थोडे की जरुरत है' सदराची सुरुवात झाली... त्या दिवशी मला हे कार्य सुरु करण्याची प्रेरणा प्राप्त झाली ती कदाचित त्या सायंकाळच्या मातृस्वरुपी महिलेच्या प्रतिसादासाठीच...
ती माऊली मला म्हणाली... अविनाश, मी तुमचा लेख वाचून आज माझा जीव जो एका नात्यात अडकून रक्तबंबाळ झालाय, थकून गेलाय..माझ्या हाताने कापून सोडवून घेतेय आणि मुक्त होतेय...काळजी करु नका हा विचार आत्महत्येचा नाही.. हा मोकळा श्वास घेण्याचा आहे. मी ६२ वर्षांची वृद्धा आहे. गेली तीस वर्षे मी नोकरी देखील केली आहे. ती मला करावी लागली कारण माझा नवरा काहीही करीत नाही. माझ्या जीवावरच माझा परीवार चालतो. माझा परीवार म्हणजे माझ्या नवऱ्याचा परीवार मी पोसत आलेय व पोसते आहे. मला मुलबाळ नाही. माझ्या नवऱ्याच्या तीन चार नातेवाईकांना आणि माझ्या नवऱ्याला मी गेली तीस वर्षे माझ्या कष्टाने पोसते आहे. परंतू या सबंध काळात मी पैसे कमावते व घराबाहेर जाते म्हणून माझ्या नवऱ्याने व त्याच्या नातेवाईकांनी मला माझ्या चारित्र्यावर वाटेल ते शिंतोडे उडवून छिन्नविछिन्न करुन टाकले आहे. मीच त्यांना पोसले परंतू त्यांनीच मला वेगवेगळी दुषणे देऊन रक्तबंबाळ करुन टाकले आहे. मी त्यांना सोडू शकली नाही ही माझी कमजोरी होती. मी हतबल होते. मी गेली तीस वर्षे हे सहन करुन मनाने मरुन गेले आहे. शरीर केवळ जिवंत आहे. परंतू आज तुमचा लेख वाचला व मरुन गेलेल्या माझ्या मनात अचानक जीव यावा असे झाले. त्या मनाने परत जगणे सुरु केले. तुम्ही त्या पक्षाची केलेली सुटका वाचून मलाही सुटका करता येईल हा विचार मनात आला. हो!! ६२ व्या वर्षी सुटका करता येईल हा विचार मनात आला. तुमचे वय ऐकल्यावर माझ्या मुलाशी बोलतेय असे वाटले म्हणून मघाशी दुःख आवरले नाही व गेल्या तीस वर्षात मनात साचलेले रडून घेतले. खरं सांगते अविनाश...तुमचा विश्वास बसणार नाही... गेल्या तीस वर्षात या माझ्या अंतस्थ वेदना मी पहिल्यांदा माझ्या शब्दरुपाने कुणालातरी सांगितल्या आहेत....आयुष्यात पहिल्यांदा...आणि आज निश्चय केला. तुमचा लेख वाचून भरपूर रडून झाले...नंतर वकिलाकडे गेली...चौकशी केली....अविनाश मी ६२व्या वर्षी माझ्या पतीपासून घटस्फोट घेण्याचे ठरविले आहे...मी सुटका करुन घेणार आहे माझी...तुमच्या त्या पक्षाप्रमाणे माझा रक्तबंबाळ झालेला पाय मी स्वतःच्या हाताने कापून मुक्त होणार आहे.....तुमचे मनापासून धन्यवाद...मला मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करण्याची ताकद दिल्याबद्दल....आणि फोन बंद झाला. 
त्यानंतर मी कितीतरी दिवस त्या फोनबद्दल व त्या माऊलीबद्दल विचार करीत राहीलो. खरोखरीच या थोडा है...सदराच्या निमीत्ताने मी समाजाला काही दिले? नाही...याउलट या सदराच्या वाचकांनी मलाच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व जीवन समजावून सांगणारे कितीतरी अनुभव दिले. या सदराच्या निमित्ताने अनेक लोक माझ्या मनाशी घट्ट बांधले गेले व त्या सर्वांच्या प्रेममयी विचारश्रुंखलेचा भाग मला होता आले याबद्दल किती धन्यता लाभावी... ती व्यक्त करायला मात्र माझ्याजवळ आज शब्द नाहीत. सुदैवाने हे माझे लेख पुस्तकाच्या रुपाने आता उपलब्ध झाले आहेत.
आज या सदरातील १७५ वा आणि शेवटचा लेख लिहीताना मी मनापासून आनंदी आहे कारण अनेक वाचकांच्या रुपाने माझा मोठा परीवार तयार झाला आहे.. या परीवाराशी जोडल्या गेलेले मैत्र अपूर्व व अद्वितीय आहे. ग्रीक तत्ववेत्ता लॉन्जायनस असे म्हणायचा की आनंदाची अमृततुल्य व अद्वितीय अवस्था क्वचितच माणसाला अनुभवायला मिळते ज्या वेळी त्याची भौतिक अवस्था सोडून तो एका विलक्षण आनंदमयी स्थितीमधे मनाने पोहोचतो...ती सब्लीमीटी. या लेखमालेच्या जवळपास प्रत्येक लेखानंतर माझ्या स्नेही वाचकांनी भरभरुन प्रतिक्रीया देताना मला त्यांच्या जीवनातील एक आत्मीय व्यक्ती मानून जे अनुभवकथन केले आहे ते म्हणजे माझ्यासाठी सब्लीमीटीच ठरले आहे...एवढा जास्त तो अपूर्व आनंद आहे. हा आनंदाचा अक्षय झरा या लेखमालेच्या या शेवटच्या लेखाच्या निमित्ताने थांबणार का? असा प्रश्न मनात आल्यावर...माझ्या पुस्तक विमोचनाच्या प्रसंगी आदरणीय गुरुवर्य प्रा. बी.टी. देशमुख सरांनी मला जाहीरपणे आदेश दिला की...अजून खूप काम करायचे आहे..त्यांच्या त्या आदेशासोबतच लेखमाला संपत असल्याने जरा खिन्न झालेल्या मनाला परत उभारी आली...परत नवे स्वप्न तयार झाले...परंतू त्याच्या पूर्ततेसाठी मला तुम्हा सर्व ज्येष्ठांचा हात आशिर्वादासाठी माझ्या डोक्यावर हवाय व माझ्या मित्र-मैत्रीणी स्नेही जनांचा हात माझ्या हातात... थोडा है, थोडे की जरुरत है या लेखमालेच्या निमीत्ताने मला आपल्या प्रेमाने श्रीमंत करुन टाकणाऱ्या स्नेही जनांसाठी या लेखमालेतील हे पुढील शेवटचे शब्द...
माझा हात सोडू नकोस..तुझे माझ्या आयुष्यात असणे ही परमेश्वराने मला दिलेली देण आहे व तेच माझे अत्यंत दिव्य असे पूर्वसंचितही...तुझ्या असण्याने मला माझ्या असण्याची सत्यता पटते..तुझ्या विचारांनी मला माझ्या विचारांना पंख देता येतात...माझा हात सोडू नकोस...तुझ्या भावना या माझ्या मनात भावनांची निरांजन प्रज्वलीत करतात ज्यामुळे माझे मन प्रकाशमान होते.. तुझा सहवास मला अमृतमयी आनंद देतो ज्यामुळे मला तो आनंद माझ्या लेखणीतून प्रसरीत करता येतो...माझा हात सोडू नकोस..तुझे निस्सीम व निखळ प्रेम माझ्या जीवनात प्राजक्त फुलविते जे मला जगण्याची उर्मी देते...मला आधारभूत असणारे तुझे आश्वस्त डोळे जे कायम माझ्या डोळ्यात नवी स्वप्ने निर्माण करतात त्या तुझ्या डोळ्यांमधून मला जाणविणारे अद्वैत तसेच राहू दे...माझा हात सोडू नकोस..तू मोठ्या विश्वासाने धरलेला माझा हात..त्या हाताच्या पवित्र स्पर्शातून मला हे वारंवार जाणविते की तुझे माझे नाते हे त्या स्पर्शाच्या भौतिकतेमधे गुरफटलेले नाही परंतू त्या भौतिक नव्हे तर मौक्तीकस्पर्शाची मला गरज असते ज्या माध्यमातून मला तुझ्या सोबतच्या त्या आत्मीक स्वरुपाच्या प्रेममयी एकरुपतेच्या व आत्मसंतुष्टीच्या स्थितीपर्यंत पोहोचता येते...जेथून नवतेचा ध्यास घेऊन आपण परत नव्या प्रवासाला निघण्यासाठी सज्ज झालो आहोत.. पंख उघडले गेलेत...नवस्वप्नाच्या दिशेने उड्डाण करण्याची सिद्धता झालीय...म्हणूनच म्हणतोय..माझा हात सोडू नकोस...कारण माझ्या सोबत तूच आहेस..अन्यथा मी कोण आहे? कुणीच नाही!!
 


Comments

  1. Very touching! An apt leave-taking.. Proud to hv such a sentimental person as a friend ! Keep writing...

    ReplyDelete
  2. Very touching! An apt leave-taking.. Proud to hv such a sentimental person as a friend ! Keep writing...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23