My article published in Hindusthan under my column थोडा है थोडे की जरूरत है

रिश्तोंका इल्जाम ना दो!!
गुलजार या माझ्या मनःस्वी आवडणाऱ्या कवीच्या लेखणीतून एका सुंदर गीतामधे परावर्तित झालेल्या काही ओळी मी एका परवा सायंकाळी शांतपणे ऐकत होतो. संगीत माणसाच्या मनाला सुखद अनुभूती देणारे सर्वात प्रभावी माध्यम आहे असे मानणाऱ्या संगीत प्रेमींपैकी मी एक आहे. संगीताची मनापासून आवड आहेच व त्यासोबतच साहित्याचा विद्यार्थी व शिक्षक असल्याने गीतांमधील काव्यानुभूती घेण्याचे माझ्या गुरुजनांनी शिकविले. म्हणूनच गुलजारच्या गाण्याचा आनंद घेताना काव्य मनाला थेट भिडते. अनेकांना असा अनुभव येतो. त्या सायंकाळी गुलजारच्या अनेकवेळा ऐकलेल्या परंतू प्रत्येकवेळी नव्याने समजलेल्या एका गीताचे शब्द ऐकल्यावर मात्र मला एक नवी बाब लक्षात आली. माणसांच्या नात्यांमधील एक विलक्षण बाब. माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपण जन्मतःच वेगवेगळ्या नात्यांमधे गुंतून या जगात येतो. ती नाती कायम आपल्या सोबत असतात. परंतू काही नाती ही मात्र आपले जीवन जगत असताना निर्माण होतात. यातील काही नाती केवळ आणि केवळ निखळ व पवित्र प्रेमाच्या आधारे तयार झालेली असतात ज्या नात्यांना कोणत्याही नावांच्या चौकटीत बसविता येत नाही. निव्वळ प्रेम आणि ते देखील सामान्य अपेक्षापूर्तींच्या पलीकडील आपुलकीच्या भावनेने तयार झालेले प्रेम हाच असल्या नात्यांचा आधार असतो. अश्या नात्यांना समजणे सामान्य जनमानसास जरा कठीण जाते कारण नात्यांना नावे दिली म्हणजे त्याला सामाजिक आधार मिळतो अशी परंपरागत समजूत असलेल्या समाजात आपण वावरत असल्याने सामाजिक दृष्टीने अश्या बिननावाच्या नात्यांना स्विकारल्या जात नाही किंबहुना त्यावर टीकाच केली जाते. परंतू माणसाच्या मनाच्या वैविध्यपूर्ण स्थितींचा विचार करता त्यात असल्या निखळ व केवळ आपुलकीयुक्त प्रेमाच्या आधारे निर्माण झालेल्या नात्याला फार मोठे स्थान आहे. खरे तर असले नाते म्हणजे एक फार सक्षम आधार असतो त्या दोघांसाठी ज्यांना या असल्या नात्याची अनुभूती प्राप्त होते. असले नाते केवळ स्त्री व पुरुषांमधेच नाही तर कोणत्याही दोन व्यक्तींमधे निर्माण होऊ शकते. परंतू हे जर विशेष करुन एका स्त्री आणि पुरुषामधे निर्माण होत असेल तर मात्र सामाजिक दृष्टीने त्याचे नामकरण करणे अत्यावश्यक बनते. आजकालच्या बदलत्या काळात स्त्री पुरुषांमधे मैत्री राहू शकते यास बऱ्यापैकी स्वीकृती दिली जाते, परंतू काही नाती ही त्याही पलीकडची असतात. त्या नात्यांना मैत्रीच्याही चौकटीत बसविता येत नाही. मुळात त्या भावनांना कोणत्याही नात्याचे नाव देता येत नाही अशी ती भावना असते व त्याचा आधार केवळ निखळ प्रेम हाच असतो. मनाच्या तरल अवस्थेमधे उत्पन्न होणारी ही इतकी श्रेष्ठ भावना समजावून सांगायला गुलजार सारखाच श्रेष्ठ कवी लागतो.. गुलजार लिहीतात-
हमने देखी है उन आँखोंसे महकती खुशबू
हाथ से छु के इसे रिश्तों का इल्जाम ना दो
सिर्फ एहसास है ये, रुह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो।।
हे प्रेम आत्मिक प्रेम आहे जे केवळ आत्म्याच्या पातळीवरच अनुभवता येऊ शकते. दोन व्यक्तींमधील या भावनेला केवळ प्रेमच म्हणल्या जाऊ शकते व त्याला विनाकारण नात्यांचे संदर्भ लावून त्या प्रेमाची पवित्रता सामाजिक दृष्टीने प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाला गुलजार -इल्जाम- असे म्हणतात. गुलजार यांच्या काव्यप्रतिभेचा अप्रतिम आविष्कार असलेल्या या ओळी काही गोष्टी फार ठळकपणे अधोरेखीत करतात. कोणत्याही प्रेमाच्या भावनेला नात्याचे नाव दिले की त्या नावासोबतच वेगवेगळ्या अपेक्षा व अपेक्षापूर्तींचे ओझे निर्माण होते. अपेक्षांच्या ओझ्याखाली नाती दबून जातात, त्यांना मनमोकळेपणाने श्वास घेता येत नाही व मग त्यात उरते ती केवळ टोचणारी अपरीहार्यता. ही व्यावहारिक अपरीहार्यता त्या मूळ प्रेमभावनेला व्यक्तच होऊ देत नाही व मग व्यक्त न झाल्यामुळे ती भावनाच संपते. मुळात ही प्रेमाची भावना इतकी तरल व सामाजिक दृष्टीने आखण्यात आलेल्या चौकटींच्या पलीकडची असते जी केवळ त्या दोन व्यक्ती ह्रदयानेच अनुभवू शकतात आणि त्यातील आत्मिक स्वरुपाची स्थिती समजून घेऊ शकतात. या प्रेमाला शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करता येत नाही. या प्रेमाला आवाज नसतो.. हे प्रेम म्हणजे निःशब्द शांतता असते जी केवळ त्याच दोन व्यक्ती ज्यांच्यात अश्या उच्च दर्जाच्या प्रेमाचा घट्ट बंध निर्माण झालेला असतो. गुलजार या सर्व भावनांचे वर्णन फार अचूकपणे करतात-
प्यार कोई बोल नही, प्यार आवाज नही
एक खामोशी है, सुनती है कहा करती है
न ये बुझती है, न रुकती है, न ठहरी है कहीं
नूर की बुँद है, सदियों से बहा करती है
हे असले कोणतेही नाव नसलेले प्रेम म्हणजे प्रकाशाचा तो पहिला व मूळ थेंब आहे ज्यापासून कायमस्वरुपी वाहणारा प्रकाश निर्माण होतो. गुलजार ला या असल्या पवित्र प्रेमाचे शाश्वत व चिरंतन रुप दर्शवायचे आहे व त्यामुळेच त्याने हा इतका सुंदर संदर्भ या प्रेमाला दिलेला आहे. मुळात हे पवित्र प्रेम स्थिती व काल सापेक्ष न राहता कायमस्वरुपी प्रवास करणाऱ्या प्रकाशागत असते ज्याला व्यावहारिक जगतातील कोणतेही संदर्भ बदलवू शकत नाहीत किंवा त्याची तिव्रता कमी करु शकत नाहीत. अथक वाहणाऱ्या अक्षय झऱ्यागत हे प्रेम निरंतर प्रवास करीत असते व त्या दोन व्यक्तींच्या आत्म्याच्या एकरुपतेचे ते सर्वोत्तम प्रतिक बनून जाते. ते प्रेम त्यांच्या जीवनाचा सबळ आधार असतो, त्यामुळे त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, त्या निस्सीम प्रेमामुळे त्यांना जीवनाच्या प्रत्येक सह-सहवासाच्या किंवा मनःसहवासाच्या क्षणांना अद्वितीय आनंदामधे परावर्तीत करण्याची क्षमता प्राप्त होते...एकंदरीत असले कोणत्याही नात्याचे वेष्टण नसलेले निखळ प्रेम ज्या दोन व्यक्तींमधे निर्माण होऊ शकते त्यांना त्या प्रेमाच्या आधारे खऱ्या अर्थाने माणुसपणाच्या सर्व संवेदना मनापासून जगता येतात व माणसाचा जन्म मिळाल्याचे सार्थकत्व अनुभवता येतं. या भावनेची अनुभूती त्या दोघांना देखील सांगता येत नाही कारण ती सांगण्याची बाबच नसते. एक मात्र खरे की त्या प्रेमाच्या दिव्यानुभूतीमुळे त्यांचे जीवन बदलून गेले असते. जीवनाच्या सकारात्मक बाजू त्यांच्या डोळ्यांमधील चकाकीवरुन लक्षात येतात, त्यांच्या जीवनाला आलेली झळाळी व जीवन मनापासून जगण्याची उर्मी देखील त्या प्रेमाचेच फलीत असते, न बोलता देखील संवाद करण्याची मनाची तरलता त्यांना लाभलेली असते, एकंदरीत त्यांच्या जीवनाला एका आनंदमयी उंचीवर त्या प्रेमाने पोहोचविलेले असते.. गुलजार लिहीतात-
मुस्कुराहटसी खिली रहती है आँखो मे कही
और पलको पे उजाले से झुके रहते है
होंठ कुछ कहते नही, काँपते होठो पे मगर
कितने खामोश से अफसाने रुके रहते है
असे नाते खरोखरीच राहू शकते? एका मुलाखतीत गुलजार यांना हा प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी उत्तर दिले - यह गाना मेरी खामोशी फिल्ममे दिखाया गया है। बीना रीश्ते के इस अनोखे प्यार की गहराईको मै भी नापने की कोशीश मे लगा हूँ, अपनी आँखोसे परंपराओंकी ऐनक हटा के... जीस दिन मै समझ जाऊँगा..आपको भी समझा दूँगा.. तब तक जिन्हे ऐसे प्यार को मेहसूस करने की खुशनसीबी मिली है, उनके प्यार मे बसी हुयी खामोशायोंमेही खोना चाहता हूँ और उन खामोशीयोंके माने खोजता रहता हूँ।
या श्रेष्ठ कवीच्या उत्तरानंतर उरते ती केवळ निःशब्द शांतता...आणि नात्यांपलीकडले प्रेम!!
 





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23