My article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

थांबुयात?
थांबुयात? सहजच तिने विचारले... त्याने उत्तर दिले नाही, केवळ तिच्या डोळ्यात बघून तिच्या मनाला होणाऱ्या वेदनांची तीव्रता जाणवून घेतली. ती असे का म्हणतेय याची पुरेपुर जाणीव त्याला होती. तिच्या जीवाची ओढताण त्याला जाणवित होती. समुद्राच्या त्या किनारी शांतपणे एकमेकांचा हात हातात धरुन ते बहुदा त्यांच्या आयुष्यात शेवटचे सोबत चालत होते. जवळपास अस्ताला पोहोचलेला सूर्य, त्याच्या मावळत्या रुपाची लाल गर्द छटा सागराच्या लाटांना उजळून टाकीत होती, त्या विस्तिर्ण सागराच्या खळाळत्या लाटा किनाऱ्यावरील पांढऱ्या शुभ्र वाळूवर सुरेख नक्षीकाम करीत होत्या परंतू एका लाटेच्या आगमनासह तयार झालेली नक्षी दुसरी लाट मोडून टाकीत होती आणि परत नवी नक्षी निर्माण करुन निघून जात होती... लाटांचा हा नक्षी मांडण्याचा व मोडण्याचा खेळ सुरु होता. खळखळत्या लाटांच्या लयबद्ध आवाजा व्यतिरीक्त कोणताही आवाज तेथे नव्हता.. म्हणूनच सखीच्या - थांबुयात? - या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्याने कसलाही प्रतिसाद न देता केवळ तिचा हातात धरलेला हात अलगद सोडून दिला आणि त्याला मनापासून आवडणाऱ्या तिच्या डोळ्यातील खोलवर वसलेले भय आणि त्या भयातून निर्माण होणारी तिची घालमेल या साऱ्या बाबींचा तो अंदाज घेऊ लागला. त्याने अलगद हात सोडल्यावर ती त्याच जागी थबकली. तो तसाच चालत चार पावले पुढे गेला..मागे वळून तिच्या डोळ्यात बघू लागला... आता तिच्या त्या सुंदर डोळ्यात आसवे गोळा झाली होती. माझा सखा केवळ चार पावले पुढे निघून गेला तर मला गलबलायला होते.. यापुढे आयुष्याचे कसे? त्या विचारांनीच तिला भरुन आले होते. त्याचीही स्थिती काही फार वेगळी नव्हती. ओठ गच्च बांधून तो तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळण्याचा जीवापाड प्रयत्न करीत होता. माझ्या आयुष्यात माझी सखी नसणार? माझ्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा आधार आज मला सोडून जाणार.. ज्या सहवासाच्या बळावर सुरेल स्वप्ने बघितली, ज्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी जीवाचे रान केले, एकमेकांच्या मनाचे सारे कंगोरे तपासून झाले, त्या कंगोऱ्यांच्या जखमांनी पिळवटून निघालेल्या मनात आता खरे प्रेम स्थिरावत असताना तिचा असा प्रश्न! खरेच परिस्थिती बिकट होती. त्याच्या डोळ्यानी थोपविलेले अश्रू तिला दिसत होते. गच्च ओठ बांधून दुःखाचा आवेग त्याने कसातरी रोखून ठेवलाय हे जाणवित होते तिला... पण ती काय करु शकणार होती. त्याला सोडून तिची तिच्या आयुष्यातील एक वेगळी चौकट होती. ज्या चौकटीच्या मर्यादा, बंधने, जबाबदारी, व खूप सारे अडसर तिला सांभाळावे लागायचे.. अश्याच एका भेटीत त्याच्या खांद्यावर डोके ठेवून ती म्हणाली होती - सख्या मी थकलेय आता. या आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या व प्राणप्रीय नात्याला जपताना व त्याचा आनंद घेताना येणाऱ्या ताणामुळे मी पार थकून गेलीय सख्या.. मी काय करु? हे सखा-सखीचे नाते समजून घेण्याची भूमिका कुठेच नसल्याने तिला या नात्याचे अस्तित्व तिच्या मनाशीच बांधून ठेवावे लागे. शरीराचे कष्ट तर कितीही सहन करण्याची ताकद तिच्यात भरपूर होती परंतू मनाची ओढताण व त्यावरील दडपणामुळे मात्र ती पार खचून गेली होती. परंतू या नात्यातील फार मोठी वेदना तर तो देखील सहन करीत होता. तिच्या खचत चाललेल्या मनावर साधी फुंकर घालण्याची देखील त्याला परवानगी नव्हती. तो तिच्या चौकटीच्या आसपास देखील नको होता. निदान त्या सूर्याला कवीवर्य ग्रेस लिहीतात त्या प्रमाणे -मेघात अडकली किरणे, तो सूर्य सोडवित होता..असे काहीतरी करण्याची मुभा होती परंतू येथे मात्र ते त्याला देखील करता येत नाही. त्याच्या प्रेमामुळे एका बाजूने सखीला जीवनातील सर्वोत्तम सुखांचा परीचय होऊ शकला असे तिच्याकडून त्याला कळत रहायचे व त्याचवेळी त्याच्या प्रेमाचे तिला होत असणारे ओझे देखील त्याला सहन करण्यापलीकडचे होते. जीवनाच्या नेहेमीच्या चौकटींपलीकडील प्रेम....विसरायचे कसे नि जपायचे कसे? या द्वंद्वामधे ती दोघेही असताना त्या सुरेल सागरी सायंकाळी तिने विचारलेल्या प्रश्नावरच जणू काळ थांबला होता....थांबुयात? चालणे शक्य नव्हते नि थांबण्याची केवळ कल्पनाही मनांना विदीर्ण करीत होती....आणि मग त्या दोघांनी ठरविले की....
.....मी वाचत असलेल्या वाचनालयातील पुस्तकाची पुढची पानेच कुणीतरी फाडून टाकली होती. बरेच दिवसांनी अश्या पद्धतीचे खूप भावनाप्रधान पुस्तक हाती लागले होते. कधी कधी असेही वाचले की छान वाटते. वाचनातील वेगळेपणा मनाला छान प्रसन्न करुन जातो. सख्याची सखी नावाची एका कथासंग्रहातील कथा मी वाचत होतो आणि कुणीतरी नेमकी पानेच फाडून ठेवली होती. कथेतील त्या दोघांचे पुढे काय झाले असेल हा अंदाज करीत असतानाच आणि त्यामधील थांबूयात? या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणतीही गोष्ट थांबवावीच लागते किंवा थांबते या संदर्भातील विचार मनात तयार होत असताना पुस्तकातील पाने फाडलेली असल्याने ती गोष्टदेखील मधेच थांबली. अशी मधेच थांबल्यामुळे अकारण मनाला एक चुटपुट लागून गेली. पण तीच तर अपूर्णतेची गोडी असते नाही का?
माणसाच्या मनाचे वैविध्य असे असते की एका बाजूने जीवनाच्या विविध कर्तव्यांची किंवा प्रक्रीयांची पूर्तता त्यांस आनंद देऊन जातेच ज्याला इतिकर्तव्यता झाली असे संबोधल्या जाते परंतू त्याचवेळी कधीकधी एखाद्या भावनेची किंवा कार्याची अपूर्णताही मनाला गोडी लावते असे आपल्याला कविवर्य म.पां. भावे - स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा - असे सांगतात. त्यामुळे एखादे कार्य पूर्ण होण्याचा जसा आनंद आहे तसाच कार्याच्या थांबण्याचाही आहेच. मैफल तीच चांगली जी अजून चालावी असे वाटत असतानाच थांबते. व्याख्यान तेच चांगले जे संपल्यावर अजून बोलला असतात तरी चालले असते अशी श्रोत्यांकडून प्रतिक्रीया येते. एकंदरीत थांबणे कळायला हवे हे महत्वाचे. एक प्रसंग आठवतो..
एकदा एका खूप लांबलेल्या परीषदेमधे समारोपीय कार्यक्रमात, कार्यक्रम कधी एकदाचा संपतो अशी सारे जण वाट बघीत बसले होते. परंतू कार्यक्रम म्हणला की सारे औपचारिक भाग व्हायलाच हवेत असा सर्वांचाच आग्रह असतो व तशी ती गरजही असते. कार्यक्रमाला नागपूरचे थोर विचारवंत डॉ. किशोर महाबळ हजर होते. त्यांना देखील परीषद आटोपून नागपूरला त्वरेने निघायचे होते. परंतू वक्त्यांना काही केल्या विचार व्यक्त करणे आवरतच नव्हते सोबतच संचालनकर्त्यांना देखील वक्त्यांनी बोलल्याचा सार सांगणे व सोबतच शेरो शायरीचा मोह आवरत नव्हता. शेवटी सर्वांची भाषणे संपली व त्यानंतर संपुर्ण परीषदेचे एकत्रीत आभार प्रदर्शन करण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. विचारमंथनामुळे अक्षरशः डोके भंडावून गेलेल्या श्रोत्यांपुढे सबंध दिवसभराच्या सर्व सत्रांमधील वक्त्यांप्रती, उपस्थितांप्रती व आयोजनातील सर्वांप्रती ऋणनिर्देश म्हणजे आता दहा मिनीटाचे आभार अशी सर्वांची धास्तीपूर्ण नजर स्विकारित मी माईकसमोर उभा राहीलो..एक भलामोठा कागद हातात होता. माझ्या गुरुजनांनी मला दिलेल्या शिक्षणाचा व विचारांचा फायदा म्हणून मी बोलू लागलो... आजच्या परीषदेच्या यशस्वीतेसाठी सहभाग दिलेल्या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने शतशः आभार मानतो व अध्यक्षांच्या परवानगीने परीषद संपली असे घोषित करतो. धन्यवाद. माझ्या जवळच्या त्या मोठ्या कागदाची घडी करुन खिशात ठेवताना डॉ. किशोर महाबळांनी आनंदाने मला मारलेली मिठी आठवते.. ते म्हणाले होते.. अविनाश...असे थांबता आले पाहिजे...
...त्यांची ती पावती आजतागायत माझ्या स्मरणात आहे..सख्याची सखी या अर्धवट वाचलेल्या कथेतील तो प्रश्न वारंवार डोक्यात येतोय...थांबुयात? हो! थांबलेच पाहीजे. ज्येष्ठ व मित्रवर्य मंडळी, पुढच्या मंगळवारचा म्हणजेच दि. १७.०१.१७ चा माझ्या - थोडा है... या लेखमालेतील १७५ वा लेख असेल व तो या लेखमालेतील माझा शेवटचा लेख असेल. थांबुयात!!
 

Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23