My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

जीवनानुभवाची सहल
परीसरातील मुलींनी ठरविले की सहलीला जायचे. केवळ मुलींनीच जायचे. त्या गटात काही मुली वयाने मोठ्या असल्याने त्यांनी सर्वांची काळजी घेण्याचेही आश्वासन दिले. आई वडीलांनी देखील परवानगी दिली. शेवटी मुलींनाही स्वतंत्रपणे काही गोष्टी करता यायला हव्यातच हा विचार सर्वांनी केला. त्या गटात अबोली देखील होती. इयत्ता सातव्या वर्गात शिकणारी लहानगी पोर. ती देखील या गटाचा अविभाज्य भाग होती. रोजचे परीसरातील खेळ, लपाछपी, गोंधळ, सणासुदीला नटणे वगैरे सर्वच वेळेला या गटासोबतच असणारी अबोली. आपल्या सर्व मैत्रीणी काही तायांसोबत सहलीला जाणार म्हणल्यावर त्या पोरीचे डोळे चमकले. बऱ्याच दिवसांनंतर अशी सहल होणार होती. शिवाय आई बाबांशिवाय म्हणजे आणखी मजा करायला मिळणार असा विचार तिच्या मनात आला. खरे तर सर्वच मुलींच्या उत्साहाला उधाण आले होते कारण आई बाबांव्यतिरिक्त ही त्यांची पहिली सहल होती. सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मानवाला उत्साही बनविते हा नियमच आहे मग ते देशाचे स्वातंत्र्य असो किंवा केवळ मुलींच्या समुहाला पालकांव्यतिरीक्त सहलीला जाण्याची परवानगी असो. सर्वच मुलींनी एकत्रीतपणे सहलीच्या आयोजनाबाबत बैठक सुरु केली आणि सगळ्याच उत्साहात असल्याने फार जोरदार चर्चा सुरु झाली. सहलीचे ठिकाण ठरविण्यापासून चर्चेला आरंभ झाला. एक दिवसाची सहल असल्याने संभावित सर्व ठिकाणांवर विस्तृत विचार झाल्यावर एक ठिकाण सर्वांनी मिळून निश्चित केले. त्याचे नाव ऐकल्यावर सर्वात जास्त आनंद अबोलीला झाला कारण त्या ठिकाणी जाण्याचे स्वप्न तिने कित्येक दिवसाचे बघितले होते. आपल्याला आपल्या मैत्रीणींसोबत तेथे जायला मिळणार याचा त्या चिमुरडीच्या मनात केव्हडा आनंद निर्माण झाला. ती जागा होती एक धमाल अम्युझमेंट पार्क आणि वॉटर पार्क. पाण्याची धमाल मज्जा, वेगवेगळ्या राईड्स, रेन डान्स, स्लो रीव्हर, टाईड टँक या सगळ्या गोष्टींचा आनंद मिळणार म्हणून अबोली खुश झाली. या सर्व गोष्टींबद्दल तिने तिच्या पाचवीच्या पुस्तकातील एका पाठामधे वाचले होते आणि चित्रे देखील बघितली होती. तेव्हापासून तिच्या मनात सारखे वॉटरपार्कला जाण्याचे स्वप्न होते. काही कारणांमुळे ते पूर्णच होऊ शकले नव्हते. आता मात्र परीसरातील सर्व मुली जाणार म्हणल्यावर तिला आपले स्वप्न पुरे होईल असे वाटले. म्हणूनच ती चिमुरडी पोर त्या चर्चेमधे सहभागी झाली.
चर्चा सुरु झाली. त्या वॉटरपार्कला जायचे कसे या महत्वाच्या मुद्द्यापासून सुरुवात झाली. बसने जाणे शक्य नव्हते. त्यामुळे गाडी ठरवून जायचे त्यांनी निश्चित केले. गाडीचा खर्च किती येईल याचा अंदाज त्यांनी काढला आणि एकुण खर्च बघता प्रत्येकाला गाडीसाठी तीनशे रुपये द्यावे लागतील असे ठरले. पैश्यासंबंधी चर्चा सुरु झाल्यावर अबोली जरा बावरली. आतापर्यंत तिच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह जरा मावळला. सर्व पोरी गाडीत कुणी कुठे बसायचे याबाबत चर्चा करायला लागल्या आणि अबोलीला सकाळीच आईने उच्चारलेले वाक्य आठविले. आई बाबांना म्हणाली होती - अहो, या महिन्यात दवाखान्याचा खर्च जरा जास्तच झाला त्यामुळे आता मौजमजा अजिबात करायला नको. मुलींच्या त्या समुहाला - मी आत्ता घरी जाऊन येते - म्हणून ती पोर धावत घरी गेली. आईचा मूड कसा आहे याचा तिनं अंदाज घेतला आणि मग तिला या ट्रीपबाबत व गाडीच्या खर्चाबाबत सांगितले. आई विचारात पडलीय हे तिच्या लक्षात आले. पण आपली आई काहीतरी मार्ग काढेल याची तिला खात्री होती. आपल्या पोरीच्या इच्छेला जपण्यासाठी तिच्या आईने तिला परवानगी दिली. कोण खुश झाली ती पोर! सुसाट धावत ती आपल्या मैत्रीणींच्या समुहाकडे गेली. आपण जाऊ..नक्की जाऊ... मोठ्या उत्साहात तिने सांगितले. तिच्या मैत्रीणींना तिच्या या अतिरीक्त उत्साहाचे कारण कळले नाही कारण गाडीचे तिनशे रुपये म्हणजे समस्या हे त्यांच्या गावीही नव्हते. अबोली परत येईपर्यंत चर्चा गाडीवरुन जेवणाच्या व्यवस्थेवर पोहोचली होती. सकाळी आपण सर्वजण घरुन डबे घेऊन जायचे असे त्या ग्रुपमधील ताईने सांगितल्यावर अबोलीला खूपच आनंद झाला. म्हणजे आईला जास्त पैसे मागावे लागणार नाहीत. आपली सहल होणार या आनंदात अबोली असताना दुसरी एक ताई म्हणाली, सकाळच्या जेवणाचे ठिक आहे परंतू दुपारी आपल्याला पार्कमधेच काहीतरी खावे लागेल. तेथे बाहेरचे अन्न नेऊ देत नाहीत त्यामुळे प्रत्येकाने दोनशे रुपये जास्ती सोबत ठेवायचे. हे वाक्य ऐकुन अबोलीच्या पोटात गोळा उठला. ती परत घरी जाऊन येते म्हणाली. त्या समुहातील एका मुलीने तिला टोकले, काय गं अबोली सारखी घरी जातेस? येते आत्ता, मला तहान लागली आहे, असे म्हणून ती पोर इवलेसे तोंड करुन घरी परतली. तिच्या आईच्या ते लक्षात आले. सहलीसाठी जास्त पैसे लागणार म्हणल्यावर तिची आई देखील चिंतेत पडली. त्या महिन्यात दवाखान्यावर जास्तीच्या झालेल्या खर्चामुळे पैश्याची जमवाजमव कठीण आहे हे तिला कळत होते परंतू पोरीचे मनही मोडवत नव्हते. शेवटी बाजूच्या काकुंकडून दोनशे रुपये उधार आणता येतील असे तिने अबोलीला सांगितले व परवानगी दिली. त्या लहानश्या पोरीला दोनशे रुपयांसाठी आईची होणारी ओढताण कळत होती पण.. मन वॉटरपार्क कडे ओढल्या जात होते. परत धावत ती चर्चेच्या ठिकाणी पोहोचली. पोरींनी तिला विचारले, अबोली तू नक्की येणार आहेस ना? मोठ्ठ्या आवाजात अबोली -हो- म्हणाली. त्यानंतरची चर्चा मात्र रंगत गेली. सोबत काय काय घ्यायचे, काय काय धमाल करायची, दुसऱ्या दिवशी सकाळी किती वाजता तयार व्हायचे वगैरे बाबींवर चर्चा झाली. साधारण अर्ध्या तासात सर्व ठरले. अबोलीने त्या चर्चेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. किती दिवसांची तिची इच्छा पूर्ण होणार होती. खूप पाणी खेळणार होती ती, चिंब भिजणार होती आणि मैत्रीणींनाही भिजविणार होती. मज्जा मज्जा करणार होती. या मज्जेसाठी पाचशे रुपये खर्च होणार होते पण आपल्या आईने आपल्याला पैसे दिले या आनंदात ती होती. चर्चा संपली. सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि सर्व मुली दुसऱ्या दिवशी प्रचंड धमाल करायची या आनंदात घरी जायला वळल्या तेव्हड्यात त्या गटातील वयाने सर्वात मोठ्या ताईने सर्वांना आवाज दिला, अगं वेड्या पोरींनो, एक महत्वाची गोष्ट तर आपण विसरलोच... वॉटर पार्कमधे जाण्याचे तिकीट, त्याचे पैसे? सर्व मुली जोरात हसल्या, अरे महत्वाचेच विसरलो!!...अबोलीच्या ह्रदयात मात्र धस्स झाले. केवळ बारा वर्षांची ती पोर सैरभैर झाली...त्या सर्वात मोठ्या ताईची पुढची वाक्येअबोलीसाठी काय असतील याची कल्पनाच करवत नाही... अगं माझ्या भावाने कालच फोन केला होता.. त्यांनी आता तिकीट कमी केलंय म्हणे... अबोलीच्या मनात परत वेडी आशा उत्पन्न झाली...पुढचे वाक्य तिच्या कानी पडले, तिकीटाचे दर साडेसातशेवरुन साडेपाचशे केले म्हणे... साडेपाचशे रुपये? अबोलीसाठी ते किती जास्त होते हे केवळ अबोलीलाच ठाऊक होते. तिच्या डोळ्यात टच्चकन पाणी आले... परंतू काही क्षणात त्या चिमुरडीने स्वतःला सावरले आणि म्हणाली, ताई मला आत्ता आठवले, माझी उद्या परीक्षा आहे. माझ्या लक्षातच नाही... मला नाही येता येणार... तेव्हडे वाक्य कसेबसे म्हणून ती घराच्या दिशेने वळली... तिच्या मैत्रीणी तिच्याबद्दल कुरकुर करीत राहील्या, हिने वेळेवर नाही म्हणले त्यामुळे आपल्याला पैसे जास्त भरावे लागतील वगैरे वगैरे...
मैत्रीणींचे कोणतेही वाक्य न ऐकता अबोली घरी पोहोचली. आईला म्हणाली, आई मी सहलीला जात नाही कारण माझा गृहपाठ राहीलाय..अभ्यासाचे पुस्तक डोळ्यासमोर घेऊन पोर त्याच्याआड रडतेय हे आईला जाणवित होते. रात्री झोपताना तिला जेव्हा आईने जवळ घेतले तेव्हा मात्र पोरीचा बांध फुटला.. ती ओक्साबोक्शी रडायला लागली.. काहिही न बोलता तिची आई तिला थोपटत राहिली...
काही दिवसांनी हे सारे कळल्यावर मी अबोलीच्या आईला म्हणालो - वहिनी, तुम्ही बोलला असतात तर सर्व मिळून व्यवस्था करता आली असती, फार मोठी गोष्ट नव्हती. अबोलीची आई मला म्हणाली - सर, अबोलीची सहल झाली असती पण यामधून तिला मिळालेला जीवनानुभव मात्र मिळाला नसता जो मला जास्त महत्वाचा वाटतो... त्यावर मी काहीच बोलू शकलो नाही.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23