थोडा है थोडे की जरूरत है article published in Hindusthan daily today

महा(न)माना
त्या दिवशी एका वृत्तवाहिनीवर मनाला प्रसन्नता देणारी एक बातमी बघितली. भारतीय रेल्वेच्या प्रवासातील एक नवे पाऊल असा उल्लेख करणारी ती बातमी होती. भारतीय रेल्वे द्वारे नव्या व आधुनिक भारताला शोभेल अश्या पद्धतीची एक नवी गाडी सुरु केली. पंतप्रधानांनी स्वतः या गाडीला हिरवी झेंडी दाखवून सर्वप्रथम रवाना केले. स्वतः पंतप्रधान या समारंभाला हजर होते म्हणजे ती गाडी विशेष असावी असे त्या बातमीच्या सुरुवातीलाच वाटले. संपुर्ण बातमी बघितल्यानंतर खरोखरीच भारतीय रेल्वेने उचललेल्या या नव्या पावलाचे मनापासून कौतुक वाटले किंबहुना अभिमान वाटला. पंतप्रधानांनी उद्घाटित केलेल्या त्या गाडीचे नाव आहे. महामाना एक्सप्रेस. ही गाडी नवी दिल्ली ते वाराणशी या मार्गावर धावते आहे. रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही आधुनिक गाडी बनविली आहे याची ती बातमी बघितल्यावर जाणीव झाली. नव्या व आधुनिक पद्धतीचे कोचेस, त्याची अत्यंत सुरेख रंगसंगती, प्रत्येक सीटजवळ मोबाईल किंवा तत्सम उपकरणे चार्ज करण्याची व्यवस्था, नव्या पद्धतीची स्वच्छतागृहे, खाली सुंदर कार्पेट, एसी वर्गाच्या डब्यांमधे वरच्या बर्थवर चढण्यासाठी सोयीच्या व्यवस्था, टीव्हीची व्यवस्था, सर्वच डब्यांमधे संगीत ऐकण्याची व्यवस्था, प्रवाश्यांच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्या, नवे आरसे, स्वच्छ व नव्या पद्धतीचे बेसीन, प्रत्येक बेसीनला लिक्वीड सोप होल्डर्स, संपुर्ण गाडीत एलइडी दिव्यांची व्यवस्था, रात्रीच्या वेळी पुस्तके वगैरे वाचण्यासाठी विशेष वाचन दिवे यासारख्या अनेक आकर्षक सोयींनी युक्त ही गाडी बनविण्यात आली. या गाडीच्या नावाची सहज फोड करताना माझ्या मनात विचार आला की या महामाना गाडीमुळे आपल्या देशाला महान माना असाच संदेश दिला जातो आहे. त्या गाडीचा तो लखलखाट आणि सर्व सुविधा पाहून मी सहजच म्हणालो,  या असल्या सुंदर गाडीतून प्रवास केला पाहीजे लवकरात लवकर.. मजा येईल. दुसऱ्या दिवशी फेसबुकवर या गाडीच्या विविध सोयींचे अंतरंग उलगडून दाखविणारे अनेक फोटो बघितले आणि या गाडीतून प्रवास करण्याची इच्छा दुणावली. खरोखरीच महामानाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या देशाला मनोमन महान मानले. परंतू अथक परीश्रम करुन एक अत्यंत आधुनिक गाडी भारतीय प्रवाशांना देणाऱ्या त्या रेल्वेच्या महान कर्मचाऱ्यांना त्यांची अपार मेहनत अतिशय थोड्या कालावधीत पार वाया जाणार आहे याची कल्पना देखील नसावी. कारण ही अत्यंत आधुनिक गाडी सुरु झाल्यापासून केवळ आठव्या दिवशी त्याच वृत्तवाहिनीवर आपल्या आधुनिक, प्रगतीशील व नव्या जमान्याच्या भारतीय बंधुभगिनींनी या गाडीची केलेली वाताहत दाखविणारी बातमी मी बघितली. त्या बातमीसोबतच परत फेसबुकवर त्या वाताहतीचे फोटो बघितले. ते सारे पाहून आपल्या देशाचे मन अद्यापही पूर्णपणे बदलायचे आहे याची तीव्रतेने जाणीव झाली.
महामाना एक्सप्रेस सुरु झालेल्या दिवशी या रेल्वेद्वारे आपल्या देशाला महान माना असाच संदेश मिळाला व त्या दिवसापासून केवळ आठ दिवसात तोच संदेश महा (न) माना मधे परावर्तित झाला. महान मानू नका किंबहुना महान बनण्याच्या प्रक्रीयेला विविध बाजुने खिळ बसतेय याची जाणीव झाली. ज्या गाडीमधे बसून प्रवास करण्याची मी स्वप्ने बघितली होती त्या आपल्या गाडीची आपणच केलेली दशा बघवत नव्हती... जागोजागी कचरा पडलेला, बीयरच्या रीकाम्या बाटल्या फोडून तेथेच टाकून दिलेल्या, आईस्क्रीमचे रिकामे कप, डबे खाऊन खरकटे सीटच्या खाली सरकवून दिलेले, बेसीन घाण पाण्यानी तुंबलेली, बेसीनच्या खालच्या कचराकुंड्या रिकाम्या आणि त्याच्या बाजूने साचलेले कचऱ्याचे ढीग, प्रथमोपचाराच्या कीट काच फोडून चोरी झालेल्या, नळाच्या तोट्या तोडून ठेवलेल्या, कारपेट जागोजागी फाडून टाकलेले, फळांची साले, शेंगांची टरफले गाडीतच टाकलेली, बऱ्याच डब्यांमधील नवे आरसे फोडलेले, हात धण्यासाठी ठेवण्यात आलेले लिक्वीड सोप ठेवण्याच्या कड्या तोडलेल्या...महत्वाचे म्हणजे ही सारी नासधुस केवळ आठ दिवसाच्या विक्रमी वेळात. केव्हडी ही महानता? आपल्या देशाची, आपल्याला अभिमान वाटावा अशी गाडी, तीची अशी दुर्व्यवस्था करणारी ही आपली कोणती मानसिकता आहे. ही घटना माझ्या एका फार संयत विचार करणाऱ्या व प्रतिक्रीया देणाऱ्या मित्राला सांगितल्यावर तो संतापाने म्हणाला, आपल्याला सरळ करायला हिटलरच हवा. त्याच्या शिवाय पर्याय नाही.
माझ्या त्या मित्राची ती प्रतिक्रीया त्याच्या नेहेमीच्या स्वभावाच्या विपरीत असल्याने मला फार आश्चर्य वाटले. त्याची ती प्रतिक्रीया थोडीशी टोकाची जरी असली तरी लोकशाहीचा खरा अर्थ आपल्याला अद्याप कळायचा आहे हे मान्य करायला लावणारी होती. जगातील सर्वात मोठी लोकशाही हे बिरुद जगभर मिरविणाऱ्या आपल्या देशातील अनेकांची मानसिकता लोकशाही म्हणजे झुंडशही अशीच आहे. या झुंडीच्या मानसिकतेतूनच बरेच वेळा अशी विकृत व घृणास्पद कृत्ये घडताना आढळतात. सहज विचार करुयात की ज्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी ही गाडी सुरु होण्याच्या आधल्या दिवशी या गाडीतील प्रत्येक गोष्ट सुंदर, रेखीव व आकर्षक बनविण्यासाठी मोठ्या कष्टाने प्रयत्न केले असतील, ज्या सफाई कर्मचाऱ्याने काळजीपूर्वक या गाडीतील एकएक गोष्ट साफ केली असेल, ज्या प्लंबरने या गाडीतील नळाच्या तोट्या बसविल्या असतील, ज्या इलेक्ट्रेशियनने या गाडीत सगळीकडे एलइडी लाईटस् बसविले असतील या सर्व कामकऱ्यांना केवळ आठ दिवसात त्यांच्याच देशवासीयांनी केलेली वाताहत बघून काय वाटले असेल? आपल्यालाच जेथे सुन्न झाल्यागत होते त्यांच्या तर निश्चितपणे डोळ्यात पाणी आले असणार. देशाला महान बनवायचे असेल किंवा देशासाठी काही करायचे असेल तर प्रत्येक सामान्य माणूस हातात बंदुक घेऊन सरहदीवर लढायला जाऊ शकणार नाही. आपल्या रोजच्या जिवनातील आपल्या वागण्याला व कृतींना देशप्रेमाचा आधार दिल्यास हे सहज शक्य होईल.
वरील घटना बघितल्यानंतर खरोखरीच आपल्याला अजून बरेच काम करायचे आहे याची तीव्र जाणिव होते. निदान या देशातील प्रत्येक संवेदनशील माणसाने आता याबाबतीत पुढाकार घेण्याची गरज आहे. काळाच्या ओघात आधुनिकतेच्या भौतिक कक्षा रुंदावणारच आहेत परंतू बौद्धिक कक्षा रुंदावणे त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे. देशाबद्दलचे प्रेम हे आपल्या रोजच्या व्यवहारातून दाखविण्याच्या सवयी आता लावायला हव्यात. मग त्या कचऱ्यासंबंधीच्या असतील, थुंकण्यासंबंधीच्या असतील किंवा सार्वजनिक संपत्तीच्या वापराबाबतच्या असतील. प्रत्येक परीवारातून हा विचार कृतीत आणण्याची प्रक्रीया वेगाने सुरु करण्याची गरज आहे. अन्यथा आपल्या देशात ज्या वेगाने आधुनिकतेकडे प्रवास सुरु आहे त्याच वेगाने समांतरपणे रानटीपणा देखील वाढत जाईल. मनापासून सभ्यता पाळणारा समाज घडवावा लागतो. तो आपोआप बनत नाही. सध्या आपल्या घरात मोठ्या होत असलेल्या पिढीला जरी आपण देशप्रेमाच्या या छोट्या छोट्या सवयी लावू शकलो तरीही फार मोठा बदल येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल. तो झाल्यासच आपण खऱ्या अर्थाने आपल्या देशाला आधुनिक व प्रगल्भ झालेला बघू. हे स्वप्न प्रत्येकाने बघून त्याच्या पूर्ततेच्या दृष्टीने अग्रेसर होणे ही काळाची गरज आहे. थोडा है और अभी बहोत करनेकी जरुरत है...
महामाना एक्सप्रेसच्या निमित्ताने महा (न) माना पासून ते महान माना पर्यंतचा प्रवास आपापल्या कार्यक्षेत्रात जमेल तेव्हड्या लोकांना सोबत घेऊन सुरु करुयात..त्वरित, फार कुणाची वाट न बघता आणि फार जास्त अपेक्षा न करता.. कदाचित आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना इतरांचीही साथ लाभेल.. आपण आशावादीच राहुया !!



  


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23