My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

शस्त्रांचा वापर.. बुद्धीने व काळजीपूर्वक
परवा लहान मुलांसाठी टी.व्ही.वर दाखविला जाणारा एक चित्रपट - नार्निया - बघत होतो. त्या चित्रपटात चार मुले एका मोठ्या घरातील कपाटातून थेट नार्निया प्रदेशात पोहोचतात जेथील मूळ रहीवासी एका आकाशवाणीनुसार याच मुलांची वाट बघत असतात. सुरुवातीच्या आश्चर्यानंतर ही मुले त्या मूळ रहीवाश्यांना एका जुलमी राणीच्या कटचाट्यातून सोडविण्यासाठी तयार होतात. त्यावेळी सांताक्लॉज त्यांना भेटस्वरुपात काही आयुधे देतो. त्यातील सर्वात मोठ्या मुलाला, पीटरला तो एक प्रभावी तलवार भेट देतो. ती तलवार म्यानेतून बाहेर काढून पीटर त्याकडे बघतो तेव्हा तलवार हातात घेतल्यावर शस्त्र हातात आल्यानंतरची चमक त्याच्या चेहेऱ्यावर बघून सांताक्लॉज त्याला सांगतो - बेटा हे शस्त्र आहे, ते बुद्धीने व काळजीपूर्वक वापरावे लागेल. चित्रपट पुढे सरकत राहीला आणि माझे मन त्या वाक्यापाशीच घुटमळत राहीले. खरोखरीच शस्त्र ही गोष्ट जेव्हा सर्वात पहिल्यांदा बनली असेल तेव्हा कदाचित मानवाने स्वतःचे संरक्षण करण्यासाठीच वापरली असणार. याचे प्रमुख कारण असे वाटते की माणूस वस्तुतः शांतीप्रीय प्राणीच आहे. त्याला आपले स्वतःचे अन्न पिकविता येत असल्याने त्याला अकारण हिंसेचा आधार घेण्याची गरज पडत नाही. परंतू मानव विकासाच्या पुढील टप्प्यांवर माणसाच्या मनातील विविध आकांक्षांनी अक्राळ विक्राळ रुप धारण केले व त्यामधून निर्माण झालेल्या आसक्तीमुळे माणसांनी एकमेकांविरुद्ध शस्त्र उगारणे सुरु केले. या सामाजिक परीस्थितीमधेही चांगुलपणा जोपासणारे लोक शिल्लक होते परंतू शस्त्रांचा आपल्या आसक्तीसाठी वापर करणाऱ्या लोकांना थांबविण्यासाठी या चांगल्या माणसांनाही शस्त्रे हाती घ्यावी लागली. त्यामधूनच नार्निया चित्रपटात सांताक्लॉजने उच्चारलेल्या वाक्याचा जन्म झाला. शस्त्र वापरावे लागले तर ते वापरावे परंतू त्याच्या वापराबाबत आपली बुद्धीमत्ता व घेतली जाणारी काळजी जास्त महत्वाची ठरते. अन्यथा शस्त्रे कधीकधी कधीही भरुन न निघणारी हानी करु शकतात. एका दहशतवाद्याच्या हातात असलेले शस्त्र आणि त्याला रोखणाऱ्या सैनिकाच्या हातात असलेले शस्त्र यात तसे बघितल्यास फरक काहीच नाही. दोन्हीही शस्त्रे धोकाधायक आहेत व दोन्हीमधून सुटलेल्या गोळ्या जीवाचीच हानी करतात. तरीदेखील त्या शस्त्रांच्या वापरांमागील भूमिका नैसर्गिक मानवीय पातळीवर चांगल्या किंवा वाईट ठरविल्या जातात. या भूमिका देखील स्थल काल सापेक्ष असतात. सिमारेषा ओलांडल्याबरोबर त्यांचेही अर्थ बदलतात. म्हणूनच शस्त्रांचा वापर बुद्धीने व काळजीपूर्वक केला जाणे अपेक्षित आहे. सामान्य माणसांच्या जीवनात प्रत्यक्ष शस्त्रे वापरण्याचा संभव नसतो. परंतू तरीदेखील सांताक्लॉजचा सल्ला आपल्या सर्वांना लागू पडतो तो आपण वापरीत असलेल्या एका वेगळ्या आयुधाच्या बाबतीत.. ते आयुध म्हणजे - शब्द.
मानवाच्या आयुष्यात शब्दांचे अस्तित्व शस्त्रांप्रमाणे एका वेगळ्याच दृष्टीने निर्माण झाले. आपल्या जीवनातील इतरांशी निगडीत असलेल्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतूनेच शब्दांची निर्मिती झाली असणार. परंतू पुढे त्या शब्दांमधील सौंदर्य शोधून त्यातून आनंद शोधण्याचा प्रयत्न स्तुत्य होता. परंतू काही मंडळींनी याच शब्दांचा उपयोग आपल्या व्यक्तीगत अहंकारांना जोपासण्यासाठी सुरु केला तो देखील त्यांच्या वापराबद्दल बुद्धी न वापरता किंवा त्यांच्या वापराबद्दल काळजी न घेता. शब्दांचा असा अविवेकी वापर सध्या समाजात फार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. विशेषतः या तंत्रज्ञानाच्या व दृक श्राव्य मीडीयाच्या जगात बरेच वेळा या शब्दरुपी शस्त्रांना हवे तसे वापरले जाते. एकंदरीतच शब्दांचा वापर सत्तेचा, पदाचा किंवा अधिकारांचा वाटेल तसा वापर करण्याच्या वृत्तीला जोपासण्यासाठी केला जातो. जो जितका जास्त बोलघेवडा तो तितका प्रसिद्ध होतो असे समिकरण तयार झाल्यामुळे लोक जाणीवपूर्वक वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसतात. सामाजिक दृष्टीने आपत्तीजनक विधान केल्याने माणूस सर्वात वेगाने व सर्वदूर प्रसिद्ध होतो असा समज या व्यवस्थेनेच दृढ केलेला आहे. विकृत अंगविक्षेप करणारी, तसेच देहप्रदर्शन करुन एखादा दुसरा चित्रपट मिळविलेली एखादी नटी केवळ काही वादग्रस्त विधाने करुन दूरचित्रवाणीवरील एखादा मोठा कार्यक्रम संचालित करते. त्या वक्तव्यांमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळते व त्यामधूनच तिला पैसाही मिळतो. हे सारे वक्तव्यांचे नवे अर्थशास्त्र सामान्य माणसाला कळतच नाही. विचारी वाटणारे किंवा निदान हे तरी विचार करु शकत असतील असे आपल्याला ज्यांच्या बद्दल वाटते ते मंडळी देखील कधी कधी असे काही बोलून जातात की त्यांच्या त्या शब्दांच्या वापराकरीता उपयोगात येणाऱ्या बुद्धी बद्दलदेखील किव करावीशी वाटते. हे आपण मान्य करुयात की काही विधाने जाणिवपूर्वक समाज दिशा किंवा राजकीय दिशा बदलविण्यासाठी उच्चारली जातात. त्यांच्या वापरानंतर माजणाऱ्या गदारोळाचा काहीतरी वेगळाच फायदा घ्यायचा असतो. ही चाणाक्षपणे केलेली बाब राहू शकते परंतू ती क्वचितच घडू शकते. याऊलट कधी कधी मात्र शब्दांच्या वापराबद्दल वापरणाऱ्याच्या सर्वसाधारण आकलन क्षमतेविषयीदेखील संभ्रम निर्माण व्हावा अशी स्थिती होते.
खरे तर प्रगत समाजामधे आपण वेगवेगळ्या यंत्रांनी घेरल्या गेलो आहोत व त्यामुळे संवादच कमी व्हायला लागला आहे. घरातल्या घरातही संवादांची देवाणघेवाण व्हॉट्स ॲपवर व्हायला लागणे हे विघटनाचेच चित्र आहे. तात्पर्य असे की नव्या युगात संवादाच्या संधी दुर्मिळ होत असताना आपण सर्वांनी मनःस्वी संवाद साधणे शिकायला हवे. परंतू होतेय अगदी त्याच्या विरुद्ध. दिवसेंदिवस विचारवंतांकडून, समिक्षकांकडून किंवा लेखकांकडून त्यांच्याकडे असलेल्या शब्दसामर्थ्याच्या बळावर समाजाला दिशा देण्याचे कार्य होण्याऐवजी वादग्रस्त वक्तव्ये देऊन सवंग लोकप्रीयता मिळविण्याचेच कार्य मोठ्या प्रमाणात होताना आढळते. साहित्यासंबंधीची संमेलने साहित्यातील नवनविन संकल्पना, नवविचार व नवप्रेरणा यांनी गाजण्यापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांनीच गाजतात ही शब्दांच्या वापराबाबतची विस्कळीत अवस्था आहे. कधीकधी एखाद्या समाजिक किंवा राजकिय प्रमुखाकडून प्रबोधनाची अपेक्षा असताना सार्वजनिकरित्या आक्षेपार्ह विधाने केली जातात. हीच विधाने नेमकेपणाने पकडून हा दृकश्राव्य मिडीया आपल्याला त्याची वारंवार - बारबार, लगातार - या पद्धतीने आठवणदेखील करुन देतो. आपल्याला प्रश्न पडतो की अश्या प्रकारचे विधान या विचारी माणसाने का केले असावे? व त्या विधानाबद्दल कडाडून टिका करणारा मिडीया तेच ते विधान दिवसभर दाखवून त्या बाबीला प्रस्थापित का करतो?
अनेक लेखकांनी योग्य शब्दांमधे बदलत्या भारतीय समाजाची समिक्षा केली आहे. त्यामधे त्यांनी भारतीय समाजाची प्रगल्भतेकडे वाटचाल होते आहे असे सांगितले आहे. खरे तर अनेक बाबतीत जसे, महीलांबद्दलचा दृष्टीकोन किंवा वैज्ञानिक स्विकार्हते संदर्भात अनेक प्रगल्भ विचार आपल्या भारतीय समाजात मांडले जात आहेत व स्विकारलेही जात आहेत. परंतू शब्दांच्या वापराबाबत मात्र ती प्रगल्भता आलेली नाही किंवा आक्षेपार्ह भाषा हे प्रसिद्धीचे नवे सूत्र बनल्यामुळे प्रगल्भता येऊ दिली जात नाही. जाणीवपूर्वक अभद्र भाषेचा वापर सर्रास केला जातोय. यामुळे सर्वात जास्त हानी होते ती म्हणजे मने दुखाविली जातात व माणसे एकमेकांपासून दुरावली जातात. शब्दरुपी शस्त्रांच्या अहितकारी वापरामुळे समाजात निर्माण होणारी दुही आपल्याला आता परवडण्यासारखी नाही कारण जीव घेणारी अनेक शस्त्रे हातात घेऊन आपले शत्रू शिताफीने आपल्या देशात प्रवेश करण्याच्या बेतात आहेत. शब्दांमुळे आपण एकमेकांवर वार करीत राहीलो तर त्या शत्रुंच्या शस्त्रांनी आपल्या सर्वांवरच वार केला जाईल व त्यावेळी आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही.
या विचारांमधे गर्क असताना नार्निया चित्रपटातल्या पीटरकडे माझे लक्ष गेले... चित्रपट संपत होता...त्याला मिळालेल्या शस्त्राचा बुद्धीचातुर्याने व काळजीपूर्वक वापर केल्याने त्याने वाईटावर विजय मिळविला होता...आपल्याजवळ असलेल्या शब्दरुपी शस्त्राचा वापर आपल्याला माणसांना एकसंध ठेवण्यासाठी करता येईल?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23