दै. हिन्दुस्थानमधे प्रकाशित माझ्या "थोडा है थोडे की जरूरत है" या सदरा अंतर्गत प्रकाशित लेख

ह्रायनोसॉरस व्हायचे की?....
साधारण  महिनाभरापूर्वीची गोष्ट आहे. नागपूरला एका रस्त्याहून मी गाडी चालवित निघालो होतो. गाडीचा वेग फार ठेवला नव्हता कारण रस्ता माझ्यासाठी नविन होता. रस्त्यात काही काही सिग्नल लागले. आणखी पुढे गेल्यावर परत एक सिग्नल लागला आणि मी माझी गाडी थांबविली. सिग्नलवर लाल दिवा लागला होता. नियमानुसार मी गाडी थांबविली. काही क्षणातच माझ्या लक्षात आले की दुचाकी वाहने सिग्नल लाल असतानाही मला ओलांडून पुढे निघुन जात होती व त्याचे वाहक माझ्याकडे वळून आश्चर्यकारक नजरेने बघत होते. दुचाकी वाहन चालविणारे बरेच वेळा अश्याच गाड्या कुठुनही काढतात म्हणून मी दुर्लक्ष केले. त्याच वेळी माझ्या गाडी मागे एक कार येऊन उभी राहीली. त्याला कदाचित उजवीकडे जायचे होते म्हणून त्याच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजविणे सुरु केले. मला कळेना की सिग्नल लाल असताना हा उगाचच हॉर्न का वाजवितो आहे. मला त्याचा रागच आला. मी पुढे जात नाही बघून त्याने गाडी माझ्या गाडीच्या बाजूने समोर घेतली व माझ्या गाडीच्या रांगेत आणून तो ड्रायव्हर मला म्हणला, भाईसाहब क्युँ खडे हो, आगे बढो यार। मी त्याला म्हणालो, कैसे बढूँ, सिग्नल बंद है। त्यावर तो हसून म्हणाला, आपको पता नही, इस सिग्नल पे कोई नही रुकता, वो चलते रहता है और हम भी चलते है। असे म्हणून खरोखरीच तो माझ्या गाडीला वळसा घालून पुढे निघून गेला..सिग्नल बंद असताना. त्या चौकात सर्वजण सिग्नल तोडून पुढे जात होते आणि मी एकटा सिग्नल हिरवा होण्याची वाट बघत थांबलो होतो. मला अचानक ह्रायनोसॉरस आठविला...
आयुष्यात सर्व कामे वेळेवर करणारी व अत्यंत योजनाबद्धतेने कार्य करणारी काही मंडळी असतात. अश्या मंडळींना कोणतेही काम उशीरा केलेले आवडत नाही. परंतू कधी कधी अश्या नियमशीर माणसांच्या बाबतीतही गमतीदार बाबी घडतात. माझा एक मित्र असाच अत्यंत आखीव आयुष्य जगतो. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी केल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. प्रत्येक गोष्ट करण्याच्या त्याच्या तारखा ठरलेल्या असतात. एकदा महानगरपालिकेचा कर भरण्याच्या तारखेपर्यंत कराची डीमांड नोट आली नसल्याने हा थेट त्या कार्यालयात पोहोचला. तेथे कॉम्प्युटर सिस्टीममधे काही समस्या झाली असल्याने त्यांना त्या डिमांड नोट देण्यास एक महिन्याचा अवधी होता. हा ठरल्याप्रमाणे कर भरण्यास गेला. तेथील कर्मचारी वर्गासाठी ही एक नवी बाब होती. करवसुलीसाठी मोहीमा काढल्याशिवाय तो वसूल होत नाही असा अनुभव असलेल्या त्या कर्मचारी वर्गाला या माझ्या मित्राबद्दल गैरसमज होणे स्वाभाविक होते. त्यांना असे वाटले की हा मागच्या वर्षीचा कर भरण्यास आला. त्यामुळे त्यांनी दंडाची रक्कम लावून पावती बनविली. पावतीत दंड बघून आमचे मित्र महोदय भडकले. त्यांनी खुलासा केला की ते त्या वर्षाचा कर भरण्यास आलेले आहेत तेव्हा त्या कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी हसायला लागला. हसता हसता तो कर्मचारी माझ्या मित्राला म्हणाला, साहेब, आम्ही लोकांच्या घरी चकरा मारुन मारुन थकून जातो पण बरेच वेळा ते कर भरत नाही आणि तुम्ही डीमांड नोट यायच्या आधीच भरायला आले. कशाला आमची कामे वाढविता? डीमांड नोट आल्यावरच या म्हणजे आम्हालाही सोयीचे होते. सर्व कर्मचारी हसत असताना माझा मित्र नियमानुसार योग्य वागूनही ओशाळल्यागत झाला तेव्हा मला युजीन लोनेस्को या फ्रेंच नाटककाराने वर्णन केलेला ह्रायनोसॉरस पुन्हा आठविला.
द्वितीय महायुद्धाच्या आधी झपाट्याने बदललेल्या परीस्थितीमधे मोठ्या प्रमाणात वाढलेल्या धर्मवादाला, नाझीवादाला बळी पडत चाललेल्या सामान्य माणसाच्या वेगवान परीवर्तनावर टिका करणारे  ह्रायनोसॉरस नावाचे नाटक युजीन लोनेस्कोने लिहीले होते. यात एका गावाचे वर्णन करताना कथेतील प्रवक्ता गावात धक्कादायक रितीने होत असलेल्या बदलावर भाष्य करतो. एका कार्यालयात काम करणारा तो प्रवक्ता एके दिवशी त्याच्या एका सहकारी मित्राला ह्रायनोसॉरस मधे परावर्तीत झालेला बघून चकित होतो. त्याच्यासोबत त्याचे इतर सहकारी देखील चकित होतात. त्याच्या पासून भिती वाटून हे सर्व मानव एका कोपऱ्यामधे उभे राहून त्याच्याकडे बोटे दाखवून बोलू लागतात. त्याला ते सर्व वाळीत टाकतात. ह्रायनोसॉरस झालेल्या त्या कर्मचाऱ्याला फार वाईट वाटते. काही दिवसांनी दुसरा एक कर्मचारी ह्रायनोसॉरस होतो. त्या दिवशी त्या पहिल्याचे दुःख जरा कमी होते. आपल्यासोबत कुणीतरी आहे याची जाणीव झाल्याने इतर मानवांकडून आपण वाळीत टाकल्या गेलो आहे याची बोच जरा कमी होते. आता ते दोघे सोबत रहायला लागतात. आणखी काही दिवसांनी अजून काही कर्मचारी ह्रायनोसॉरस होतात व अश्या प्रकारे त्यांची संख्या वाढायला लागते. आता ह्रायनोसॉरस झाल्याची त्यांच्या मनाची बोच पूर्णपणे कमी होते कारण आता त्यांचा समुह झालेला असतो. असे होता होता एक दिवस असा उजाडतो की त्या प्रवक्त्याच्या कार्यालयातील सर्वच लोक ह्रायनोसॉरस होतात आणि एक विचित्र परीस्थिती निर्माण होते. ते सर्व ह्रायनोसॉरस कोपऱ्यामधे उभे राहून या माणसाकडे बोटे दाखवितात आणि त्यांच्या त्या कृतीमुळे माणूस राहीलेला या प्रवक्त्याच्या मनाला बोच लागायला लागते. माणसाचे मनुष्यतत्व बोच बनण्याची जी स्थिती त्या काळी निर्माण झाली त्यावर भाष्य करणारे ते प्रसिद्ध नाटक आहे. नव्या जमान्यातदेखील माणुसपणाची तत्वे सांभाळणारी मंडळी बरेचवेळा वेडी ठरतात.
काळ बदलला त्यानुसार जीवन पद्धती बदलली. बदललेल्या जीवन पद्धतीला स्विकारणे क्रमप्राप्त असते, परंतू माणुसकीच्या तत्वांना मुरड घालून जगणे काही प्रामाणिक मंडळींना शक्य होत नाही. त्यांना नियमांच्या पलीकडे जाऊन वागणे जमत नाही. प्रसंगी त्यासाठी झळ पोहोचली तरी चालेल परंतू नियम मोडणार नाही असे म्हणणारी व त्यानुसार जगणारी मंडळी अलीकडच्या काळात हास्याचा विषय बनायला लागली आहेत. भ्रष्टाचाराला ज्या प्रकारे या बदलत्या समाजाने सहज स्विकारले व आता कार्यालयातून केल्या जात असलेल्या कामांसाठी थोडी फार किंवा कामाच्या स्वरुपानुसार चिरीमीरी देणे हे राजरोसपणे स्विकारल्या गेले आहे. किंबहूना ते न करणारे लोक अव्यवहारी ठरविले जातात. बदललेले ह्रायनोसॉरस त्या व्यक्तीकडे बोटे दाखवून त्याची कुचंबणा करतात. प्रतीमाह काही हजारांचे निवृत्तीवेतन व्यवस्थित सुरु करुन घ्यायचे असल्यास काहीशे खर्च केले तर काय हरकत आहे असा व्यवहारी सल्ला ह्रायनोसॉरस देतात आणि नियमांची कास धरुन चालणारी अनेक माणसे तो व्यवहारी सल्ला स्विकारुन ह्रायनोसॉरसमधे परावर्तीत होतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हे घडत असते आणि घडत राहणार. प्रत्येकाला विचारांचे व त्या विचारांच्या अनुषंगाने वर्तन करण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रश्न इतकाच आहे की या बदलत्या काळात बदलत्या संकल्पना चटकन स्विकारुन व मानवी मुल्यांना बाजूला सारुन ह्रायनोसॉरस बनून समुहाचा भाग व्हायचे? की माणूसकीची कास धरुन, मुल्याधिष्टीत जीवन जगण्याचा धास धरुन माणूस असण्याची टीका सहन करीत माणूसपण टीकवायचे?... निर्णय ज्याचा त्याचा आणि ज्याने त्याने घ्यायचा आहे...


Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18