दै. हिन्दुस्थान मधील सदर "थोडा है थोडे की जरूरत है" या सदरात प्रकाशित लेख
प्रोफेशनल हझार्डस्
एका मोठ्या विभागाचा एक मोठा अधिकारी एकदा सहज वेळ होता म्हणून आपल्या कामाच्या व्यापाचे वर्णन करीत होता. तो म्हणाला - आज मला येथे येण्यास थोडा उशीर झाला कारण घरी पत्नीने जेवण करुन जाण्याचा आग्रह धरला. मी तिला म्हणालो की तेथे मुलाखती आटोपल्यावर जेवणाची व्यवस्था करण्यात आली असणारच. परंतू तिनेच मला आठवण करुन दिली की मी गेल्या पाच दिवसांपासून घरी जेवलेलोच नाही. गेले पाच दिवस मी सारखा पळतोय. कधी मुंबईला मिटींग, कधी पुण्याला, कधी हायकोर्टात नागपूरला तारीख तर कधी येथेच माझ्या कार्यालयात महत्वाची माहिती पाठवायची म्हणून रात्री दहा दहा वाजेपर्यंत काम. इतक्या उशीरा कर्मचारी मंडळींना थांबवायचे म्हणजे त्यांच्या जेवणाची सोय करणे आलेच. मग त्यांना बरे वाटावे व त्यांचा धीर वाढाविण्यासाठी त्यांच्यासोबत जेवण. नागपूरला हायकोर्टात गेलो की तर विचारु नका. तेथे तर क्लर्क पासून तो अधिकारी सर्व काही मीच असतो. दोन दोन केसेस असतात. भल्या पहाटे येथील कार्यालयातील कामे आटोपून निघायचे, न्यायमूर्तींसमोर अजिबात वेळ होता कामा नये या सरकारी वकीलांनी दिलेल्या सूचना डोक्यात ठेऊन जेवणाचा विचारही न करता कोर्टात पोहोचायचे. तेथे सारीच कामे करावी लागतात. प्रसंगी काही कागदपत्रांच्या झेरॉक्स देखील मला स्वतःलाच काढून घ्याव्या लागतात. सोबतीला माणसे नसतात. तेथील कामाच्या मधे जमेल तेव्हा त्या हायकोर्टाच्या कँटीनमधेच वडापाव किंवा काहीतरी तत्सम खाऊन पोटाची खळगी भरायची आणि कामाला लागायचे. तेथील कामे आटोपूनही थेट घरी पोहोचणे दुरापास्तच असते. प्रथम कार्यालयात जाऊन दिवसभराची काही महत्वाची कामे हातावेगळी करायची आणि मग घरी जायचे. बरेचवेळा बाहेरुन लोकांना अधिकारी वगैरे या पदाचे कौतुक वाटते परंतू माझ्या कामामधील माझी व्यस्तता मीच जाणो. त्या दिवशी बोलण्यासाठी जरासा वेळ मिळाला म्हणून त्या अधिकाऱ्याला आपले मन मोकळे करता आले. परंतू हे सारे सांगितल्यानंतर तो पुढे म्हणाला - हे सारे आहे परंतू हे असे असतेच. यालाच प्रोफेशनल हझार्डस् म्हणतात. त्यांना स्विकारावे लागतेच. मी तो शब्द ऐकल्यावर एकदम चमकलो. हा शब्द मी विद्यार्थी दशेनंतर आताच ऐकला होता. इंग्रजी साहित्याचा अभ्यास करताना आर्थर मिलर या नाटककाराच्या ऑल माय सन्स या नितांत सुंदर नाटकामधे हा शब्द मी ऐकला होता.
अधिकारी म्हणूनच काम करीत असलेल्या माझ्या एका मित्राला काही शारीरिक त्रास सुरु झाला. त्याच्या कामाच्या पद्धतीमधे त्याला एकाच जागी बराच वेळ बसावे लागे. कॉम्प्युटरवर जवळपास सात ते आठ तास काम करणे ही त्याच्या कामाची गरज होती. कॉम्प्युटरवर काम करुन त्याच्या हाताखाली काम करीत असलेल्या देशभरातील जवळपास पन्नास मॅनेजर कडून माहिती संकलित करणे व ती हेड ऑफीसला पाठविणे हे त्याच्या कामाचे स्वरुप होते. त्यासोबतच त्याच्याकडे त्याच्या कंपनीचे काही अमेरीकेतील क्लायंटस् होते. त्यांच्याशी त्याला आठवड्यातून चार दिवस चर्चा करावी लागायची. त्यात अडचण अशी होती की अमेरीकेतील कार्यालयीन वेळा म्हणजे आपल्याकडील रात्र. परंतू क्लायंट म्हणजे सर्वोच्च प्राधान्य या उक्तीनुसार कार्य करीत असलेल्या त्याच्या कंपनीत त्याला या मंडळींशी रात्री संवाद साधावा लागायचा. रात्री साधारण तीन ते चार तास कॉम्प्युटर समोर बसून त्याला काम करावे लागायचे. या सर्व बैठ्या कामाचा परीणाम झाला त्याला सर्व्हायकल स्पॉन्ड्युलेलीसचा त्रास सुरु झाला. मध्यंतरी एकदा त्याच्या फासळ्यांमधे दुखायला लागले म्हणून सर्व टेस्ट पण झाल्या. त्रास कमी होईना म्हणून नागपूरच्या एका निष्णात डॉक्टरकडे त्याला घेऊन गेलो. त्यांनी त्यांस तपासले. काही जुजबी व्यायाम, बेल्ट आणि काही औषधी त्यांनी दिल्या. त्याला झालेल्या त्रासाचे डॉक्टर वर्णन कराताना म्हणाले - तुमचे कामच असे आहे त्यामुळे असे झाले. यालाच प्रोफेशनल हझार्डस् म्हणतात. मी पुन्हा एकदा चमकलो. साधारण दोन महिन्यांच्या फरकाने हा शब्द मी परत एकदा ऐकत होतो. हा प्रकार नेमका काय होता. त्याबद्दल विचार केला असता काही बाबी स्पष्ट झाल्या. काही माझ्या स्वतःच्या बाबतीतही होत असल्याच्या जाणविल्या.
वेगवेगळ्या पदांवर कार्य करीत असलेले अधिकारी मंडळी व त्यांच्या पदाच्या दृष्टीने त्यांना मिळत असलेला मान मरातब वगैरे या दृष्टीने आपल्याला ते नेहमीच कुतुहलाचे वाटत आलेले आहे. बरेच वेळा त्या पदांमुळे अश्या मंडळींचा हेवा देखील वाटतो. परंतू त्यांच्या त्या पदाच्या मान मरातबासोबत त्यांना सामना करावी लागणारी परीस्थिती फार वेगळी असते. वरकरणी बघता ते सारेच सोपे वाटते. परंतू एखादी व्यवस्था चालवित असताना त्या व्यवस्थेच्या संचालनामधील अडथळे त्या व्यवस्थेचा प्रमुख झाल्याशिवाय कळूच शकत नाहीत. आपल्या देशाचा विचार केला असता वेगवेगळ्या व्यवस्था कार्यरत आहेत. या व्यवस्था देशाचा कारभार योग्य पद्धतीने चालविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. परंतू या व्यवस्थांमधून मिळत असलेला लाभ सर्व सामान्य प्रत्येकाला मिळत असतो. परंतू त्या व्यवस्था उभारताना व त्याचे संचालन करताना अधिकारी मंडळींना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते याचा कधीकधी विसर पडलेला असतो. देशाला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे हा चष्मा लावूनच सर्व बाबींकडे बघण्याची दुर्दैवाने आपल्याला सवय झाली असल्याने सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही कार्याकडे संशयाच्या दृष्टीनेच बघितल्या जाते. भ्रष्टाचाराचा भाग खरा असला तरीही प्रामाणिकपणे कार्य करणारे अधिकारी मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतू तो चष्मा लावल्याने या प्रामाणिक अधिकाऱ्यांवर अन्यायच होतो. त्यांच्या त्या समर्पणाने कार्य करण्याच्या प्रक्रीयेतील प्रोफेशनल हझार्डस् चा विचारही कुणी करीत नाही. असते ती केवळ अपेक्षा. ती अपेक्षा देखील रास्त आहेच. परंतू प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशात, जेथे प्रत्येकच गोष्ट राजकीय रंग घेते, अश्या ठिकाणी अधिकारी वर्गाला कार्य करणे किती अवघड आहे याबद्दल माहिती असण्याची गरज आहे. अधिकारी सरकारी गाडीतून उतरतो किंवा एखाद्याला मोठे पॅकेज असते इतकेच वरकरणी आपल्याला दिसत असते. परंतू ती व्यवस्था राबवित असताना त्यांना सहन कराव्या लागत असलेल्या या अन्य बाबी लक्षातच येत नाहीत किंवा ते देखील त्या सर्व बाबींना आपल्या कामाचे साईड इफेक्टस् समजून स्विकारतात.
प्रोफेशनल हझार्डस् हा एक खरोखरीच सहानुभूती दाखविण्याचा विषय आहे. कामाच्या रामरगाड्यामधे स्वतःच्या प्रकृतीकडेही लक्ष न देणारे अनेक अधिकारी वेगवेगळ्या व्याधींचे शिकार झालेले असतात परंतू त्याबद्दल आपणास कल्पना नसते. दिवसेंदिवस कमी होत चाललेली कर्मचारी संख्या व उपलब्ध कर्मचारी मंडळींवर वाढता कामाचा बोझा हा कार्यालयाच्या बाहेर दिसत नाही. सध्या सर्वच कामे -अत्यंत तातडीचे किंवा कालमर्यादित व सर्वोच्च प्राधान्य - या सदरात मोडत आहेत. कार्यालयामधे एखादे काम वेळेवर झाले नाही म्हणून अधिकाऱ्याला सुनावून जाणारा नागरिक एखाद्याही दिवशी कार्यालय संपल्यावरही रात्री दहा वाजेपर्यंत अधिकारी व त्याचे सहकारी कार्य करीत असतात हे बघत नाही. अधिकाऱ्यांनी आपल्या उच्च पदांसोबत येणारे प्रोफेशनल हझार्डस् स्विकारलेलेच आहेत. तो त्यांचाच चॉईस आहे. परंतू असेही काही असते व त्याचा त्रास अधिकारी सहन करीत असतात ही सहानुभूती बाळगणे आपल्याला शक्य होईल? शेवटी देशाची व्यवस्था चालतेच आहे आणि हे सर्व अधिकारी सर्व प्रोफेशनल हझार्डस् स्विकारुनच तक्रार न करता ही व्यवस्था चालवितच आहेत हे विसरता येत नाही. त्यांना या हझार्डस् मुळे सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाबद्दल थोडी सहानुभूती दाखविण्याची गरज आहे. त्याचे मनोबल वाढविण्याचा प्रयास आपल्या सहानुभूतीतून होईल असे वाटते. बस् थोडे की जरुरत है.
Comments
Post a Comment