दै. हिन्दुस्थान मधे प्रकाशित माझ्या थोडा है थोडे की जरूरत है या सदरातील दि. १८.०८.१५ चा लेख

संस्कारांचे भाग्य
आपल्या भारतीय कुटुंबांमधे एका पिढीने पुढच्या पिढीवर संस्कार करण्याची पद्धत फार जुनी आहे. संस्कार हे परंपरागत पद्धतीने गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत देण्याची पद्धत होती व त्यामुळेच ते टिकूनही राहीले. मुळात संस्कार ही एक प्रक्रीया आहे ज्या द्वारे नव्या पिढीला सामाजिक दृष्टीने जगण्याचे नियम घरातील मंडळींकडूनच शिकविले जातात. त्यामुळे जेथे कुटुंब आहे तेथे संस्कार असणारच असे सूत्र आपल्याला बघायला मिळाले. नाही म्हणायला संस्कार शिबिरांची संकल्पना निर्माण झालीच. परंतू ढोबळमानाने संस्कार जपल्या गेले व त्याचे पालन देखील प्रत्येक काळामधे नव्या पिढीने प्रामाणिकपणे केले. परंतू नव्या शतकात मात्र या संस्कारांच्या अनुपालनाबाबत काही अडचणी निर्माण झाल्या. तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव, संस्कार रुजविण्यासाठी आवश्यक असलेल्या आजी आजोबांची घरातील अनुपस्थिती, कामाच्या राम रगाड्यात वेळेची संपलेली उपलब्धता या सर्व बाबींनी संस्कार रुजविण्याच्या प्रक्रीयेला जरा खिळ बसली. याशिवाय ज्यांच्यावर संस्कार केले जाणार आहेत त्यांच्यावर इतर बाबींचा वाढलेला प्रभाव हा देखील संस्कारांच्या जपणूकीमधे अडसर बनला. तरी देखील अनेक कुटुंबांमधून संस्कारांची जपणूक केली जाते. परंतू असे असले तरी देखील आता संस्कार रुजण्यासाठी प्रत्यक्ष संस्कारांनाही भाग्याची गरज पडायला लागलेली आहे. कारण अनेक वेळा चांगल्या संस्कारीत घरामधील मंडळी अनपेक्षितपणे चुकीची वागणूक करताना दिसतात आणि मग प्रश्न पडतो की कुठे नि काय चूक झाली. मुळात संस्कार रुजण्यासाठी ज्यांच्यावर ते केले जात आहेत ते स्वतः ते रुजवून घेण्यासाठी किती उत्सुक आहेत यावरच सारे काही अवलंबून असते. अश्या या बदलत्या वातावरणात एखाद्यावेळी पुर्णतः संस्कारित व्यक्तीला भेटल्यावर आपल्याला समाधान लाभते किंबहुना आश्चर्य देखील वाटते कारण ती संस्कारित व्यक्तीच या नव्या समुहात वेगळी (Odd man out) ठरते. मला आश्चर्यात टाकणाऱ्या एका वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुण मुलाला भेटल्यावर मला संस्कार रुजण्यासाठी संस्कारांनाही भाग्य लागते याची जाणीव झाली.
माझ्या काही प्राध्यापक मित्रांसोबत मी विद्यापीठाच्या कामानिमित्त अकोला येथे गेलो होतो. सर्व काम आटोपल्यावर परतताना माझे एक मित्र म्हणाले की त्यांचा पुतण्या अकोला येथे वैद्यकीय महाविद्यालयात शिकतो त्याची भेट घेऊन आपण जाऊया. आमच्याकडे वेळ होता म्हणून त्याला भेटण्याचे आम्ही ठरविले. आपल्या पुतण्याबद्दल, त्याच्या अभ्यासाबद्दल व त्याने मेहनतीने मिळविलेला वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाबद्दल त्याच्या काकांकडून भरभरुन मी ऐकले. त्या कौतुकाच्या वाक्यांमधे ते माझे मित्र असे म्हणाले की - सर असा पोरगा मिळणे आजकाल कठीणच आहे. तुम्ही त्याला भेटाल तेव्हा तुम्हाला अनुभव येईलच. त्यांनी असे म्हणल्यावर माझ्या मनात जरा कुतुहल निर्माण झाले. असे काय असेल त्या मुलात याचा विचार मी करायला लागलो. त्याला प्रत्यक्ष भेटण्याची मलाही इच्छा झाली.
आमची गाडी जेथे थांबली होती तेथे तो आपल्या गाडीने पोहोचला. आमची ओळख करुन दिल्यावर त्याने सर्वांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर त्या मुलाचा आणि त्याच्या काकाचा संवाद मी केवळ ऐकत होतो. त्याची चौकशी केल्यानंतर काकांनी त्याला त्याच्या खर्चासाठी पाच हजार रुपये देऊ केले. आश्चर्य म्हणजे त्या मुलाने ते नाकारले. तो म्हणाला की त्याच्या जवळ मागच्या महिन्यातील एक हजार रुपये शिल्लक आहेत आणि त्यामुळे त्याला आता केवळ दोन हजारच हवे आहेत. वैद्यकीय शिक्षण घेत असलेला आणि परगावी रहात असलेला एक मुलगा अश्या प्रकारे बोलताना मला जरा आश्चर्यात टाकून गेला. त्याचे काका त्याला समजावून सांगत होते की बेटा पैसे लागतात आणि तुझ्याजवळ राहीले तर काय हरकत आहे. त्यावरही त्या पोराने नकारच दिला. तो म्हणाला मला अगदीच गरज पडली तर मी माझ्या घरमालक काकांकडून घेईन. त्यांच्याकडे बाबांनी ठेवले आहेत. पण गरज पडणारच नाहीत. मला तितके लागणारच नाहीत. त्याचे काका मला म्हणायला लागले की सर बघा आमचा पोरगा मी देतोय तरी पैसे घेत नाही. सर त्याच्याकडे आजकाल सर्व पोरे वापरतात तसा फोन देखील नाही. त्याने केवळ पंधराशे रुपयाचा साधा फोन जवळ ठेवलाय. त्याचे म्हणणे असे आहे की ते स्मार्ट फोन घेतला की त्यात वेळ फार जातो. याउलट हा फोन असला की डिस्टर्ब होत नाही. त्याचे काका मला पुढे म्हणाले की सर हा माझा फार लाडका पुतण्या आहे. हा येथे अकोल्याला शिक्षणासाठी येणार होता म्हणून मी त्याच्या खात्यात पैसे टाकून एटीएम कार्ड त्यच्याकडे दिले आहे. जवळपास पन्नास हजार रुपयाहून अधिक रक्कम त्या खात्यात आहे. परंतू सर तुम्हाला आश्चर्य वाटेल की गेल्या एक वर्षात या पोराने ते एटीएम कार्ड एकदाही वापरलेले नाही आणि पैसे जसेच्या तसे आहेत. मला ते सारे ऐकून त्या मुलाचे फारच कौतुक वाटले. याचे कारण मला तो या काळातीलच वाटत नव्हता. महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून कार्य करीत असताना मोबाईल आणि बाहेरचे खर्च याबाबत विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन मला चांगलाच ठाऊक आहे.
स्मार्ट फोन जवळ नसणे ही सध्या फार मोठी कमतरता मानली जात असलेल्या जगात त्या मुलासारखा एक विद्यार्थी असणे ही किती विशेष बाब आहे याची मला जाणीव झाली. दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन विद्यार्थ्यांकडे असतो परंतू घरी आई वडीलांना माहित नसते. त्या फोन वरुन नाही नाही ते मेसेजेस, चॅटींग सुरु असते त्याबद्दलही पालक अनभिज्ञ असतात. पैसा तर इतका हवा असतो की त्याला मर्यादाच नाही. पाचशे रुपये फी भरण्यासाठी पैसे नाही म्हणणारी एखादी विद्यार्थीनी दोन हजार रुपयांचा ड्रेस परीधान करुन आली असते. ते कुणाकडून तरी मिळालेले गीफ्ट असते. वेगवेगळ्या गेट टुगेदर साठी, पार्टीज साठी, पैसा लागतो. दर आठवड्याला ओल्या पार्ट्या देखील विद्यार्थ्यांमधे फार मोठ्या प्रमाणात होतात. आपले गाव सोडून बाहेर राहत असलेल्या मुला मुलींसाठी तर कोणतेही निर्बंध नसतात. मग मुले काय नि मुली काय सर्वच आनंद असतो. तेथे या सर्व प्रकारच्या उत्श्रुंखल वागण्याला निर्बंध घालू शकणारी एकच बाब असते, ती म्हणजे संस्कार आणि त्या संस्कारांमुळे स्वतःवर लावून घेतलेली बंधने. परंतू नव्या काळात या संस्कारांनाही रुजण्यासाठी भाग्य लागते.
संस्कार तर जवळपास प्रत्येकच परीवारात आपल्या मुलाबाळांवर योग्य पद्धतीने केले जातात, परंतू ते रुजण्यासाठी जी माती लागते ती व्यक्तिगत विचारांवरच अवलंबून असते. आपल्या पाल्याने अनिर्बंध वागावे असे कोणत्याही पालकांना वाटणार नाही. परंतू पालकांनी दिलेले संस्कार रुजवायचे की उचलून फेकून द्यायचे हे केवळ आणि अक्षरशः व्यक्तीपरत्वे बदलत जाणारी बाब आहे. अकोल्याच्या त्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या त्या मुलाचे साधेपण माझ्या मनाला प्रचंड भावले. स्थिती अशी निर्माण झाली आहे की त्याचे हे साधेपण दुर्मीळ झाल्याने मला ते त्याचे वैशिष्ट्य वाटले. कदाचित त्या परीवाराच्या संस्कारांचे भाग्य चांगले की त्यांना रुजण्यासाठी त्या मुलासारखे व्यक्तिमत्व लाभले. त्याचे साधे व सुसंस्कारित असणे निश्चितच अनुकरणीय आहे. अर्थात अश्या प्रकारची इतर मुले मुली नाहीत असे नाही. परंतू ती संख्या फार कमी आहे. म्हणूनच एखाद्या विद्यार्थीनीला पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे, किंवा एखाद्या मुलाला वर्तमानपत्रातून लिखाण करायला आवडते किंवा एखादा मुलगा मी वर सांगितल्याप्रमाणे मोजका खर्च ठेऊन संयमितपणे साधा राहतो असे कळल्यावर समाधान लाभते आणि त्यांच्या ठायी येऊन भाग्य उजळलेल्या संस्कारांबद्दल आनंद निर्माण होतो. संस्कार हा जगाच्या प्रभावशाली वाटचालीमधील अत्यंत महत्वाचा भाग असला तरी देखील बदलत्या काळात त्यांना सुद्धा भाग्यवान ठरावे लागते. अश्या वेळी त्यांना जास्तीत जास्त भाग्यवान बनविण्यासाठी आपल्याला काही करता येईल?



Comments

  1. आपली सकारात्मक दृष्टी सर्वासाठी प्रेरणादायी होओ.आपला लेख आवडला.धन्यवाद सर.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18