थोडा है थोडे की जरुरत है @ 09.01.24
नवे मायबाप..
दहा वर्षांच्या त्या छोट्याश्या मुलाने अचानक असे काही केले की त्या ड्रॉईंग हॉलमधे बसलेले आम्ही सर्व अवाक झालो. घरात साधारण दहा बारा लोक बसले असताना, एका विषयावर चर्चा सुरु असताना तो मुलगा अचानक हॉलमधे आला काय आणि त्याने ती कृती केली काय… आमच्यापैकी कुणालाही कळलेच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या गोष्टीवर त्या मुलाच्या वडीलांनी जी प्रतिक्रीया दिली ती मला जास्त चिंतेत टाकणारी होती. बदलत्या काळात सारे काही बदलते आहे हे सर्वांना मान्य असले तरी घरातील पालक म्हणून आपल्या भूमिका देखील बदलायला हव्या हे अनेक पालकांना कळत नाही याचे मला आश्चर्य वाटले. पालक म्हणून आपल्या स्वभावात करावा लागणारा बदल कठीण असतो हे मला मान्य आहे. बरेचवेळा आपल्या आई वडीलांनी ज्या प्रकारे आपल्याला मोठे केले तीच पद्धत पुढेही राबविली जाते. याचे गमतीदार कारण म्हणजे आमच्या आई वडीलांनी आम्हाला असेच मोठे केले व आम्ही कुठे बिघडलो? हे अभिमानाने सांगून तीच पद्धत पुढच्या पिढीसाठीही वापरणारे पालक असल्याने बरेच वेळा मुलांच्या वागणूकीसंदर्भात समस्या निर्माण होतात. परंतू आम्हालाही बदलायची गरज आहे हे मान्यच होत नसल्याने समस्येचे निराकरण होत नाही. नेमकी त्या दिवशी जी घटना झाली ती समजल्यावर मी काय म्हणतोय याचा उलगडा होईल.
आम्ही एका कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात त्या घरी बसलो होतो. सर्वांचा फराळ वगैरे झाला होता. आम्ही सारे बोलण्यात गुंग होतो. ज्याच्या घरी आम्ही बसलो होतो त्या गृहस्थाने त्याच्या मुलाला टेबलवरच्या ट्रेमधे ठेवलेले पाण्याचे ग्लासेस आतमधे नेऊन ठेवायला सांगितले. दहा वर्षांचा तो मुलगा आला व त्याने तो ट्रे चलला. त्यामधे दहा बारा काचेचे ग्लासेस होते. काही पाण्याने भरलेले व काही रिकामे होते. त्या मुलाने अचानक आपल्या वडीलांकडे रागाने बघितले आणि त्याने धाडकन तो ट्रे जमिनीवर आपटला. सारे ग्लासेस फुटले व मोठा आवाज आला. रागाने आपल्या वडीलांकडे बघत तो मुलगा आतमधे निघून गेला. आम्ही सारे त्या प्रसंगाने अक्षरशः चकित झालो. असे शक्यतोवर घडत नाही व त्यामुळे ते सारे फारच विचित्र वाटले. मुलाची आई लगेच ते काच उचलण्याकरीता झाडणी घेऊन आली. तो सारा प्रकार अनाकलनीय होताच परंतू त्या आई वडीलांची प्रतिक्रीया मात्र त्याहून जास्त चकित करणारी होती. ते दोघेही एकच गोष्ट सांगत होते, आमच्या बाळूला राग आला की त्याला तो सहनच होत नाही आणि तो असेच काहीतरी करतो. ते दोघेही त्या प्रकारामुळे फारच खजील झाले होते. झालेला प्रकार एवढा विचित्र होता की काही मिनीटातच आम्ही सभा संपविली आणि तेथून निघालो. मी मनातल्या मनात त्या मुलाच्या रागाच्या प्रकटीकरणाबद्दल व त्यावर त्या आई वडीलांनी दिलेल्या प्रतिक्रीयेबद्दल विचार करत होतो. आम्ही सारे बाहेर पडलो व स्वाभाविकपणे त्याच प्रकाराबद्दल चर्चा सुरु झाली. एका माझ्या मित्राने प्रतिक्रीया दिली की हे पोरांना फालतू लाडविण्याचे प्रकार आहेत. असे ग्लासेस आपटणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. त्याचक्षणी त्या पोराच्या दोन थोबाडीत द्यायला हव्या होत्या. आता सरळ होतो. हे काय आहे? मायबापांनी जास्त लाड केल्यामुळे असे होतेय. दुसरा एक मित्र म्हणाला, सुरुवातीपासूनच हे कंट्रोल करायला हवे. तसे केले तरच मग असे ताळतंत्र सुटत नाही. आताच ही स्थिती आहे तर हा पोरगा मोठा झाल्यावर तर हाताबाहेर जाईल. माझ्या घरी हे फालतू लाड मी चालूच देत नाही. चळाचळा घाबरतात पोरे मला. माझ्या वडीलांनीही असले फाजील लाड कधी केले नाही. ती जुनी पद्धतच बरोबर होती. म्हणूनच आपण व्यवस्थित राहू शकलो. म्हणूनच हे मुलांशी मैत्री करा वगैरे फंडे काही कामाचे नाही.
मी हे सारे ऐकत होतो. त्या रागाने ट्रे आपटणाऱ्या मुलाच्या आईवडीलांची प्रतिक्रीया जशी चुकली होती तश्या माझे मित्र देत असलेल्या प्रतिक्रीया देखील सपशेल चूक होत्या. त्या मुलाच्या आईवडीलांशी बोलायचे मी ठरविले व दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केला. त्यांचे सारे ऐकल्यावर मी त्यांना शांतपणे सांगितले.. तुमचा मुलगा व तुम्ही नवरा-बायको तुम्ही तिघेही आजारी आहात. तो माणूस चमकला..जरासा चिडला देखील. पण मग मी त्याला त्यांच्या आजाराबद्दल सांगायला सुरुवात केली तेव्हा मात्र तो शांत झाला… मी म्हणालो… (क्रमशः)
Waiting ....
ReplyDelete