थोडा है थोडे की जरुरत है @ 27.08.21
पाऊस
दोन दिवसांपूर्वी अमरावती शहरात झालेल्या मुसळधार पावसातील गोष्ट. सध्या संपुर्ण महाराष्ट्रात पावसाचा धुमाकुळ सुरु आहे. त्यामधून आमचे अमरावती देखील सुटले नाही. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी आभाळ चारही बाजूने भरून आले व धोधो पाऊस कोसळायला लागला. मी विद्यापीठात कामानिमित्त बराच उशीरापर्यंत थांबलो होतो व साधारण सात वाजताच्या सुमारास मी घरी जायला निघालो. नेहेमीच्या फ्लाय ओव्हरच्या मार्गावरून न जाता मी जरा वेगळा मार्ग निवडला. तो मी का निवडला हे मला माझेच कळले नाही. पण एक वेगळ्या प्रकारची घटना माझ्यासोबत घडणार होती म्हणून कदाचीत तसे घडले. योगायोग असावा. पाऊस प्रचंड जोरात कोसळत असल्याने मी गाडी जरा हळू हळूच चालवित होतो. गाडीचे वायफर्स सर्वात जास्त वेगाने फिरत होते. परंतू पाऊस एवढा जोरात होता की त्या वायफर्स ला देखील पावसाचे थेंब जुमानत नव्हते. कसाबसा मी त्या वाफर्सच्या राऊंडमधून रस्ता शोधत निघालो होतो. शेटवटी मी गाडीचे दिवे देखील लावले. पाऊस एवढा जोरात होता की रस्त्यावर कुणीही असण्याची शक्यता नव्हती. पण अचानक मला माझ्या गाडीसमोर दोन आकृत्या दिसल्या व त्या थेट माझ्या गाडीसमोरच आल्यामुळे मला करकचून ब्रेक मारावे लागले. अचानक असे कुणीतरी गाडीसमोर आल्याने मी खरे तर चिडलो होतो. जे कुणी माझ्या गाडीसमोर आले होते त्यांना , अरे मरायचेय का गाडीसमोर येऊन? असे रागाने म्हणण्या करीता मी गाडीची काच खाली केली. परंतू माझ्या तोंडातून ते रागाचे शब्द बाहेर पडलेच नाही कारण गाडीच्या समोर आलेल्या दोन व्यक्ती जेव्हा बाजूने जाऊ लागल्या तेव्हा मी त्यांना बघून रागावण्याच्या ऐवजी वेगळेच काहीतरी बोललो.
गाडीच्या बाजूने दोघेजण जात होते. नवरा बायको होते ते. बायकोने आपल्या हातावर एका लहान मुलाला चादरीमधे गुंडाळून घेतले होते. साधारण तीन महिन्याचे बाळ ते असावे. भरधाव पावसात ती बाई त्या मुलाला आपल्या हातावर घेऊन घाईघाईने निघाली होती व तिच्या नवऱ्याने तिच्यावर व त्या बाळावर छत्री धरली होती. तो स्वतः चिंब भिजला होता व ती देखील बऱ्यापैकी ओली झाली होती. तेवढ्या मुसळधार पावसात त्यांनी त्या बाळाला पावसापासून बचावले होते. परंतू तो प्रयत्न फार यशस्वी होत नव्हता. दोघेही चेहेऱ्यावरून प्रचंड घाबरलेले दिसत होते व वेगाने पायी पायी कुठेतरी निघाले होते. मला परीस्थितीचा अंदाज आला. त्या बाळाला बरे वाटत नव्हते व त्याला डॉक्टरकडे दाखवायला ते पती पत्नी निघाले होते. त्याला दवाखान्यात नेण्याच्या घाईमुळेच ते माझ्या गाडीसमोर आले होते. त्यांना रागावण्याच्या ऐवजी मी विचारले की एवढ्या पावसात कुठे निघालात? ती बाई मला म्हणाली, भाऊ पोराला खूप ताप चढलाय. त्याला दवाखान्यात नेतोय. मी त्या दोघांनाही मुलासकट गाडीत बसायला सांगितले. कसलाही विचार न करता ती दोघे त्वरित गाडीत बसली. गाडीत बसल्यावर त्यांनी ज्या डॉक्टरकडे त्याला न्यायचेच त्यांचे नाव सांगितले. सुदैवाने ते डॉक्टर माझ्या परीचयाचेच होते. मी गाडी त्यांच्या दवाखान्याच्या दिशेने चालविणे सुरु केले.
ती बाई पुढे सांगू लागली, माझ्या बाळाचे अंग फणफण करतंय आणि आता ताप बहूदा खूपच वाढलाय कारण तो जरा वेळ आधी बेशुद्ध पडल्यासारखा झाला होता. पाऊस सुरु होता म्हणून आम्ही घरीच उपाय करून पाहीले. थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या त्याच्या डोक्यावर, त्यानंतर अंग पुसून काढले परंतू आता काही वेळापूर्वी त्याने काही क्षणाकरीता डोळेच पांढरे केले व बेशुद्ध झाला. मग पुन्हा त्याला शुद्ध आली. तसे झाले म्हणून आम्ही तातडीने त्याला हातावर घेऊन निघालो. पाऊस सुरु असल्यामुळे रस्त्यावर रीक्षा किंवा ऑटोरीक्षा देखील नव्हती. त्यामुळे आम्ही पायीच निघालो होतो. तुम्ही देवासारखे भेटलात. तिने हा सारा घटनाक्रम सांगेपर्यंत दवाखाना आला. नेमका तो बंद होता. मग मी डॉक्टर साहेबांना फोन केला व पेशंटला तपासावे अशी विनंती केली. अवघ्या काही मिनीटात तो मुलगा दवाखान्यातील टेबलवर होता. डॉक्टरांनी त्याला तपासले. त्यांनी तपासणी केल्यावर बाळाला सलाईन लावले व त्यातून दोन इंजेक्शन दिले. नंतर ते म्हणाले की बरे झाले लवकर आणलंत, अन्यथा परीस्थिती गंभीर होती. पुढे दोन तास त्या बाळाला तेथे ठेवावे लागणार होते. सारे काही ठीक आहे अशी खात्री पटल्यावर मी निघालो. त्याक्षणी त्या दोघा पतीपत्नीने माझे पाय गच्च धरले व ते रडू लागले. खरे तर मी फार काहीच केले नव्हते. कुणालाही हे असे चित्र दिसले असते तर अशी मदत केलीच असती. त्यांनी असे पाय धरलेले वगैरे बघून मी चटकन त्याना उठवले. रडत रडतच ती आई बोलत होती. मुलाला आता बरे वाटेल म्हणून ती जरा निश्चिंत झाली होती. त्यामुळे भरभरून बोलत होती. साहेब, आज तुम्ही नसते तर काय झाले असते मला माहीत नाही. आमचा मुलगा आज मरता मरता वाचला. आमच्या परीवारात एक बाळ या आधी असंच तापामुळे गेलं आहे. माझ्या जावेचं बाळ दवाखान्यात न्यायला उशीर झाला म्हणून आम्ही गमावलं. आज याच्याही बाबतीत असंच होऊन राहीलं होतं. म्हणून मी ऑटोरीक्षाची वाट न पाहता पायीच निघाली. ताप उतरत नव्हता हे पाहिल्यावर मला काही सुचलंच नाही. माझे यजमान म्हणत होते की पाऊस थांबण्याची वाट पाहू पण मी यांचे ऐकलं नाही, पोराला चादरीत गुंडाळलं आणि सरळ निघाली. मग हे पण आले सोबत. पण बरं झालं तुम्ही भेटले. हात जोडून माझ्यासमोर उभ्या असलेल्या आई वडीलांना मी बघत होतो. पावसाने दोघांनाही अक्षरशः झोडपून काढले होते. पाण्याने त्यांचे कपडे ओले चिंब झाले होते. परंतू पावसाच्या पाण्याने ओल्या झालेल्या चेहेऱ्यावर आपला मुलगा सुरक्षित आहे याचा आनंद आणि त्यामुळे वाहणारे आनंदाश्रू देखील होते. त्या दोघांच्याही चेहेऱ्यावरचे पावसाचे पाणी आणि आनंदाने निखळलेले अश्रू यातला फरक मला स्पष्ट जाणवत होता. त्यांचा निरोप घेऊन मी परत निघालो. पाऊस कोसळतच होता. गाडी चालवताना घडलेला हा प्रसंगच पुन्हा पुन्हा मनात येत राहीला आणि अगदी सहजच मनात विचार आला.
आपल्या तीन महिन्याच्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्याला चादरीमधे लपेटून मुसळधार पावसात निघालेली ती आई, आणि स्वतः ओला होत तिच्या व बाळाच्या अंगावर पाणी पडू नये म्हणून बाजूने घाईघाईत चालणारा बाप हेच जगातील सर्व आई व वडीलांचे प्रातिनीधिक चित्र आहे. आपल्या बाळाला वाचविण्यासाठी जगातील सर्व आई बाप हेच करतील याबद्दल मनात शंकाच नाही. परंतू मुसळधार पावसाची तमा न बाळगता आई वडीलांनी ज्या मुलाला दवाखान्यात नेऊन ज्याचे प्राण वाचविले तो मुलगा, मोठा झाल्यावर हे असेच आई वडीलांच्या बाबतीत करेल का?
पाऊस कोसळतच होता, गाडीचे वायफर्स जोरात फिरत होते व मुसळधार पावसात मी गाडी चालवत होतो. डोळ्यासमोर समाजात अस्तित्वात असलेले वृद्धाश्रम आणि आधुनिक काळातील त्याने नवे नामकरण झालेले ओल्ड एज होम येत होते. यांची दिवसेंदिवस वाढती संख्या मनात येत होती. वर्षानुवर्षे परदेशातून आपल्याजवळ रहायला येणाऱ्या मुलाबाळांची वाट बघणारे अनेक वृद्ध आई वडील आठवले आणि मनात तोच प्रश्न पुन्हा पुन्हा येत राहीला.. वेळ आली तर तो मुलगा आपल्या आईच्या बाबतीत असे काही घडले तर कशाचीही तमा न करता धावत येईल का?
पाऊस कोसळत राहीला, परंतू खात्रीलायक सकारात्मक प्रतिसाद मात्र मनातून उमटला नाही. या सकारात्मक प्रतिसादाकरीता काय करता येईल?
खुप मार्मिक लेखन सर🙏🏻
ReplyDelete
ReplyDeleteखूप सुंदर हृदयस्पर्शी लेख सर
कालच माझ्या बाबतीत घडलेली घटना.शेवटी वैभवची मदत घेऊन समोरच्यास हॉस्पिटल मध्ये भरती केले.. अवी, God bless u.
ReplyDeleteसर, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु. कदाचन।। हा कर्मयोग सांगणारा श्लोक वाचायला आणि भाषणात सांगायला चांगला वाटतो पण कर्मयोग जगणं महत्त्वाचं.ते आपण करत आहात. हा आपल्या संस्काराचा ठेवा आहे. खूप छान. 👏👏
ReplyDeleteखूप हृदयस्पर्शी घटना,
ReplyDeleteVery touchy...
ReplyDeleteVery touchy....
ReplyDeleteHeart touching story sir
ReplyDeleteआपण त्या दाम्पत्याला केलेल्या सहकार्याबद्दल मला आपलेच अभिनंदन करावेसे वाटते पण तुमची पल्याकडून असणारी पुढील अपेक्षा पूर्ण होण्याबद्दल मन साशंक आहे
ReplyDeleteअशा प्रकारच्या समुपदेशनाची सर्व स्तरांमध्ये आवश्यकता आहे. खूप छान लेखन.
ReplyDeleteहार्दिक अभिनंदन.
प्राध्यापक संजय पाटील वाशिम
कुठल्याही नात्यामधे दुरावा का निर्माण होतो? Lack of communication, geographical distance की मनात अडकून पडलेली तेढ? ते म्हणतात ना never throw a wet blanket over any disagreement. एखाद्याला समोरच्या व्यक्तीची अगदी दखल सुद्धा घेऊ नये असे का वाटते? 'beyond repair' असा tag एखाद्या नात्यावर का लागतो?
ReplyDeleteजस ह्या लेखात असा प्रश्न उपस्थित केला आहे की... तो मुलगा कशाचीही तमा न बाळगता धावत येईल का? ह्याच उत्तर मिळवताना असा विचार मनात येतो की प्रत्येक वेळी physically उपस्थित राहणे (geographical distance मुळे ) कदाचित शक्य नसेल पण जर ते आपापसात healthy bonding share करत असतील तर जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जीव तोडून मदत करतील हे मात्र नक्की. (eg : Modern Forms of Communication मुळे एका मुंबईतील मुलाने, आपल्या नागपूर येथील आईला तातडीने medical facility मिळवुन दिली.)
पालक म्हणुन मीच माझ्या पाल्यामधे values installed केल्या आहेत. मीच त्याच्या स्वप्नांच्या पंखांना बळ दिलाय. मीच त्याचा role model आहे. भूतकाळात त्याचा समोर मी स्वतः ला कसे present केलेय, हे तपासून बघणे महत्वाचे वाटते. As You Sow So Shall You Reap.
कुठल्याही नात्यात पारदर्शकता अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो, त्याला वय आणि नात्याचे बंधन नसावे. पालक आणि मुलं ह्यांच्यामधील communication अगदी पहिलेपासून crystal clear असावे, वैचारिक 'give and take' मनमोकळे असावे आणि अश्या भक्कम पायावरच हे नाते खंबीरपणे उभे राहील.
परस्परांमधील अपेक्षांचा कळस सामंजस्याने उभारावा. कुठलही नाते ओझे होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
दोन्ही बाजूंनी सातत्याने नाती जपण्याचा(update करण्याचा) प्रयत्न केल्यास..
Geographical distance असूनही
मायेची ऊब आसमंत उजळून टाकेल ह्यात शंका नसावी.
As usual.नेहमी प्रमाणे तुम्ही
ReplyDeleteमदत केली. Helping nature. college madhe फिट आलेल्या मुलीचा प्रसंग आठवला🙏🙏🙏