थोडा है थोडे की जरुरत है @ 06.07.21
सुपर स्वीट टुथ
एका प्रश्नाचे पटकन उत्तर द्या… आपल्यापैकी किती जणांना जेवण झाल्यावर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते व ते काहीतरी गोड खाल्ले की छान वाटते? मला खात्री आहे की जवळपास प्रत्येकालाच अशी इच्छा होत असते कारण ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आहे. अगदी झणझणीत पदार्थ खाणाऱ्या मंडळींना देखील जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा असते. अनेकांची ही इच्छा असते म्हणूनच बरेचवेळा होटेलमधे जेवण आटोपल्यावर सोप आणि खडीसाखर सोबत देतात आणि प्रत्येकच व्यक्ती त्या सोपेसोबत खडीसाखरीचे दोन दाणे तोंडात टाकतो. या गोड पदार्थ खाण्याची इच्छा ज्यांना असते त्या आवडीला स्वीट टुथ असे म्हणतात. असा स्वीट टुथ जवळपास प्रत्येकच व्यक्तीला असतो. पण मला असे वाटते की या स्वीट टुथ मधून निर्माण होण्याऱ्या गोड खाण्याच्या इच्छेला जरा वेगळ्या स्वरुपात बघितले व त्याचा आयाम जर वाढवला तर किती छान होईल!
स्वीट टुथ हा संकल्पना थेट इ.स. १३०० मधे उदयाला आली म्हणजे तश्या पद्धतीने ही मानवाची भावना पहिल्यांदा त्यावेळी मांडल्या गेली. पण मुळात ही भावना मानव विकासाच्या सर्वच टप्प्यांवर अस्तित्वात असणार. यासोबत आणखी एक बाब जी मानवी विकासासोबत कायम माणसाच्या सोबत आहे. त्याचे नामकरण अजून अश्या पद्धतीने झालेले नाही परंतू आपण त्याला स्वीट टुथ या संकल्पनेचे व्यापक रुप म्हणुयात. सुपर स्वीट टुथ. जसे स्वीट टुथ या संकल्पनेमधे गोड पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीकडे गोड बोलण्याची देखील एक शक्ती आहे. परंतू त्या शक्तीचा वापर मात्र फार कमी प्रमाणात होताना आपल्याला दिसतो. संवादाच्या माध्यमातून एकमेकांशी भावनिक आणि व्यापक संबंध प्रस्थापित करणे ही खरे तर मानवी जीवनाची एकमेव अशी योग्यता आहे जी इतर कोणत्याही सजीव प्राण्याकडे नाही. म्हणूनच प्राण्यांचा कळप आणि माणसांचा समाज असतो. अर्थात या सर्व समाज बांधणीच्या प्रक्रीयेमधे आपले संबंध दृढ व सकारात्मक ठेवण्यासाठी प्रत्येकाला जवळपास रोजच प्रयत्न करावे लागतात. याचे कारण आपण एका विकासात्मक प्रक्रीयेतून प्रवास करीत आहोत. त्यामुळे जीवनाचा चढता आलेख हा परस्पर संबंधांवर अवलंबून असतो व त्या संबंधांच्या बळकटीसाठी रोजच आपल्याला प्रयत्न करावे लागतात. यामधे अन्य सर्व गोष्टींपेक्षा सर्वात जास्त भूमिका या गोड बोलणाऱ्या सुपर स्वीट टुथची असते. परंतू दुर्दैवाने याचे महत्व अनेकांना कळतच नाही व ते न कळल्यामुळे नाते संबंध जोपासण्याच्या प्रक्रीयेमधे ते करीत असलेले प्रयत्न फोल ठरतात किंवा त्यांच्या त्या प्रयत्नांचा हवा तसा परीणामच होत नाही. अश्या मंडळींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्यांना हे कळतच नाही की नेमकी समस्या कुठे आहे. त्यांना कायम हे वाटत राहते की आपण इतरांकरीता एवढे काही करतो, आपण नाते जपण्यासाठी खूप प्रयत्न करतो, त्याकरीता कष्ट घेतो परंतू आपल्या या कष्टांची किंवा काम करण्याची हवी तशी किंमत कुणी करत नाही. आपण लोकांसाठी एवढे सारे करुनही अपेक्षित असा प्रतिसाद आपल्याला मिळतच नाही. अश्या मंडळींच्या कामामधे काहीच कमतरता नसते, त्यांच्या कष्ट करण्याच्या क्षमतेमधेही काही अडचणी नसतात. या मंडळींचा एकच दोष असतो व तो म्हणजे यांना त्या सुपर स्वीट टुथचा वापर करता येत नाही. त्यामुळे यांच्याबद्दल लोकांचे चांगले मत बनतच नाही. बरे या समस्त मंडळींना हा स्वीट सुपर टुथ वापरणाऱ्या लोकांबद्दल राग असतो. त्यांना गोडबोले, किंवा केवळ गोड बोलून काही होते का? बोलणेच ऐका फक्त, करायला काही नको अश्या प्रकारची दुषणे ही मंडळी देत असतात. परंतू त्या सुपर स्वीट टुथमुळे होणारे फायदे किंवा नात्यांमधील गोडवा मात्र ही मंडळी विसरतात. जे लोक हा सुपर स्वीट टुथ वापरतात ते लोक इतरांकरीता काहीच करीत नाही असा सरसकट समज देखील चुकीचा आहे. किंबहुना अश्या मंडळींना नाती जोपासण्याच्या प्रक्रीयेतील केवळ परीश्रम करण्यासोबत आणखी महत्वाची गोष्ट कळलेली आहे असे म्हणावे लागेल.
आजकालच्या या आधुनिक काळात खरे तर आपल्यापैकी प्रत्येकाजवळ वेगवेगळ्या संसाधनांची उपलब्धता झालेली आहे. त्यामुळे फार मदत करावी लागेल अशी स्थिती नाही. याशिवाय आपल्या सर्वांची व्यस्तता एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की मदत करायला देखील वेळ नाही. म्हणूनच त्याप्रमाणे समाजात तश्या व्यवस्था निर्माण झाल्या. लग्नसमारंभात सुरुवातीला खूप सारी कामे करायला नातेवाईक लागायचे, परंतू आता तर कॉन्ट्रॅक्ट आहेत. दिवसभरातील छोटी छोटी कामे करायला देखील आता एजन्सीज तयार होत आहेत. एवढेच काय परंतू रुग्णालयात देखील सर्वांची सोय व्हावी आणि कुणावरही ताण पडू नये म्हणून जेवणासकट पॅकेज आहे. त्यामुळे सध्या फार काही कुणासाठी करावे लागत नाही. परंतू असे असले तरी देखील नाती जपण्याची, किंवा लोकसंग्रह वाढविण्याची गरज आहेच. आपल्या जनसंपर्काचा व्याप वाढविणे आवश्यकच आहे. म्हणूनच या अश्या वातावरणात सुपर स्वीट टुथची जास्त गरज आहे. तो सर्वांकडे आहे परंतू काही मंडळी त्याचा वापर करत नाहीत व त्यामुळेच त्यांच्या पदरी नाते संबंधात निराशा येऊ लागली आहे. आपले व्यक्तिमत्व हवेहवेसे वाटावे असे बनवायचे असेल तर या सुपर स्वीट टुथचा वापर अत्यावश्यक झालाय.
याचा वापर वाटतो तेवढा कठीण देखील नाही. परंतू आमचा तो गोड बोलण्याचा स्वभाव नाही, नुसते गोड बोलून काय होणार आहे किंवा नाते टिकण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची गरज असते गोड बोलून काही होत नाही अश्या उगाचच्या गोष्टी करणारेच हळूहळू एकटे पडतात. समाज बदलतोय, प्रत्येकाला स्वतःचे एक मत तयार होत आहे, त्याचा इगो (स्व या अर्थाने) देखील आहे व अश्या परीस्थितीत काही गोड शब्दांनी जर आपला लोकसंग्रह वाढत असेल आणि आपण कुणासाठी काहीतरी मनापासून करताना याचाही सोबत वापर केल्याने अपेक्षित पावती मिळत असेल तर मग या सुपर स्वीट टुथचा वापर करायला काय हरकत आहे. याची सवय नसणाऱ्यांना सुरुवातीला हा सारा प्रकार नाटकी वगैरे देखील वाटू शकतो. परंतू हळूहळू सवय झाली की प्रामाणिकपणेही गोड बोलता येते. प्रामाणिकपणे दिल्या गेलेली दाद ही रुक्ष शब्दांमधे किंवा शब्दाविनाच असावी असाही काही नियम नाही. म्हणजे आपल्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीने काहीतरी केल्यानंतर, किती करतोस तू माझ्यासाठी, असे शब्द तोंडातून न काढता मला हेच म्हणायचे होते हे समजून घे असे गृहीत धरण्यापेक्षा हे शब्द प्रयत्नपूर्वक तोंडातून काढून बघावे आणि मग आपल्यालाच फरक लक्षात येईल. स्पष्टवक्ता या शब्दाचा आधार घेऊन उगाच लोकांना दुखावण्यापेक्षा सुपर स्वीट टुथचा वापर करून समोरची व्यक्ती सुखावेल असे बोलणे जास्त उपयोगाचे आहे. अगदी काही गोष्टी पटल्या नाहीत किंवा चांगल्या नाहीत हे सांगताना सटकन शाब्दिक तलवार चालवून समोरच्याला घायाळ करण्यापेक्षा गोड बोलून जास्त जांगल्या प्रकारे परीस्थिती हाताळता येऊ शकते. ज्यांना याची सवय नाही त्यांना हे सुरुवातीला कृत्रीम वाटू शकेल परंतू हळू हळू तो सुपर स्वीट टुथ लोकांना आपल्याशी जोडायला मदत करेल व आपणही लोकांना हवेहवेसे वाटायला लागू. कारण कितीही प्रगती झाली किंवा सुविधा निर्माण झाल्या तरी देखील आपल्या सभोवताली व संपर्कात माणसे लागतात. त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्यांच्याविना जगण्यामधून येणारा एकटेपणा हे सध्याच्या काळातील नैराश्याचे फार मोठे कारण आहे. हे प्रमाण चिंताजनकपणे वाढत आहे.
म्हणूनच उर्मटपणे किंवा निष्काळजीपणे कुणालाही, मनाला येईल ते बोलून, दुखावण्याने येणाऱ्या एकटेपणापेक्षा या सुपर स्वीट टुथचा वापर करून लोकांना आपल्याशी जोडण्याने मिळणारा आनंद जास्त मोलाचा आहे, होय ना?
सर खूपच सुंदर लेख
ReplyDeleteसर,साधीशीच गोष्ट पण तुम्ही छान सांगितली, आज या स्वीट टूथ ची गरज सर्वांनी ओळखली पाहिजे माणसं जोडून ठेवायची असतील ती हवी👌👌🙏👍
ReplyDeleteअगदी बरोबर.... 👍👍
ReplyDeleteविषय पण छान निवडला आणि लेख तर नेहमीप्रमाणेच 👌👌
सध्या हेच समजून घेण्याची गरज आहे की सगळ्यांनाच ऐकमेकाची गरज असते पण आजकाल अहंपणा मुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होत आहे. सगळ्यांनी च जर समजून घेतले तर नक्कीच सुखी होतील. 👍🙏
"कौवा काको धन हारे ।कोयल का को दे।
ReplyDeleteमीठे वचन सुना कर। जग को अपना ले ।।"
अशा प्रकारचा सुंदर संदेश आपण प्रस्तुत लेखामधून दिलेला आहे .खूपच छान .
हार्दिक अभिनंदन .
प्रा. संजय पाटील वाशीम
"कौवा काको धन हारे ।कोयल काको दे ।।
ReplyDeleteमीठे वचन सुना कर ।जग को अपना ले ।।"
अशा प्रकारचा सुंदर संदेश प्रस्तुत लेखामधून आपण दिलेला आहे.
खूपच छान .
हार्दिक अभिनंदन !
प्रा. संजय पाटील वाशीम
खूप छान विचार. पण नाते टिकविणे आणि लोकसंग्रह वाढविणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. गोड बोलण्याने लोकसंग्रह नक्कीच वाढतो. परंतु नातेसंबंधात जवळच्या लोकांशी आपण सतत गोड बोलू शकत नाही. अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा गोड बोलणे शक्य नसते.तरीही एखादी चूक किंवा कमतरता गोड शब्दात सांगितली तर त्याचे वाईट वाटतेच. उलट ते बोलणे suger coated किंवा नाटकी वाटायला लागते. अशावेळी थोडे स्पष्ट बोलल्यास हरकत नसते. नाते जवळचे असल्यास तिथे असे स्पष्ट बोलणेही चांगलेच. एरव्ही तोंडात खडीसाखर ठेवायलाच हवी..
ReplyDeleteस्पष्ट बोलणे हे नकळत टोचून बोलणे होऊन जाते बरेच वेळा. त्यातला फरक ज्याला सांभाळता आला त्याला हरकत नाही. परंतू एरवी नाही तर खूप काही करुनही केवळ बोलण्याचा गोडवा नसल्याने स्वतः बद्दल मत खराब करून घेतलेले अनेक लोक आहेत.
Deleteवाणी का स्वर सुधारलो , बस हो गया भजन .....
ReplyDeleteअशी संतवानी आहे . आपल्या मुखातून जर असेच चांगले बोलणे निघत राहिले तर मग देव पूजा काहीच करावे लागत नाही
आज सर तुमचा लेख वाचतांना मला माझ्या बालपणीची आठवण झाली त्यावेळी रामायण लागायचे दूरदर्शनवर
राम त्यांच्या गुरूंना म्हणाले ,"पाप और पुण्य क्या है गुरुदेव " त्यावेळी रामाला त्यांच्या गुरूंनी पाप आणि पुण्य यामधील अंतर समजावून संगितले.
आपल्या वागण्या बोलण्यामूळे जर कुण्याच्या ओठावर हसू आले तर ते पुण्य
आणि कुणाच्या डोळयांत अश्रू आले तर ते पाप
मग त्या करिता उपवास ,पूजा, कर्मकांड करण्याची काहीच गरज नाही . तो एक संस्कार म्हणून जपावा अंधश्रद्धा म्हणून नव्हे.
खूप छान विषय मांडला सर
Thank you sir
अतिशय योग्य विचार!
ReplyDeleteलेखाची सुरूवात दमदार असली की वाचक म्हणुन आपले चित्त एकाग्र आपसूकच होते. त्यावर ह्या लेखाची सुरुवात चविष्ट गोडव्याने झाली आहे, त्यामुळे पहिला भाग वाचतांना आपल्या आवडत्या sweet dishes डोळ्यासमोर तरळून गेल्यास ते श्रेय लेखकाचेच असेल.
ReplyDeleteगोड बोलणे, दुसर्या व्यक्तीची योग्य ठिकाणी गोड शब्दात प्रशंसा करणे आणि योग्य वेळी शाब्दिक तलवार न चालवता गोडव्याने समजवून सांगणे, आपल्याला जमत नाही (ego) म्हणून दुसर्याच्या गोड बोलण्याला गोडबोले म्हणण्याचा प्रघात हे सर्व मुद्दे लेखकाने फार संयतपणे पद्धतीने मांडले आहेत. 'super sweet tooth' हे out of the box नामकरण perfectly fit असेच वाटते.
वाचताना कबीरांचा दोहा सहजपणे मनात आला..
ऐसी वाणी बोलिए
मन का आपा खोये |
औरन को शीतल करे,
आपहुं शीतल होए ||
शेवटच्या भागात डोळे खडखडीत उघडतील असे दाखले देऊन लेखक आपल्या विचारांना चालना देऊन जातो. हा 'super sweet tooth' (विचार) सगळ्यांनी नक्कीच taste (आचरण)करावा असाच आहे.
आपले निरिक्षण आणि विषय मांडण्याची हातोटी विलक्षण आहे. खूप छान..!!
ReplyDelete