थोडा है थोडे की जरुरत है @ 20.07.21
रीक्राफ्टींग-२
जपानचा तो मुलगा रीक्राफ्टींग च्या जादूबद्दल सांगू लागला आणि आमच्यापैकी प्रत्येकाला त्याच्या संकल्पनेबद्दल कौतुक तर वाटलेच परंतू आपल्या कामाकडे या दृष्टीकोनातून बघण्याची एक नवी दिशा प्राप्त झाली. तो म्हणाला, सबंध जगामधे कामाच्या त्याच त्या पद्धतीमुळे आणि प्रक्रीयांमधील जटीलतेमुळे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात काकांनी सांगितल्याप्रमाणे नैराश्य आलेच. या अश्या मानसिक स्थितीपासून कोणताच देश सुटला नाही. त्यानंतर प्रत्येकच देशात मानव संसाधन विभागातर्फे याबाबत संशोधन करण्यात आले व त्यामधे जपान या देशाने बाजी मारली. काकांना आला त्याप्रकारचा कंटाळा येऊ नये म्हणून त्यांनी एक अत्यंत सुंदर योजना तयार केली व त्या योजनेची माहिती देण्याकरीता तसेच तिला स्विकार्य बनविण्याकरीता त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर वर्कशॉप आणि सेमीनार्स आयोजित केले. याकरीता त्यांनी प्रभावशाली व्यक्तींना पाचारण केले. देशकार्य असल्याने त्यांनी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य केले व हळू हळू बदल होऊ लागला. संकल्पना अशी होती की माझ्या कामाची संपुर्ण कक्षाच मला थोड्या थोड्या दिवसांनी रीक्राफ्ट करता यायला हवी. कामाची कक्षा म्हणजे माझ्या कामाच्या जागेपासून ते माझ्या कामाच्या स्वरुपापर्यंत सारे काही मला रीक्राफ्ट करता आले पाहीजे.
यामागची मूळ संकल्पना अशी होती की, मानवी स्वभावाचा अभ्यास जर केला तर त्याच त्या वातावरणात किंवा एकाच परीस्थितीमधे त्याला ठेवले तर तो त्या परीस्थीतीला आपला कम्फर्ट झोन समजू लागतो. नंतर त्या कम्फर्ट झोनमधे स्वतःला सुरक्षित समजायला लागतो. त्यानंतर तो त्या कम्फर्ट झोनलाच आपले विश्व समजायला लागतो आणि मग आपल्या सर्व क्षमता त्या कम्फर्ट झोनच्या दृष्टीने आखल्या की त्याच्या पलीकडे आपल्या क्षमताच नाहीत असा त्याच्या मनाचा पक्का समज होतो. एकदा त्याच्या मनाने त्या परीस्थितीच्या अनुषंगाने आपल्या क्षमतांच्या मर्यादा आखल्या की त्यानंतर मग त्याला दुसऱ्या कोणत्याही परीस्थीतीमधे जाणे आवडत नाही किंवा तो अस्वस्थ होतो. त्यामुळे नव्या वर्तुळात जाऊन तेथे परत नव्याने नवे काम करण्याची त्याची इच्छाच होत नाही. पण यापेक्षाही वाईट प्रकार असा होतो की त्याला त्याचा कम्फर्ट झोन कसाही असला तरी आवडायला लागतो. तेथे असलेल्या व्यवस्थांमधे तो रमलेला असतो. ते कसेही असले तरी त्याला ते आवडायला लागते. परंतू खरी समस्या नंतर निर्माण होते. मूलभूत मानवी प्रवृत्ती नव्याच्या शोधात जाण्याची असते, नव नविन बाबींमधे रमण्याची असते. परंतू या आपल्या कम्फर्ट झोन वाल्या व्यक्तीची यामुळेच गोची होते. सुरक्षित आणि अंगवळणी पडलेल्या व्यवस्थेतून बाहेर निघण्याची क्षमता त्याने गमावली असते व काही दिवसांनी मानवी प्रवृत्तीनुसार त्याला त्याच्या कम्फर्ट झोनचा देखील कंटाळा येऊ लागतो व मग त्याची काकांसारखी अवस्था व्हायला लागते. कोणत्याही प्रकारचा बदल त्याला हवा असतो परंतू तो बदल करण्याकरीता त्याचे मन धजावत नाही. मुळात याच मानसिक स्थितीचा अभ्यास जपानमधील संशोधकांनी केला व त्यामधूनच ही रीक्राफ्टींगची संकल्पना पुढे आली. आपल्याही देशात ती आली परंतू ती सर्वसामान्य जनतेच्या मनात रुजली नाही व त्यामुळे अजूनही काकांसारखे लोक निवृत्ती म्हणजे एक मोठी सुटका किंवा ताणमुक्ती असे समजतात. अर्थात जपान या देशाचे अर्थशास्त्र, लोकसंख्या इत्यादीचा विचार करता आपल्या देशात हे सारे राबविणे त्या मानाने कठीण आहे परंतू आता या आधुनिक काळात तो प्रयत्न करायला हवा. कारण इतिहास बघितला तर जपान देश देखील दुसऱ्या महायुद्धामधे बेचीराख होऊ फिनिक्स पक्षागत उंच भरारी घेऊन सामर्थ्यवान बनलेला आहे. या सर्व प्रक्रियेमधे त्यांच्या या रीक्राफ्टींग संकल्पनेचा सहभाग फार मोठा आहे कारण यामुळे त्यांनी त्यांच्या देशातील प्रत्येक माणसाची कार्यशक्ती फार मोठ्या प्रमाणात वाढविली. हे सारे एक दोन वर्षात झाले असेही नाही. त्यांनी प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या स्तरांवर मेहनत करुन ही संस्कृती रूजविली ज्याचा परीणाम आज जपान देश हा जगातील बलाढ्य, अत्यंत प्रगतीशील व श्रीमंत देश म्हणून गणला जातो.
रीक्राफ्टींग ॲट एव्हरी स्टेप ही ती संकल्पना. त्यांनी या संदर्भात किती बारकाईने विचार केला हे बघून आश्चर्य वाटते. कोणत्याही कर्मचाऱ्याला तीन वर्षांच्या वर त्याच्या कामाच्या जागी पुढे ते ठेवत नाहीत. त्याच्या कामाचे स्वरुप बदलले जाते किंवा त्याला नव्या जबाबदाऱ्या दिल्या जातात. हे प्रत्येकाला स्विकारावेच लागते. हे तेथील राष्ट्रीय धोरण आहे. नवी जबाबादारी टाळण्याकरीता वशीला चालत नाही. त्यानंतर कामाच्या ठिकाणी दरवर्षी फर्नीचर बदलले जाते. खुर्च्यांचे रंग बदलले जातात, भिंतींचे पेंटीग पेपर बदलले जातात, कामाच्या ठिकाणी ठेवलेल्या झाडांच्या कुंड्या बदलल्या जातात, ते सारे एका विभागातून दुसऱ्या विभागात नेले जाते व हा सारा बदल करणाऱ्या स्वतंत्र व्यवस्था आहेत. काही काही कालांतराने कर्मचाऱ्याला आपलाच विभाग नवा वाटावा या करीता जे जे काही करावे लागते ते सारे तेथे केले जाते. शिवाय प्रत्येकाच्या मनामधे एक गोष्ट त्यांनी पक्की बसविली आहे की माझ्या आजचा दिवस हा कालच्या पेक्षा सुंदर बनविण्याकरीता मला माझा दिवस रीक्राफ्ट करायचा आहे. ही सवय लागली असल्याने प्रत्येक व्यक्तीला नवे काय करावे याबाबत ठरवावे लागते आणि त्यामुळे मुळातच माझा दिवस छान होणार आहे याकरीता त्याचे मन तयार रहाते. मग तो टेबलवर एखादा नवा फ्लॉवर पॉट ठेवणार किंवा आपल्या जुन्या फाईल बदलून त्यातील कागद नव्या फाईलमधे टाकणार, किंवा फाईलवरचे कसेतरी लिहीलेले नाव छान टाईप करुन तो कागद त्यावर चिटकवणार. एकंदरीत तो आपल्या कामाची जागा, काम करण्याची पद्धत हे सारेच रोज काहीतरी नवे अनुसरून करणार. या सर्व गोष्टी ऐकायला रंजक किंवा जराश्या बिनऊपयोगाच्या तुम्हालाही वाटत असतील परंतू जपानमधे या गोष्टीवर जे संशोधन झाले त्यावरून असे निदर्शनास आले की या सर्व छोट्या छोट्या गोष्टीमुळे कर्मचारी आनंदी राहू लागले, त्यांच्यावरचा ताण हळू हळू कमी झाला व सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढली. सर्वांनी एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारण्यापर्यंत कामाचा मोकळेपणा निर्माण झाला. तो मुलगा म्हणाला माझा बॉस जर माझ्या डेस्कवर माझ्या कामाचे निरीक्षण करायला आला तर मला त्याला खूर्ची वगैरे द्यावी लागत नाही. तो पटकन टोंगळ्यावर बाजूने बसतो व संगणकामधे माझे काम बघतो. आपल्या देशात ही गोष्ट व्हायला अजून फार वेळ असला तरी देखील आपण आपल्या दिवसाच्या रीक्राफ्टींगची सुरुवात करू शकतो. काही खाजगी क्षेत्रांमधे आपल्याकडे हे सुरु झाले आहे. कार्यालयाच्या रचना बदलल्या, स्वरुप बदलले, फाईलींचे गठ्ठे कमी झाले, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून जुन्या कंटाळवाण्या गोष्टी व प्रक्रीया वेगवान आणि सुंदर बनविण्यात आल्या. हे सारे आता सार्वजनिक क्षेत्रात देखील करण्याची गरज आहे. यासाठी एक धोरण आखून सर्वात पहिले मानसिकता बदलावी लागणार आहे. अन्यथा काकांना आला तसा कंटाळा परंतू त्याहून भयानक ताण दिवसेंदिवस वाढत जाईल. त्यामधून निर्माण होणाऱ्या समस्या आपण सहन करु शकणार नाही.
रीक्राफ्टींग ही मानवी मनाची गरज आहे मग ती कार्यालयात असो अथवा घरी. ती खरे तर एक चांगली सवय आहे. आपल्या रोजच्या जीवनात फार भव्य दिव्य होत नसते. परंतू रोजच्या जीवनाला छोट्या छोट्या रीक्राफ्टींगच्या प्रक्रीयांनी सुंदर बनविता येते. यामुळे आपण आपल्याच जिवनाकडे तक्रारीच्या सुरात न बघता आनंदाने बघू शकतो. असे झाले तर मग काकांसारखा कर्मचारी दिवसभराचे काम आटोपल्यावर, चला आजचा दिवस ढकलला बुवा एकदाचा असा विचार न करता, आपल्या सहकाऱ्याला आनंदाने हसून गुडबाय करताना म्हणेल, कल फिर मिलेंगे दोस्त और कुछ नया करेंगे. हा एवढा बदल देखील आपला प्रत्येक दिवस सत्कारणी ठरविण्यासाठी कारणीभूत राहील. या करीता कार्यालय व्यवस्थापन मंडळ व कर्मचारी या दोन्हीही पातळ्यांवर बदलाची गरज आहे.
आम्ही सारे शांतपणे हे ऐकत होतो. हे सारे पटले नाही असे तेथे कुणीही नव्हते. मन असलेल्या प्रत्येकच माणसाला हे पटणारे आहे. हे सारे वाटताना, जपानमधे ठिक आहे आपल्याकडे असे होऊ शकत नाही असा विचार ज्यांच्या मनात आला असेल त्याला इलाज नाही. परंतू आपण निदान अशी सुरुवात करु शकतो असा विचार मनात आलेल्यांनी रीक्राफ्टींग सुरु करायला हरकत नाही, होय ना?
Excellent concept.
ReplyDeleteवा अवि खूप सुंदर कल्पना , विचार व मांडणी
ReplyDeleteNice article sir. It definitely helps to change the attitude to overcome monotony in life.
ReplyDeleteखरोखरच बदल हा नवी उभारी देतो. मग तो ऑफिस मधल्या कामातला असो किवा घरकाम करणाऱ्या गृहिणीच्या कामातला असो. रिक्राफ्टींग ही संकल्पना रिफ्रेश करते. खूप छान .
ReplyDeleteअतिशय गरजेची अशी हि संकल्पना. या pandamic मध्ये घरात बसून मानसिक दुखणे ,आजार यांपासून स्वतः ला वाचवविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ने अवलंब करावा. असे वाटतयं.
ReplyDeleteसर , खरोखरच तुम्ही मांडलेला विषय सगळ्यांच्या जीवनाशी निगळीत आहे दररोज प्रत्येक व्यक्ती कुठलं तरी कर्म करीत असतो पण ते फक्त करायचं आहे म्हणून न करता दरोरोज त्याला नवीन रूप मिळाले तर कामाचा उत्साह वाढतो
ReplyDeleteएक प्राध्यापक म्हणून काम करत असताना आपल्याकडे दरवर्षी अभ्यासक्रम सारखाच असतो पण शिकवण्याची मेथड बदलवल्यास नक्की नावीन्यता येईल आणि कामाचा आनंद ही घेता येईल
धन्यवाद सर
Figured out very important technique of recrafting. Everyone must think out of the box and should not hesitate to apply innovative and different approaches in performing chores. Excellent article indeed.
ReplyDeleteक्रमशः असणाऱ्या लेखाची वेगळीच गंमत असते. कधी तो विस्मृतीत जातो तर कधी उत्सुकता जागवून जातो. ह्या लेखाबद्दल बोलायचे झाले तर लेखक पाहिल्या भागात पुढल्या भागाची हलकीशी कल्पना देतो आणि पुढे काय होणार ह्याची उत्सुकताही कायम ठेवण्यात यशस्वी होतो.
ReplyDeleteपाहिल्या भागातील काकांच्या character बद्दल आपल्याला सहमती / आपुलकी निर्माण होते कारण आपल्या आजूबाजूला सर्वसाधारणपणे अशीच परिस्थिती असते. त्या मानसिकतेमधे आपण स्थिरावत असतांनाच लेखक वाचकांसमोर एक तरूण, तडफदार, जपानी मानसिकतेचा मंत्र देणार charecter introduce करतो.
ह्या तरुण मुलाचे विचार वाचतांना.. ह्या quote ची प्रचीती येते.
A SINGLE CONVERSATION WITH A WISE MAN IS BETTER THAN YEARS OF STUDY..
पाहिल्या भागात मरगळलेल्या वागणुकीचे आपण आणि दुसरा भाग वाचुन positive enegy ने भारलेले आपण हा फरक आपल्यालाच जाणवायला ला लागतो.
रीक्राफ्टींग ह्या संकल्पनेवरचे लेखन म्हणजे मूर्तिमंत positivity चा खळखळ वाहणारा झरा असेच वाटते.
जपानी कार्यपद्धतीत असलेल्या छोट्या छोट्या आणि अत्यंत positive ऊर्जा देणार्या तंत्राच्या वर्णनाचा प्रत्येक शब्द आवर्जुन वाचावा असाच आहे.
लेखकानी लिहिलय त्याप्रमाणे आपल्याकडेही असे बदल होत आहेत, खास करुन Millennials आणि Gen Z ह्या Generation मधे! त्यामुळे आपल्याही देशातील चित्र नक्कीच बदलेल आणि ते बदलावे असे मनापासून वाटते.
Excellent 👌 thank u sir
ReplyDeleteExcellent Sir.
ReplyDeleteरीक्राफ्टींग कल्पना रिफ्रेश करते !
ReplyDeleteरीक्राफटिग ची गरज साधारणता
ReplyDeleteउतार वयात भासते।