थोडा है थोडे की जरुरत है @ 13.07.21
रीक्राफ्टींग
सुटलो बुवा एकदाचा! निवृत्तीच्या एक दिवस आधी काकांची उत्स्फुर्त प्रतिक्रीया होती. उद्या एकदाचा निरोप समारंभ झाला की डोक्यामागचे टेन्शन गेले. गेले वर्षभर एक एक दिवस मोजत होतो मी. हे शेवटचे दोन तीन वर्षे मी कसे काढले हे माझे मला ठाऊक. या सर्व परीस्थीतीमधे सगळे आजार लागले मला. म्हणूनच माझ्या पेन्शन केसचे काम मी आधीच करून घेतलेय. पेन्शन मंजूर देखील झाली. आता उद्यानंतर त्या ऑफीसचे तोंडही बघायला नको. नको ती खिडकीवरची गर्दी, नको ते वेगवेगळे प्रश्न, ताप नुसता डोक्याला. शिवाय डोक्यावर साहेब बसलेलाच. मशीनसारखे काम करायला लावणारा. आता मात्र सुटका रे बाबा. मला एवढे मोकळे वाटतेय की काय सांगू? आम्ही सारे हे ऐकत होतो. काकांचा एकूण स्वभाव आणि आपल्या वेगवेगळ्या कार्यालयांमधील कामाची पद्धत ठाऊक असल्याने आमच्यापैकी कुणालाही त्यांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटत नव्हते. परंतू जपानमधे नोकरीला असलेला काकांचा भाचा मात्र हे सारे ऐकून चकीत झाला. त्याने हे सारे ऐकले व शेवटी तो म्हणाला, काका तुमचे एकंदर ऐकल्यानंतर मला तर असे वाटते की पगार मिळविल्याखेरीज तुम्ही गेली ३५ वर्षे काहीही केले नाही. त्याचे हे वाक्य म्हणजे त्या बैठकीतला बॉम्बगोळा आहे हे मला लक्षात आले. मी जरा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला परंतू एव्हाना बॉम्ब पडला होता. काका एकदम त्याच्यावर उसळून म्हणाले, काहीतरी वेड्यासारखे बोलतो. काहीच केले नाही म्हणजे काय? गेली पस्तीस वर्षे मी त्या ऑफीसमधे काय गोट्या खेळल्या असे म्हणायचेय तुला? अरे केवळ अर्ध्या तासाचा लंच अवर सोडला तर सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मी मान मोडून काम केलेय. तुला काय कळतंय रे आमच्या कामांबाबात? येथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात रोज. त्यांचे अनेक विचित्र प्रश्न असतात. त्यांच्या त्या समस्या ऐकून त्याचे निराकरण करणे म्हणजे गंमत वाटली काय तुला? शिवाय दर सहा महिन्यांनी साहेब बदलणार, त्यांच्याही वेगवेगळ्या तऱ्हा. त्या सांभाळत, त्याच्याशी स्वतःला ॲडजेस्ट करत काम करणे किती कठीण आहे हे तुम्हा परदेशात राहणाऱ्यांना काय कळणार? शिवाय आमच्या येथे कार्यालयांमधे राजकारण किती आहे याचा अंदाज आहे का? तुम्ही काहीही करायचे म्हणल्यावर पाय ओढणारे तयार असतात. एवढे सोपे नाहीये. तुमच्या जपानसारखे इथे नाही. तुम्हाला काय एसी मधे बसून कॉम्प्युटर चालवावा लागतो व तुमची जास्तीत जास्त कामे कॉम्प्युटरच करतो. इथे तो कॉम्प्युटर आला तरी कागदे आमच्या पाचवीला पुजली आहेत आणि आम्हालाही तेच योग्य वाटते. त्या कॉम्प्युटरचे काही खरे आहे का? सारेच गायब होऊ शकते त्याच्यातून. आम्हाला कागदाला कागद लावावा सागतो. मग किती त्रास होतो. आमच्याकडे आणखी एक प्रकार आहे ज्याला आम्ही फाईल किंवा नस्ती म्हणतो. ती कागदी फाईल चालवावी लागते. कधी ती वेगात चालते तर कधी तिला पायच नसल्यागत पडून राहते. त्यात कागदे जोडले जातात आणि कधी कधी आपल्या अंतीम टप्प्यापर्यंत पोहोचता पोहोचता ती फाईल एवढी वजनी होते की तिला चालविणे देखील कठीण होऊन जाते. तुला हे सारे माहीत नाही म्हणून मी काहीच केले नाही असे म्हणतोय. त्या भाच्याचे ते वाक्य काकांच्या जिव्हारी लागले होते त्यामुळे काकांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. परंतू तो पोरगा शांत होता. काकांच्या बोलण्याचा अजिबात राग न मानता, परंतू अत्यंत ठामपणे त्याने आपले मत काकांना ऐकविले. परंतू यावेळी मात्र त्याच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि मुद्दा दोन्हीही अत्यंत प्रभावी असल्याने त्याने जे सांगितले त्याबद्दल काकांसकट आम्ही सगळेच विचार करु लागलो. तो जे काही बोलला ते दुसऱ्या दिवशी निवृत्त होणाऱ्या काकांकरीताच नाही तर माझ्यासकट त्या बैठकीत बसलेल्या व नोकरी करणाऱ्या किंवा कोणतेही काम करणाऱ्या प्रत्येकाला लागू पडेल असे होते. काकांना त्याने थेट प्रश्न विचारला, काका, उद्या तुम्ही निवृत्त होत आहात आणि निवृत्तीच्या दिवशी तुमच्याकडे गेली पस्तीस वर्षे केलेल्या कामाबद्दल चांगले म्हणून सांगायला काहीच नाही याचा विचार केलात का? गेल्या पस्तीस वर्षांच्या कामाचा तुम्ही केवळ एक ओझे म्हणून उल्लेख करताय आणि म्हणून तुम्हाला उद्या सुटल्यासारखे वाटतेय. आताही मला रागवताना तुम्ही केवळ तुमचे काम किती कठीण, त्रासदायक आणि कंटाळवाणे होते हेच सांगितले. तुमच्या कामासंबंधी एकही चांगली, साकारात्मक किंवा आनंद देणारी गोष्ट तुम्ही सांगितली नाहीत. मग मी जे म्हणालो की तुम्ही पस्तीस वर्षे काहीच केले नाही केवळ ओझे वाहीले तर काही चुकले का? तुम्ही शांतपणे विचार करा व मग मला सांगा. जर मी चुकत असेन तर मी आपली क्षमा मागतो. परंतू आपल्या निवृत्तीच्या निमीत्ताने मी ज्या भावना मनात घेऊन आलो व आपल्याकडून पस्तीस वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केल्यानंतर जी प्रतिक्रीया मला अपेक्षित होती त्यापेक्षा तुम्ही फारच वेगळे बोललात म्हणून मला बोलावे वाटले. माझे चुकले असेल तर मला माफ करा. त्याचे हे बोलणे ऐकल्यावर आम्ही काकांसकट आम्ही सर्वच खरोखरीच विचारात पडलो. खोलीत शांतता पसरली होती. आमच्यापैकी प्रत्येकाने स्वतःच्या कामाचा विचार सुरु केला व निवृत्तीला आपण देखील काकांप्रमाणेच उद्गार काढू का? असे प्रत्येकालाच वाटून गेले. आम्हा सर्वांना विचारात पडलेले बघून तो पुढे म्हणाला, मला माहीत आहे, तुम्ही सर्वजण कसला विचार करताय ते. मी देखील याच आपल्या देशात जन्मलेलो आहे व इथेच शिक्षण झाले त्यामुळे मला सारे काही माहीत आहे. जी स्थिती तुम्ही अनुभवताय ती जगातल्या सर्वच देशांनी कधी ना कधी अनुभवली आहे. कार्यालयांच्या कामांबाबत तुम्ही ज्या सर्व गोष्टी सांगताय त्या सुरुवातीला सर्वच ठिकाणी होत्या. पण या अश्या परीस्थीती बदलण्यासंदर्भात जो सार्वत्रिक विचार अन्य देशांनी आणि विशेषतः जपान देशाने जो केला तो अनेक देशांनी अजूनही केला नाही. मला आनंद आहे की आपल्या देशात काही प्रमाणात याबाबत आता सुधारणा होते आहे परंतू तो वेग फारच कमी आहे आणि म्हणूनच तुमच्या तोंडून तुमच्या निवृत्तीच्या दिवशी, सुटलो बुवा एकदाचा असे उद्गार निघत आहेत. जगभरात सर्वदूर असलेल्या या समस्येवर सर्वात लवकर मार्ग कुणी काढला असेल तर तो आहे जपान देश कारण त्यांनी एका शब्दाचे महत्व ओळखून त्याचा प्रत्यक्ष वापर आपल्या कामकाजामधे केला. तो शब्द म्हणजे रीक्राफ्टींग. हा शब्द नाही तर ही जादू आहे आणि या जादुमुळे तुम्हाला आपल्या कामाबद्दल आले तसे नैराश्य आणि नकारात्मकता कधीच येत नाही. उलट निवृत्त होणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात कर्तव्यपूर्तीच्या समाधानाचे आनंदाश्रू असतात. याला कारणीभूत आहे एकच गोष्ट, रीक्राफ्टींग.
सबंध बैठकीचा या पोराने आता ताबा घेतला होता. काकांच्या निवृत्तीच्या पूर्वसंध्येवर काहीतरी फारच वेगळे आणि थेट मनाला भिडणारं असे तो मुलगा सांगत होता. रीक्राफ्टींग या जादूबद्दल तो सांगू लागला व त्याचे ते ऐकल्यावर तेथे बसलेल्या प्रत्येकाला केवळ कार्यालयातीलच नाही तर आयुष्यातील कोणत्याही कामाकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाल्यागत वाटले. (क्रमशः)
खूप सुंदर व अंतर्मुख करणारा लेख
ReplyDeleteNice! Waiting for next episode.
ReplyDeleteपुढच्या भागाची आतुरतेने वाट बघते आहे.....
ReplyDeleteसुंदर!पुढचा भाग वाचण्याची उत्कंठा वाढली आहे
ReplyDeleteआता तो जपानचा मुलगा सगळ्यांना काय सांगतो याची उत्सुकता
ReplyDeleteTrue sir... especially now when all of need not only to learn new skills, but also unlearn old ways... our positive response or negative reaction to updating ourselves decides our behaviour in the fast changing ways of the workplace.
ReplyDeleteWaiting for the next part.
खुप सुंदर आर्टिकल सर.🙏🏻
ReplyDeleteखुप सुंदर आर्टिकल सर.
ReplyDeleteDr. Rohini Deshmukh
खूप सुंदर दृष्टिकोन... खरंच आपण आपल्या कामावर किती प्रेम करत असतो... Rather आजवर आपण ते प्रामाणिकपणे करत आलेलो असतो. अंतर्मुख करणारा भाव याठिकाणी वाचायला मिळतो.
ReplyDeleteक्रमशः असणाऱ्या लेखाची वेगळीच गंमत असते. कधी तो विस्मृतीत जातो तर कधी उत्सुकता जागवून जातो. ह्या लेखाबद्दल बोलायचे झाले तर लेखक पाहिल्या भागात पुढल्या भागाची हलकीशी कल्पना देतो आणि पुढे काय होणार ह्याची उत्सुकताही कायम ठेवण्यात यशस्वी होतो.
ReplyDeleteपाहिल्या भागातील काकांच्या character बद्दल आपल्याला सहमती / आपुलकी निर्माण होते कारण आपल्या आजूबाजूला सर्वसाधारणपणे अशीच परिस्थिती असते. त्या मानसिकतेमधे आपण स्थिरावत असतांनाच लेखक वाचकांसमोर एक तरूण, तडफदार, जपानी मानसिकतेचा मंत्र देणार charecter introduce करतो.
ह्या तरुण मुलाचे विचार वाचतांना.. ह्या quote ची प्रचीती येते.
A SINGLE CONVERSATION WITH A WISE MAN IS BETTER THAN YEARS OF STUDY..
पाहिल्या भागात मरगळलेल्या वागणुकीचे आपण आणि दुसरा भाग वाचुन positive enegy ने भारलेले आपण हा फरक आपल्यालाच जाणवायला ला लागतो.
रीक्राफ्टींग ह्या संकल्पनेवरचे लेखन म्हणजे मूर्तिमंत positivity चा खळखळ वाहणारा झरा असेच वाटते.
जपानी कार्यपद्धतीत असलेल्या छोट्या छोट्या आणि अत्यंत positive ऊर्जा देणार्या तंत्राच्या वर्णनाचा प्रत्येक शब्द आवर्जुन वाचावा असाच आहे.
लेखकानी लिहिलय त्याप्रमाणे आपल्याकडेही असे बदल होत आहेत, खास करुन Millennials आणि Gen Z ह्या Generation मधे! त्यामुळे आपल्याही देशातील चित्र नक्कीच बदलेल आणि ते बदलावे असे मनापासून वाटते.