थोडा है थोडे की जरुरत है @ 10.09.23
श्री गणेशा … वेगवेगळ्या वर्गांमधे अचानक भेट देऊन तरुण विद्यार्थ्यांशी बोलणे ही माझी जुनी सवय आहे . त्यांना काही सांगण्यापेक्षा त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे याचा अंदाज घेणे हा या असल्या भेटींमागचा माझा हेतू असतो . माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होतात व मी त्यांच्याशी छान मैत्री प्रस्थापित केली असल्याने मोकळेपणाने बोलतात . आपल्याला महाविद्यालयात काय नवीन करता येईल याचे सर्वात चांगले इनपुट मला या असल्या भेटींमधेच मिळते . मी ते माझ्या सहकाऱ्यांशी शेअर करतो व त्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही सारे मिळून कार्यक्रमांची व उपक्रमांची आखणी करतो . परंतू आम्ही महाविद्यालयात चालवित असलेल्या शिक्षण प्रणालीवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक प्रश्न मला एका विद्यार्थिनीने विचारला . तो प्रश्न मला एवढा अस्वस्थ करून गेला की अनेक वर्षांपासून चालत आलेली ही संपुर्ण शिक्षण प्रणाली आमुलाग्र बदलणारे नवे शैक्षणिक धोरण का आवश्यक आहे हे मला मनोम...