थोडा है थोडे की जरुरत है @07.09.21
फक्त मी…क्षण!!
त्या परीसरातले ते शेवटचे गाव. त्याच्या पुढे काहीच नाही. पुढे फक्त जंगल, दऱ्या नि डोंगर. त्या गावाला पोहोचताना गाडीने शेवटचा टर्न घेतला आणि आमच्या समुहातील प्रत्येकाच्या मोबाईल ची रेंज गेली. ज्या जगातून आम्ही सारे आलो होतो, जेथे अनेक लोक ओळखीचे होते, जेथे काम करत होतो, दिवसभर कष्ट करून वेगवेगळ्या व्यवस्थांमधे गुंतलो होतो, जेथे वेगवेगळे कार्यक्रम होत होते, वेगवेगळ्या सभांमधे विविध विषयांवर चर्चा होत होत्या, हे सारे करताना वेगवेगळे लोक सोबत होते, वेगवेगळ्या कामांकरीता भेटायला येत होते, आपल्या कामाचे मुल्यमापन करणारे होते, आपल्या कामाची प्रशंसा करणारे होते, टिका करणारे होते, कुणी सोबत होते, कुणी सोबत असून सोबत नव्हते, कुणी सोबत आहोत असे दाखवत होते, वेगवेगळ्या प्रकारची कामे होती, मेसेजेस होते, त्यामधे वेगवेगळे विचार होते, परीपत्रके होती, त्याचे वेगवेगळे अर्थ होते, अनेक फॉरवर्ड केलेले संदेश होते, न वाचता ते पुढे फॉरवर्ड देखील केले होते, कामाच्या स्वरुपामधे आनंद होता, परंतू सोबतच कधी निराशा होती, कधी स्पर्धेची झळ होती, कधी मैत्रीची साथ होती, कधी सांत्वना होती तर कधी अलिप्तता देखील होती. हे सारे काही त्या फोनवरील रेंज जाण्याने मागे पडले. आधुनिक काळासोबत जास्तच जटील होत चाललेल्या जगापासून आमचा संपर्क संपुर्णपणे तुटला होता. त्या क्षणापासून ते पुन्हा त्याच ठिकाणी सायंकाळी परत येईस्तोवर त्या जगात काहीही झाले तरी काहीच कळणार नव्हते. शेवटच्या गावात आम्ही पोहोचलो व पुढे चालणे सुरु केले त्यानंतर आम्ही केवळ पंधरा जण उरलो. गावाची वेस ओलांडेस्तोवर व गावापासून वाहणारी नदी ओलांडून पुढे जाईस्तोवर गावातील काही मंडळी होती. परंतू नंतर जेव्हा प्रत्यक्ष जंगलात प्रवेश केला तेव्हा त्या विशाल निसर्गाच्या कुशीत आम्ही केवळ पंधरा लोक होतो. चालता चालता एका डोंगरावर चढू लागलो आणि बघतो तर काय..
जे रोजचे जीवन सोडून आम्ही काही जण, काही तासांकरीता त्या निसर्गाच्या कुशीत रमण्याकरीता आलो होतो, ज्या जगात कानावर कर्कश हॉर्न्स पडत होते, तोंडाला मुसक्या बांधलेले सारे लोक होते, वादावादी होती, आरडाओरड होती, गाड्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरांचे लोट होते, ते सारे मागे सोडून आम्ही पुढे बघितले तर समोरच्या दरीमधून शुभ्र पांढऱ्या रंगांचे धुके वर येत होते. खोल दरीमधे जणूकाही धुके तयार होऊन वरच्या दिशेला येत होते. हळू हळू वर येणाऱ्या धुक्याने आमच्या सकट सर्वांना व्यापून टाकले. समोरच्या दरीमधे कोसळणारे सुरेख धबधबे आता दिसेनासे झाले. त्या धुक्याच्या तरलतेसोबत मनाला निखळ शांतता लाभत होती. जणूकाही रोजच्या जीवनातील वेगवेगळ्या व्यस्ततांमुळे स्वाभाविकपणे निर्माण होणारा ताण हळू हळू कमी होतोय असेच त्या क्षणी वाटून गेले. आतापर्यंत धमाल गप्पा करत व हसत हसत जाणारे आम्ही सारे आता मात्र जरा शांत झालो. त्या निसर्गाच्या सुरेल रुपाचा मनापासून आनंद घेऊ लागलो. दोन डोंगर पार करून गेल्यावर आम्ही अश्या एका टापूवर पोहोचलो जेथून सर्वबाजूने खोल दरी होती व त्याच्या मधे हा टापू होता. डाव्या बाजूने खोल दरीत कोसळणाऱ्या धबधब्याच्या पायथ्याशी जायचे ठरले. ते देखील दिव्यच होते.
बऱ्यापैकी सरळसोट असलेल्या दरीत खाली उतरणे म्हणजे जरा कठीणच होते. त्याच माती कोरडी असल्याने गुळगुळीत गोट्यांवरून पाय घसरत होते. एकमेकांचा आधार घेत, एकमेकांच्या आधारे स्वतःला वाचवत वाचवत कसेबसे आम्ही सारे खाली उतरलो. परंतू खाली उतरल्यावर सर्वांनी एकत्रितपणे वाह असेच म्हणले. त्या दरीच्या कुशीत खूप उंचावरुन कोसळणारा तो धबधबा बघितल्यावर आणि त्याच्या उडणाऱ्या तुषारांनी चिंब भिजल्यावर मनाच्या खोल तळापर्यंत निरागस आनंद झिरपत गेला. तेथे प्रत्येकजण शांत होता. तेथे केवळ आम्ही पंधराच जण होतो. आणि सोबतीला त्या खोल दरीच्या कुशीमधे वसलेले ते निसर्गाचे सर्वोत्तम रूप. थोडावेळ तेथे रमल्यावर, काळजी घेणाऱ्या मित्र मंडळींच्या कल्पकतेमुळे तेथे गरमागरम लेमन टी घेतल्यावर आम्ही परत वर चढायला लागलो. आता परीस्थिती वेगळी होती. आता पाऊस येऊन गेल्यामुळे माती ओली होती परंतू आता शुज घसरणे सुरु झाले, पडझड सुरु झाली, मग काही जण दोन पायावर, तर काही चार पायावर तर काही सरपटत वर चढू लागले. सगळी धमाल. जवळपास सर्वांचे कपडे मातीच्या रंगाचे झाले होते. सर्वजण पुन्हा त्या टापूवर पोहोचलो. सोबतच्या मुलांचा उत्साह संपलेला नव्हता. त्यांनी त्या टापूच्या उजव्या बाजूला असलेल्या धबधब्याचे दर्शन घ्यायचे ठरवले व मग आमच्या पंधरापैकी आठ जण उजव्या बाजूने खाली उतरून गेले.
वर टापूवर बसलो असताना मग आमच्या पैकी कुणाचे पाय दुखत होते, तर कुणाला निवांत आराम करायचा होता. त्यामुळे आम्ही सातही जण रीलॅक्स झालो. त्याचवेळी मला समोर एक जागा दिसली. त्या टापुचा एक भाग निमुळता होते पुढे दरीपर्यंत गेला होता. मी सहजच खाली उतरु लागलो व आणखी पुढे गेलो. आता सोबतचे सहा जण देखील मागे पडले व मी पुढे काही अंतरावर असलेल्या त्या निमुळत्या भागापर्यंत पोहोचलो. रायगडावरच्या टकमक टोकासारखा तो निमुळता भाग होता. त्याच्या अगदी टोकावर मी जाऊन उभा राहीलो. तेथून डावीकडे मान वळण्याच्या कोना पासून तर उजवीकडे वळे पर्यंत संपु्र्ण दरी होती. खोल दरी व त्या दरीतून धुके वर येत होते. दरीचा डावा भाग धुक्याने व्यापला होता व ते धुके उजवीकडून माझ्या अंगावरून डावीकडे जात होते. हिरव्या रंगांचे वेगवेगळे शेड्स आजुबाजूला दिसत होते. त्या टोकाच्या शेवटी असलेल्या एका दगडावर मी उभा होतो व तेथे फक्त मी होतो.
फक्त मी. सोबत केवळ निसर्ग. निसर्गाचे भव्य रुप. जिचा तळ दिसत नाही एवढी खोल दरी सर्वबाजूने. त्या निसर्गाच्या सान्निध्यात मी संपुर्णपणे एकटा होतो. परंतू ते एकटेपण एरवी कंटाळवाणे होते तसे नव्हते तर माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्षणाचे महात्म्य मनात ठळकपणे उमटविणारे होते. माझा प्रत्येक श्वास मला जाणवत होता. त्या प्रत्येक श्वासासोबत माझे असणे देखील जाणवत होते. समस्त प्राणीमात्रांमधे वैचारिकदृष्ट्या व संवेदनशीलतेमधे सर्वोत्तम मानल्या गेलेल्या मनुष्य जमातीचा प्रतिनीधी म्हणून त्याक्षणी, त्या ठिकाणी मी एकटा होतो. त्या ठिकाणी तेथे फक्त माझे एकटे असणे ही एक फारच वेगळी अनुभूती होती. एरवी घरात एकटे असणे ही बाब वेगळी परंतू त्या ठिकाणी जगाशी संपुर्णपणे संपर्क तुटलेल्या स्थितीमधे, सोबतीलाही कुणीच नसताना, कुणाचेही बोलणे ऐकू येत नसताना, केवळ निसर्गाशी एकरुप होण्याचे ते क्षण फक्त माझे होते. आपले संपुर्ण अस्तित्व त्या महाकाय शक्तीमधे सामावल्या गेले आहे असे मला वाटू लागले. निःशब्दपणे मी त्या निसर्गाच्या पवित्र रुपाचा प्रत्येक क्षण आत्मिक पातळीवर अनुभवत होतो.
या संपुर्ण जगात आपल्याला परमेश्वराने दिलेले अस्तित्व वेगवेगळ्या प्रकारे मोठे करण्यासाठी एरवी आपण किती धडपडत असतो. प्रगतीशील असणे, नवनविन क्षेत्रे निवडून तेथे आपल्या कामाचा ठसा उमटविणे, कर्तृत्ववान होणे ही सारी ध्येये माणसाच्या जीवनाला अर्थ देतात व त्यामुळेच तो कर्माच्या मार्गावर चालू लागतो. परंतू त्या वाटेमधे असा एखादा क्षण हवा जेथे परत एकदा आपण आपल्या आणि फक्त आपल्या स्वतंत्र अस्तित्वाला भेटू शकू. हा फक्त मी ची भावना मनात तीव्रतेने जागविणारा क्षण कधीतरी मिळवायला हवा कारण तो क्षण परत एकदा जीवन उत्साहाने जगण्याची उमेद देतो. तेथे आपल्या प्रत्येक श्वासाची किंमत आपल्याला कळते व त्यामुळे आपण आपल्या जीवनावर पुन्हा मनापासून प्रेम करु लागतो.
मला आठवतंय आता....त्या तिथे तुझा हरवलेला चेहरा...ती ह्याचीच सुरुवात होती तर....तू आणि तो तुझा क्षण..
ReplyDeleteमी एक साक्षीदार...
Yesss..
DeleteSir sahmi sudha sobath hoto asa anubhv lekh wachtana aala
ReplyDeleteSir sahmi sudha sobath hoto asa anubhv lekh wachtana aala ---Sunita ithape
ReplyDeleteधकाधकीच्या जीवनातील एक सुखांत क्षण. हवाहवासा वाटणारा.
ReplyDeleteखुप खुप छान लेख sir, thank u
ReplyDeleteएखाद्या Psychologist च 'Solitude' ह्यावरच Ted talk किंवा ग्रेसांची ' निळाई '
ReplyDeleteकिंवा 10-15 ओळींची Zen story हे सर्व अनुभवतांना एक abstract vs concrete अशी मनःस्थिती आपण अनुभवतो. अर्थ समजला, पुर्णपणे गवसला अस वाटत असतानाच नवीन अर्थ मनात रुजू लागतो.. हिच अनुभुती हा लेख वाचतांना जाणवली.
रोजचं (थोड्याफार फरकाने)
एकसुरी आयुष्य सोडुन मोजक्या मित्रपरिवारासोबत निसर्गात रममाण होण ते लेखाच्या शेवटच्या भागात असलेली ती लेखकाची स्वतःशीच होणारी भेट.. ह्यामुळे कुठलेही संवेदनशील मन मंत्रमुग्ध झाले नसेल तर नवलच!
श्रावणाचा साज ल्यालेली सृष्टी लेखकानी अक्षरशः डोळ्यासमोर उभी केली आहे. पक्षांच्या किलबिलाट, ओहळांची खळखळ, हिरवाईचे निरनिराळे रूपं, ओला पाऊस, गार वारा आणि मऊ धुके.. सारे काही मनाला स्पर्शून जाते. कपड्यांना लागलेला चिखल आणि 2 / 4 पायावर चालणे ह्या वर्णनामुळे आपल्या चेहर्यावर एक स्मितरेषा नक्कीच उमटते.
लेखाचा शेवट आपल्याला एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवतो आणि तिथे जी अनुभुती मिळते ती मनाला स्थिरता देऊन जाते.
"निसर्गाकडून अध्यात्माकडे "
ReplyDeleteएक सुरेख अनुभूती आणि मांडणी सुद्धा !हार्दिक अभिनंदन!
प्रा. संजय पाटील, वाशीम
perfect.....
ReplyDelete