थोडा है थोडे की जरुरत है @ 01.12.20

दुरावा जपावा... कोणता?

त्या दिवशी त्या फोनवर माझा मित्रच बोलतोय यावर माझा कितीतरी वेळ विश्वास बसला नाही. कारण माझ्याशी बोलताना तो स्वर, ती भाषा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनाला बोचणारा तो अनौपचारिकपणा मला सहनच झाला नाही. हे काय झालंय? हे काय होऊन बसलंय? कश्या प्रकारच्या व्यवस्थेचा भाग आपण सारे झालोय? अनेक दिवसांच्या सवयीनंतर हा भाग आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक तर बनणार नाही ना? असे कित्येक प्रश्न मनात निर्माण झाले. माझा मित्र जो एरवी अमरावतीला आला की अक्षरशः घरी येऊन धडकतो. धडकणे हा शब्द शब्दशः त्याच्या येण्याला लागू होतो. दरवाज्यातूनच मोठी आरोळी देत, आहे का बे घरी? असे म्हणून सरळ दार लोटून घरात येणार, मला कडकडून मिठी मारणार, मग मला बुक्क्यांचा मार देणार, आणि त्यानंतर मग अक्षरशः जमिनीवर अस्ताव्यस्त पाय पसरुन बसणार आणि मग मनसोक्त गप्पा मारणार ही त्याची अनेक वर्षांची पद्धत ठरलेली होती. माझ्या मुलांना देखील त्याच्या या असल्या वागण्याचे सुरुवातीला नवलच वाटायचे. कारण आपल्या बाबाला प्रेमाने बदडून काढणारा काका त्यांच्यासाठी अप्रुपच होता. परंतू नंतर त्यांना सवय झाली. त्यामुळे वर्षा-दोन वर्षातून एकदा आहे का बे घरी? अशी जोरदार आरोळी आली की पोरे समजून जातात की बाबांचा खास दोस्त, जिगरी यार आलाय आणि आता बराच वेळ गोंधळ चालणार. आता पोरांना त्या गोष्टीचे कौतुक वाटते. त्यांना आपल्या बाबांची किती खास मैत्री आहे याचा आनंदच होतो. असा माझ्या घरात या पद्धतीने धडकणारा माझा बेस्ट फ्रेंड मला फोनवर जे विचारत होता ते ऐकून मला सध्याच्या परीस्थीतीचे बदललेले अन्वयार्थ दुखावून गेले

कोरोना नावाच्या आजाराचे जे थैमान आपण सर्वजण गेले काही महिने अनुभवतो आहे या निमित्ताने आपल्या जीवनात जी आमुलाग्र स्थित्यंतरे आली आहेत त्यापैकी एका फारच विचित्र स्थित्यंतराचा अनुभव माझ्या मित्राच्या फोन वरील संवादातून मी घेतला होता. या आजारामुळे आपले अवघे जीवन आणि सोबतच आपले मनोविश्व अक्षरशः ढवळून निघालेय. माणूस म्हणून जगताना आपल्याला अश्या प्रकारे देखील जगावे लागेल असा विचारही कधी मनात आला नसताना आपल्यासमोर हे संकट उभे ठाकले. अर्थात माणूस देखील प्राण्यांसारखा वेगवेगळ्या परीस्थीतमधे स्वतःला चटकन सामावून धेतो जीवन जगू लागतो तसेच काहीसे या आजारामधून उद्भवलेल्या स्थितीमुळे झाले. यामधला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. माणसा माणसामधील शारीरिक दुरावा. आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तो पाळणे अत्यावश्यक होते किंबहुना अजुनही ते लागू आहे. या सोबतच कधी नव्हे तो प्रत्येक जण स्वतःचा विचार करु लागला. एकंदरीत स्थितीच अशी होती की ज्याला हा आजार झाला तो इतर सर्वांपासून वेगळा राहणार त्याला कुणालाही भेटता येणार नाही. जीवाभावाची माणसे असली तरी देखील नाही. हे माणसाचे या जगातील बोचरे वैशिष्ट्य, जे कधीतरी चल अकेला चल अकेला, तेरा मेला पिछे छुटा राही चल अकेला, सारख्या काव्यातून जाणविणारे एकटेपण या काळात जास्त ठळकपणे जाणवून गेले. या साऱ्या गोष्टींचा परीणाम जसा आपल्या जीवन पद्धतींवर होत होता तसा तो हळू हळू आपले मनोविश्व देखील विस्कळीत करीत होता. या आजाराच्या पार्श्भूमीवर आजाराचा अतिरेकी विचार करताना आपण एकमेकांशी वागताना औपचारिकतेला एवढ्या तत्परतेने आत्मसात केले की सोशल डिस्टन्सिंग करता करता आपण इमोशनल डिस्टन्सिंगच्या घेऱ्यात कधी अडकलो हे कळलेच नाही. शारीरिक दुरावा राखता राखता आपण मानसिक दुरावा देखील पाळायला लागलो. याचाच परिपाक म्हणजे माझ्या मित्राचा तो फोन

माझा मित्र मला म्हणत होता, अवि मी अमरावतीला आलो आहे. तुम्हा सर्वांना भेटण्याची इच्छा आहे. त्यासाठी मुद्दाम फोन केला. मी घरी आलो तर चालेल का? मुद्दामच विचारण्यासाठी फोन केला. परवानगी नसेल तर राहू देतो. आपण फोनवरच बोलूयात. माझ्या जिवःश्च कंठःश्च मित्राला माझ्या घरी येण्याकरीता परवानगी मागावी लागतेय? घरी येऊन थेट धडकून आनंदाचा धक्का देणारा माझा मित्र माझ्या घरी येण्याची शक्यता चाचपडून बघत होता. जवळपास तीन वर्षांनी त्याचे अमरावतीला येणे झाले होते. तीन वर्षांनी आम्ही भेटणार होतो. प्रत्यक्ष भेट आणि खूप साऱ्या गप्पा याला पर्यायच नव्हता. अश्यावेळी अतिशय संभावितपणे औपचारिकतेच्या टोन मधला त्याचा तो फोन म्हणजे मला हादरवून टाकणारी घटना होती. माझ्या घरी आई आहे त्यामुळे तिच्या काळजीपोटी तो मला असे विचारतो आहे हे त्यानेच मला सांगितले. ज्येष्ठ नागरिक असलेल्या माझ्या आई बद्दल त्याला वाटणारी काळजी मी समजू शकत होतो परंतू त्यामुळे आपल्या अतिशय जिवलग मित्राकडे येण्यासाठी त्याला परवानगीची गरज भासावी? हे काहीतरी वेगळे होते. कारण हा तो माझा मित्र नाही. कोरोनाच्या काळात दुरावा पाळण्याच्या संकल्पनेमधे अडकलेला हा कुणीतरी वेगळाच आहे. अशीच स्थिती कमी अधिक प्रमाणात आपल्यापैकी प्रत्येकाची झाली आहे. इतर देशाच्या तुलनेत आपल्याला हे जास्त तीव्रतेने जाणवते कारण आपण अश्या पद्धतीने औपचारिक जगणारे लोक नाही. आपण मनमोकळेपणाने एकमेकांसोबत आणि सहवासाने जीवन जगणारे लोक आहोत. ज्यांना मुळातच माणसांची ॲलर्जी आहे त्यांना हे सारे ठीक वाटू शकते परंतू सामान्यपणे भारतीय मनोविश्व हे स्विकारायला तयार नसते. परंतू कोरोनाच्या काळात हे आपल्याला नाईलाजाने करावे लागतेय. परंतू ही बाब शारीरिक दुरावा सांभाळण्यापर्यंत ठीक आहे. मनाचा दुरावा मात्र तयार व्हायला नको.

म्हणूनच आता कोरोनाच्या या परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे आहे. हा विषाणू आपल्याला शारीरिकदृष्ट्या दूर ठेवू शकतो परंतू आमची मने मात्र जोडल्या गेलेली आहेत हे कुठेतरी आता एकमेकांना जाणवून द्यावे लागेल. आता आपले जीवन संपुर्ण काळजी घेऊन पूर्वपदावर आणायला सुरुवात करायलाच हवी. त्यासाठी सर्वात प्रथम कोरोनामुळे निर्माण झालेली ही अकल्पित औपचारिकता सर्वप्रथम बाजूला सारायला हवी. संवाद सुरु व्हावेत, भेटी देखील सुरु व्हाव्यात. काळजी घेऊयातच परंतू त्याचा अर्थ एकमेकांपासून विलग होणे असा होत नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, व्हिटॅमीन सी, वाफ घेणे, स्वच्छता, या साऱ्या गोष्टींना आपल्या नियमित आयुष्याचा भाग बनवूयात. परंतू माणसामाणसातील संवादाला मास्क लावण्याची गरज नाही. विषाणूच्या भितीपोटी आपल्या आयुष्यात अनावश्यक औपचारिकता आणण्याची देखील गरज नाही. कारण तीच मुळात आपली ओळख आहे

भारतीय म्हणून संपुर्ण जगभरात आपण या अत्यंत अनौपचारिक संवाद क्षमतांसाठीच ओळखले जातो. कोरोना विषाणूचा उच्छाद लवकरच संपेल. परंतू सहसंवादाची भारतीय पताका मात्र कायम फडकत राहणे गरजेचे आहे. त्याची काळजी घेऊयात. कारण कोरोनामुळे आपले झालेले नुकसान भरुन निघेल परंतू मानसिक दुराव्यामुळे होऊ घातलेले नुकसान कधीही भरुन निघणार नाही. चला तर, ही सहसंवादाची अनौपचारिक पताका हाती घेऊन मानसिक दुरावा मिटविणाऱ्या दिंडीचे वारकरी होऊयात!!





 

Comments

  1. सह संवाद.....👌👌👌

    ReplyDelete
  2. Khup sunder lihilay Baba 👌👌

    ReplyDelete
  3. आज अत्यावश्यक असलेल्या सुरेख विचाराचा उपचार (treatment )आपण सुचवला.खुपच छान.

    ReplyDelete
  4. सदर पुन्हा सुरू केल्यामुळे आनंद झाला.

    ReplyDelete
  5. अत्यंत समर्पक व विचारशील लेख.

    ReplyDelete
  6. चला पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली .... भाई, खूप सुंदर..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23