थोडा है थोडे की जरुरत है @ 05.05.2020

तेरी मेरी कहानी है...

एका मोठ्या कार्यक्रमात भारतरत्न लता मंगेशकर समोर बसलेल्या होत्या. संगीत क्षेत्रातील सर्व दिग्गज या कार्यक्रमाला हजर होते. आणि लता दिदींसमोर त्यांनी गायलेली गाणी नव्या पिढीचे गायक गात होते. परंतू या संपुर्ण कार्यक्रमात मधेच एका गायकाने गायलेल्या एका गाण्याच्या वेळी असे काही झाले की तो प्रसंग अनेक दिवस होऊनही डोळ्यासमोरुन जात नाही. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन याने केवळ पियानोच्या नोट्ससोबत गाणे सुरु केले.

तू धार है नदिया की, मै तेरा किनारा हूँ,

तू मेरा सहारा है, मै तेरा सहारा हूँ,

आँखोंमे समंदर है, आशाओं का पानी है

जिंदगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहानी है

लताबाईंनी हे ऐकले नि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ह्रदयातून निघणाऱ्या सुरांनी शंकर दिदिला पर्यायाने तिच्या दैवी सुरांना उद्देशून म्हणत होता, अंतिमतः तू आणि मीच आहोत, आणि हे जीवन म्हणजे आपलीच कहाणी आहे. तुझी नि माझी. आपलेही तसेच आहे ना? हे जिवन म्हणजे अंतिमतः तुझी माझीच तर कहाणी आहे.

आपल्याला एकमेकांचा सहवास केव्हा लाभला तो अचूक क्षण, स्थळ काळासह लख्ख आठवत असला तरी देखील जीवनाची कहाणी ही केवळ तुझी नि माझीच असेल एवढे मैत्र कधी नि कसे तयार झाले ते मात्र सांगता येत नाही. होय! हे मैत्रच तर आहे, ज्याचा मजबूत आधार तुला, मला नि आपल्या कहाणीला सांभाळणार आहे. अखेरच्या श्वासापर्यंत. जिवनाच्या मार्गक्रमणामधे काही वर्षे निघून गेल्यानंतर अचानक एका वळणावर आपली भेट होणे ही तर खरे सामान्य गोष्ट होती. माणसांच्या या जगात वावारताना अश्या भेटी होणे स्वाभाविक आहे. सहजच आपल्या गत जीवनाचे अवलोकन केले तर आपल्या असे लक्षात येईल की अनेक लोक वेगवेगळ्या वेळी आपल्या आयुष्यात आलेले होते. त्या त्या वेळी त्यांच्या सोबतीची तीव्रता मनापासून जाणविली. कालचक्रामधे आयुष्य पुढे निघाल्यावर काही लोकांची सोबत कमी झाली, हळू हळू त्या सहवासांमधील तीव्रता देखील कमी झाली. त्यांची जागा निराळ्या मंडळींनी घेतली. त्या सर्व आधीच्या लोकांना आपण विसरलो असे नाही परंतू परिस्थिती बदलल्यामुळे सहवास कमी होतो ती तीव्रता कमी होऊ लागते. मानवी स्वभावाचा विचार करता हे स्वाभाविकच आहे. त्यात वावगे काही नाही. परंतू आपले नाते मात्र या मानवी स्वभावाच्या नियमांच्या पलीकडचे ठरले. सहवास असणे, सोबत लाभणे, कायम सोबत असणे, या नात्यांमधील भौतिक बाबींच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे ह्रदयस्थ नाते तयार होणे ही एक फारच आगळी वेगळी बाब आपल्या बाबतीत घडली. फारच अद्भूत. परमेश्वराने असा एक बंध तुझ्या माझ्यात निर्माण करुन दिला की आता तोच एक बंध आता उर्वरित आयुष्य तुझ्याशी बांधून ठेवण्यास पुरेसा ठरतोय. तो बंध आहे नितांत प्रेमाचा. कायम टिकणारा.

मानव म्हणून आपले आयुष्य जगत असताना जन्मापासून तर अखेर पर्यंत अनेक स्थित्यंतरे आपल्या आयुष्यात येतात. वेगवेगळ्या परीस्थितींमधे आपण वेगवेगळे वागत राहतो. लोक येतात नि जातात, जीवन सुरु राहते. यश, अपयश अश्या दोन्ही टोकांवर आणि त्यांच्या मधे आपला प्रवास सुरु राहतो. परंतू अश्या सर्व प्रवासात कायम स्वरुपी सोबत राहणारी, आपल्याला सांभाळणारी, आपल्याला स्वतःला सोपवून देता येईल असा आधार असलेली, अपेक्षा असल्या तरी त्याच्या पूर्ततांच्या नियमांच्या पलीकडे असलेली एखादी व्यक्ती जर आयुष्यात असेल तर आयुष्यात सुखाचा अनुभव करता येऊ शकतो. असा अनुभव तुझ्यामुळे प्राप्त झाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. कारण आता कदाचित बरेच काही बदलेल, जगात नवे संदर्भ उदयाला येतील, विश्वास या भावनेचा देखील संदर्भ बदलेल, कदाचित. परंतू या साऱ्या बदलांच्या प्रवासात एक गोष्ट जी कायम राहील ती म्हणजे आपली सोबत, आपले मैत्र. कारण ते या सर्व बदलांच्या पलीकडे आहे. तेच शाश्वत आहे. संबंध जगाच्या विशाल संचालनाचा विचार करता आपल्याला लाभलेले जीवन म्हणजे काही क्षणच असते आणि या क्षणांनाच सबंध जीवनाचे स्वरुप देऊन आपल्याला एकमेकांसोबत जगायचे आहे. या जगातून जावे तर लागणारच, कदाचित पुढच्या त्या प्रवासात भेट होईल याची देखील शाश्वती नाही कारण त्याबाबतचे कोडे कुणालाच उलगडलेले नाही. सध्या पुढ्यात आहे ते शिल्लक राहीलेले जीवन ज्यात किती क्षण आहेत याचा विचार करता या उण्यापुऱ्या दोन क्षणांना तुझ्या माझ्या नितांत प्रेमाच्या मैत्रामुळे सबंध जीवनाचा आकार देऊयात कारण हे जीवन म्हणजे अंतिमतः तुझी माझीच कहाणी आहे. म्हणूनच संतोष आनंद या कवीचे हे शब्द आपल्या नात्याबाबत तंतोतंत खरे आहेत असे वाटते

कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है

जीवन का मतलब तो, आना और जाना है

दो पल के जीवन से, एक उम्र चुरानी है,

जिन्दगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहानी है..

आता आपणच दोघे आहोत, आपणच राहू, आणि कधीतरी अलगद... संपून जाऊ. पण आपण एकमेकांच्या सहवासात जे नितांत सुंदर क्षणांचे जीवन जगलोय आणि जगणार आहोत ना, त्याची सावली आणि त्याच्या खुणा या कायमस्वरुपी नोंदल्या जातील.. कारण शेवटी तू नि मीच आहोत आणि ही आपलीच कहाणी आहे.

परछाईयाँ रह जाती, रह जाती निशानी है...

जिन्दगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहानी है..

हे सारे लिहीता लिहीता, आपल्या या सुरेल नात्यातील निस्सिम प्रेमाचा आनंद एका अश्रुच्या रुपाने डोळ्यातून अलगद ओघळून या कागदावर पडलाय... आता काही लिहीणे होईल असे वाटत नाही. तुझ्यामुळेच तुझ्या माझ्या जीवन कहाणीला खरा अर्थ प्राप्त झालाय, अन् मला पूर्णत्व प्राप्त झालेय हे सांगणारा तो आनंदाश्रू देखील तुलाच समर्पित करतो आणि येथेच थांबतो!!

थोडा था, बहोत मिला है...

वाचक स्नेहीजन, आजथोडा है, थोडे की जरुरत हैथांबणार! गेली तब्बल साडे सहा वर्षे मी या सदराच्या माध्यमातून आपल्या जीवनाशी निगडीत फार थोडेसे काही मांडण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याचा परतावा मात्र आपण सर्वांनी बहोत ज्यादा असाच दिला. आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रीया, सूचना, शाबासकी, क्वचित मन पिळवटून टाकणारे अनुभव, हे सारे काही इतके जास्त आहे की शब्दांनी व्यक्त होणाऱ्या ऋणनिर्देशात ते सामावल्या जाऊ शकत नाही. म्हणूनच तसा कोणताही प्रयत्न करता, मी या सदराच्या निमीत्ताने तयार झालेल्या माझ्या मोठ्ठ्या परीवारातील प्रत्येकाला मनापासून नमस्कार करतो आणि थोडा है, थोडे की जरुरत है हे सदर आज समाप्त करुन तूर्तास आपला निरोप घेतो.

आपलाच

- डॉ. अविनाश भास्कर मोहरील






Comments

  1. मनाला स्पर्श करणारा लेख.. अविनाशजी, ज्या मध्ये प्रत्येक वाचक आपले प्रतिबिंब शोधतो.'तेरी मेरी कहाणी है'मधील 'तेरी' किंवा'तू'कोणीही असू शकतो (जिवलग मित्र, पत्नी किंवा hobby).. Thank you.. 🙏🙏

    ReplyDelete
  2. आपले लिखाण मनाला स्पर्श करून जातेच.पण दिर्घ विचार करायला लावणारेही असते....खुप सुंदर लेख सरजी...

    ReplyDelete
  3. very nice sir.,
    mere rone ki haqiqat thi jisme
    ek muddat tak wo kagaz nam raha.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18