My article about a friend whom we have lost....
सुख म्हणजे नक्की काय असतं?
त्या दिवशी बाहेरुन घरी आलो तेव्हा घरासमोर एक नवी कोरी कार होंडा अमेझ उभी होती. इतकी सुंदर दिसणारी कार जी जाहिरातीत बघीतली होती ती माझ्या घरासमोर उभी होती. घरात जाण्याआधी मी त्या कारचे निरीक्षण केले व मग ही कार घेऊन आपल्याकडे कोण आले याचा विचार करीत घरात गेलो. घरात माझा जिवलग मित्र गणेश आलेला होता. मला बघुन त्याला काय बोलावे ते सूचत नव्हते. निखळ आनंदाने त्याचा चेहरा खुलला होता. नव्या होंडा अमेझची चावी माझ्या हातात देऊन तो इतकेच म्हणू शकला, अव्या, आपली गाडी!! आपली नवी गाडी? मी मोठ्याने ओरडलो. गण्याने गळाभेट घेतली. त्याचा चेहरा मला त्याच्या मनातील सारे भाव सांगत होता. माझ्या मनातील आनंद देखील त्याला कळत होता. त्याला बाजुला बसवून नवी गाडी चालवायला निघालो. गाडी चालविताना मी त्या गाडीच्या विशेषतांचा आनंद घेत कौतुक करीत होतो. गाडी वेगात पुढे चालली होती पण माझे मन मात्र हळूहळू मागे मागे जात होते. ते थेट जाऊन पोहोचले त्या दिवसाला ज्या दिवशी गण्याची माझी मैत्री झाली. माझ्या विजय नावाच्या जिवलग मित्रामुळे हा गडी माझ्या जिवनात आला आणि सख्खा मित्र बनला. त्यावेळचा गण्या आठविला....
गण्या संगीताच्या क्षेत्रात रमणारा आणि त्या भरवश्यावरच स्वतःला स्थापित करण्याचा विचार असणारा साध्या कुटुंबातील पोरगा. हार्मोनियम व तबला या दोन्ही वाद्य प्रकारांच्या वादनासोबत गायनदेखील तो करायचा. परिस्थिती बेताचीच होती. पण गण्याचे एक वैशिष्ट्य होते - ते म्हणजे मी त्याला कधीही दुर्मुखलेला बघितला नाही. गण्या भेटणार म्हणजे डोळे मोठे करुन कडाडून आलिंगन देणार आणि आपण भेटल्याचा त्याला खरोखरीच आनंद झालाय हे त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवित राहणार. गण्याचा प्रवास खरेतर साध्या पद्धतीनेच सुरु होता. सायकलवरचा प्रवास, विविध ठिकाणी संगीताच्या कार्यक्रमामधून वादन करणे, घरी क्लासेस घेणे या पद्धतीच्या साध्या परंतू प्रमाणिक व मेहनती मार्गांनी अर्थार्जन त्याने खूप आधीपासून सुरु केले होते. परिस्थीती ठीक नव्हती तरी त्याने कधीही हार मानली नाही. आवडलेल्या पोरीशी लग्न करतानादेखील अनेक समस्या आल्या पण न खचता त्याने सर्व प्रसंगांना तोंड दिले. लग्नानंतर त्याच्या पत्नीने त्याच्या प्रामणिक कष्टाच्या व स्वाभिमानाने जगण्याच्या प्रक्रीयेला मनापासून सहकार्यच केले. दोघेही संगीताच्या ट्युशन्स घेत. गण्याच्या पाठबळामुळे तीने आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिला व गण्याला देखील नोकरी लागली. एक छानसा मुलगा आहे. अश्या प्रकारे खडतर पण प्रामाणिक मेहनताचा प्रवास करीत आज एका छान स्थितीमधे पोहोचलेला गण्या माझ्या बाजुला त्याने विकत घेतलेल्या गाडीत बसून मी गाडी चालवतोय म्हणून अतिशय आनंदी झाला होता. हे जिवनसुख त्याला मिळाले असताना माझ्या मनात प्रश्न तयार झाला - सुख म्हणजे नक्की काय असतं? त्याचे उत्तर देखील लगेच मनात उमटले- सुख म्हणजे आयुष्यात निस्सीम व निरपेक्ष प्रेम करुन पाठबळ देणारी सोबत मिळणे हेच सुखाचे गमक आहे.
आयुष्यात नाती निवडण्याचा अधिकार आपल्याला नसतो असे म्हणतात. पण सोबती मात्र निवडता येतात किंवा नात्यांना चांगल्या सोबतीमधे परावर्तीत करता येते. एकंदरीत सोबत कशी आहे यावर प्रत्येकाच्या आयुष्याचा डोलारा अवलंबून असतो. समाधानी आयुष्य कधीही भौतिक यशावर अवलंबून नसते. भौतिक सुखे ही समाधानी आयुष्याच्या केवळ पावत्या असतात. खरे महत्व असते ते त्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी केलेल्या प्रामाणिक मेहनतीला व ती मेहनत करीत असताना जोडीदाराकडून व सोबत्यांकडून मिळालेल्या पाठबळाचे. जोडीदाराने समजून घेणे, मानसिक बळ देणे, वैफल्याच्या किंवा दुःखाच्या प्रसंगात आधार देणे, खंबीरपणे पाठीशी उभे राहणे, संपुर्ण विश्वास टाकणे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सहकाऱ्याचे मनःस्वास्थ सुदृढ राहील यासाठी प्रयत्न करणे. एकमेकासोबत रहात असलेल्या माणसांनी वरील बाबींचा अवलंब केला तर कोणत्याही कुटुंबात सुख नांदू शकते.
एकविसाव्या शतकात व तंत्रज्ञानाच्या युगात वर उल्लेखित सहकार्याचा अभाव मोठ्या प्रमाणात जाणवितो. एका बाजुला सोशल नेटवर्कींग च्या माध्यमातून जगातील कोणत्याही टोकाच्या व्यक्तीशी संपर्क साधलेल्या व्यक्तींनी घरात मात्र आपापले चार टोके निवडलेली असतात जी एकमेकाला छेद देतच नाही आणि दिला तरीही त्यामधे सकारात्मक संवाद घडताना दिसत नाही. चीडचीड, आरडाओरड किंवा वादविवाद यालाच काही लोकांनी संवाद समजलेला असतो व त्यामुळे प्रेमाच्या व आनंदाच्या गोष्टींमधून संवाद त्यांना ठाऊकच नसतो. घर असतं पण त्या घराला घरपण देण्यात बरेच वेळा अपयश येतं. याच कारणांमुळे सर्वदूर तणाव निर्माण झालेला दिसतो. सहकारी किंवा जोडीदार तणाव कामाच्या ठिकाणी निर्माण झालेला तणाव कमी न करता वाढवित असतील तर ताण-नियोजन कसे होणार? घर म्हणजे तणावाचे निवारण करणारी व्यवस्था न राहता तणाव निर्माण करणारी दुर्व्यवस्था बनत जाते. याच कारणांमुळे ह्रदयविकार, मधुमेह इत्यादी आजार आता वयाच्या तीसाव्या वर्षापासून जडलेले सर्रास आढळतात. या अश्या परीस्थितीमागे कारण एकच असे की - सुख म्हणजे नक्की काय असतं ? - या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नसणे.
सुख म्हणजे नक्की काय असतं?
काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं?
Comments
Post a Comment