थोडा है, थोडे की जरुरत है या सदराचा दै. हिन्दुस्थान मधील आजचा भाग
स्कुलव्हॅन मधील कल्पक विश्व
मानवाला परमेश्वराने विकासात्मक विचार करण्याची शक्ती प्रदान करुन इतर प्राणीमात्रांपेक्षा अतिशय वेगळ्या प्रकारचे आणि क्रियाशील वरदान दिले. या वरदानाचा पुरेपुर वापर करुन अनेकजण समाजाला वैचारिक दृष्टीने सुदृढ बनविण्याचे कार्य करीत असतात. अश्या प्रकारचे कार्य केवळ अभ्यासु तत्वज्ञ, विचारवंत याच वर्गवारीतील लोक करतात असा गैरसमज साधारणपणे समाजात आढळतो. परंतु एखादे अतिशय साधे काम थोड्याश्या कल्पकतेने व कार्य करण्याच्या तळमळीने केल्यास वैचारिक सुदृढीकरण ठरु शकते. अशाच एका वैचारिक सुदृढीकरणाच्या एका महत्त्वाच्या प्रक्रीयेची ही छोटीशी गोष्ट:
इंग्रजी पदव्युत्तर झालेला माझा एक विद्यार्थी काही कारणामुळे 'बी प्लस' मिळवू शकला नाही. बी.एड. झाले होते पण शिक्षकाची नोकरी प्राप्त करण्यासाठी केवळ 'सरस्वती'च्या आशिर्वादाने भागत नसल्याने आणि 'लक्ष्मी' त्याच्यावर फार प्रसन्न नसल्याने त्याने नोकरी न करण्याचे ठरविले आणि एक धाडसी निर्णय घेतला. तो पदवीला असताना एका डाॅक्टरकडे ड्रायव्हरचे काम करायचा. सायंकाळी त्याला काम असायचे त्यामुळे दुपारी त्याला काॅलेज करता यायचे. तीन वर्षे ड्रायव्हींग केले असल्याने त्याने चक्क बँकेचे लोन घेऊन एक व्हॅन खरेदी केली आणि शाळेतील लहान मुला-मुलींना ने-आण करण्याचे काम सुरु केले. 'प्रामाणिकपणे केलेले कोणतेही काम सन्मानाचेच असते' हा विचार त्याने प्रत्यक्षात जगणे सुरु केला. अमरावती शहरातील गावाबाहेर असणाऱ्या एका संपुर्ण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांना ने-आण करण्याचे काम त्याने सुरु केले. दिवसभरात साधारणपणे तो चार फेऱ्या मारीत असे. मुळातच साहित्याचा विद्यार्थी असल्याने त्याच्या संवेदना त्याला विचार करायला लावीत. त्याच्या असे लक्षात आले की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारी मुले इंग्रजी छान बोलतात पण त्यांच्या मराठी बोलण्यामधे जरा अडचण जाते. याबाबत काय करावे? यासंबंधी त्याचा विचार सुरु झाला. त्याला एक अफलातुन कल्पना सुचली. माझ्याशी चर्चा करुन त्याने माहिती घेतली आणि पुण्याहुन एका मोठ्या दुकानातुन मराठी गोष्टींच्या सीडीज् मागवुन घेतल्या. त्याच्या असे लक्षात आले होते की गाडीत शेवटचा मुलगा बसल्यानंतर शाळेचे अंतर कापायला साधारणपणे अर्धा तास लागतो. या अर्धा तासभर एरवी मुले फार पहाट असल्याने आळसावून बसली राहायची किंवा इंग्रजाळलेल्या मराठीत कलकलाट करायची. गाडीत त्याने सीडी प्लेयर बसविला आणि त्यानंतर सुरु झाली धमाल मराठी गोष्टींची अफलातुन सफर.
त्याने आणलेल्या सीडीज् मधे मोठमोठ्या कलावंतांनी शब्दबद्ध केलेल्या सुंदर सुंदर कहाण्या होत्या. जातक कथा, पंचतंत्र, विक्रमादित्याच्या कथा, अकबर बिरबलाच्या कथा या सगळ्या कथा ऐकल्या जाऊ लागल्या. या कथांच्या निमित्ताने अत्यंत शुद्ध स्वरुपाची मराठी भाषा मुलांच्या कानी पडायला लागली. पालकांना पण अतिशय आनंद झाला की शाळेत जाण्यासाठी कंटाळा करणारी मुले 'स्कुलबस येतेय' असे सांगितले की ताड्कन जागी व्हायला लागली. शाळेच्या तयारीसाठी मागे लागणे अक्षरशः बंद झाले. यासोबतच आपली मुले छान मराठी ऐकत आहेत याचा त्यांना फार आनंद झाला. त्याचा परीणाम असा झाला की याच्या गाडीतील ज्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस असेल तिच्या पालकांकडुन या गोष्टी-क्लबसाठी नवनविन सीडीज् भेट मिळू लागल्या. मराठीतील अनेक नवनविन गोष्टींची क्लबमधे भर पडणे सुरु झाले. बरेच वेळा मुलांना काही मराठी शब्द कळायचे नाही. त्यासाठी माझ्या विद्यार्थ्याने मराठी शब्दकोशाची पाॅकेट आवृत्ती मागविली. कठीण शब्द आला की गोष्ट पाॅज केली जायची आणि मुले त्या शब्दांचे अर्थ त्या शब्दकोशात शोधायचे. एकंदरीत अर्धा तास जाण्याचे आणि अर्धा तास येण्याचे ते अंतर म्हणजे त्या स्कुल व्हॅन मधील मुलांसाठी एक धमाल सफर बनली. या उपक्रमामुळे खुश होऊन सर्व पालकांनी स्वतःहुन याच्या व्हॅनच्या भाड्याचे पैसे वाढवून दिले शिवाय दर दिवाळीला दहा टक्के वाढ देखील कबुल केली. मराठी गोष्टींचा हा फिरता क्लब जोरात सुरु होता तेव्हाच अचानक्...
एका स्कुल व्हॅनचा अमरावती शहरात भीषण अपघात झाला. लहान लहान मुलांचा त्यात बळी गेला. सारे शहर सुन्न झाले. पोलीसांनी तातडीने स्कुल-व्हॅन साठी विविध निर्देश जारी केले. त्यात एक होता-स्कुल व्हॅनमधे सीडी प्लेयर लावता येणार नाही. आपल्या गाडीतील सीडी प्लेयर काढताना माझ्या विद्यार्थ्याच्या डोळ्यात पाणी आले. मराठी गोष्टींचे एक सुंदर विश्व त्याला बंद करावे लागले. त्या स्कुल व्हॅनमधील प्रफुल्लित उत्साह पुन्हा कंटाळवाण्या शांततेत आणि कलकलाटात परावर्तीत झाला. महिनाभर असेच चालले. पण साहित्याचा अभ्यासक असणारा माझा विद्यार्थी मित्र शांत बसणारा नव्हता. त्याने अभ्यासलेले साहित्य त्याला कल्पकच बनविते.
त्याने आता खूप सारी मराठी गोष्टींची पुस्तके विकत आणली आहेत. आता मुले रोज एकेक करुन मराठी गोष्टी मोठ्याने वाचतात. एक जण वाचतो आणि इतर ऐकतात. कठीण शब्दांचे अर्थ पुन्हा शोधले जातात आणि परत धमाल सुरु झाली आहे. मराठी गोष्टींचे ते सुरेख विश्व पुन्हा मुलांच्या भेटीला आलंय. सोबतच हसत खेळत मुले मातृभाषा शिकत आहेत. मातृभाषेचे महत्व पटविण्यासाठी आक्रस्ताळेपणा न करता थोडीशी कल्पकता प्रभावी ठरु शकते हे सगळ्यांनाच कळले तर?
Comments
Post a Comment