थोडा है थोडे की जरुरत है @ 23.02.21
जमीनीवरचा मालक अनेक वर्षांपासून आम्ही एका ठराविक दुकानातून किराणा आणतो . माझे वडील तेथूनच आणायचे व आता मी देखील तेथूनच किराणा आणतो . फॅमीली डॉक्टर असतात त्या प्रमाणे ते आमचे फॅमीली किराणा दुकान आहे . अर्थात आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे असे फॅमीली किराणा दुकान असते . नाही म्हणायला गावात मोठे मॉल सुरु झाल्यावर तेथून एक दोन महिने आम्ही किराणा आणून बघितला . परंतू दर महिन्याला साधारण तीन हजार रुपयाचा आणला जाणारा किराणा एकदम साडे सहा हजार रुपयाचा झाला असे बघितल्यावर त्या चकचकीत मॉलचे वैशिष्ट्य कळले . ट्रॉली घेऊन निघालो की वस्तू दिसायला लागतात आणि त्या सहजच त्या ट्रॉलीमधे टाकल्या जातात . शिवाय किराणा खरेदी करताना परीवार सोबत असेल तर मग प्रत्येक जण आपल्या मर्जीने वस्तू ट्रॉलीत आणून टाकतो व त्यामुळे अचानक किराण्याची किंमत दुप्पट होते . दोन महिन्याच्या या किराणा खरेदीच्या कौतुकानंतर मी परत माझ्या नेहेमीच्या दुकानात जाणे सुरु केले आणि आपली परंपरागत पद्धती म्हणजे कार्यालया...